भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांना शिवसैनिकांचा पाठींबा
मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे शिवसेनेची मोठी गोची झाली आहे.
राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवर लावलेल्या भोंग्याबाबत भुमिका घेत अल्टीमेटम दिला होता. तर काल पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, हे एक दिवसाचे आंदोलन नाही. तर हा मुद्दा कायमचा निकाली निघत नाही तोपर्यंत सुरूच राहील, असे सांगितले. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केल्याने शिवसेनेची गोची झाली आहे. तर जुन्या शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेला पाठींबा असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे हटवले नाही तर मशीदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस सतर्क झाले आहे. मात्र राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांचा पाठींबा मिळत असल्याचे वृत्त आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावर नमाज पठन करण्याच्या मुद्द्यावरून टीका केली. तर अशा प्रकारची टीका बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तर रस्त्यावरचे नमाज आणि मशीदीवरील भोंगे बंद करण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांनी मागणी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचीच मागणी पुढे रेटल्यामुळे जुन्या शिवसैनिकांचा राज ठाकरे यांच्या भुमिकेला पाठींबा असल्याचे चित्र आहे.
तसेच इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तात मुंबईतील माजी शाखाप्रमुखांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेशी सहमती दर्शवली आहे. तर 99 टक्के शिवसैनिकांचा राज ठाकरे यांच्या भुमिकेला पाठींबा असल्याचे म्हटले आहे.
मनसे कार्यकर्त्यांची झाली होती धरपकड
राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे अनेक ठिकाणी मशीदीवरील भोंगे वाजल्यानंतर मशीदीसमोर हनुमान चालीसा पठन केली. तर या प्रकारामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यभरात अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.