इंडिया आघाडी बैठकीची तयारी जोरदार सुरू आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने एक गट एनडीएत तर शरद पवार यांचा गट इंडिया आघाडी सहभागी झाला आहे. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेल्या आव्हानातून उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे.
दरम्यान मोदींनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे पवार म्हणाले. आमची भूमिका भाजपविरोधात असून फुटीरांना लोक जागा दाखवतील, असा टोलाही पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. राष्ट्रवादीवर मोदींनी केलेल्या आरोपांबाबत पवारांना यावेळी छेडण्यात आले. यावर पवारांनी पंतप्रधान मोदींना फक्त आरोप न करता सखोल चौकशी करण्याचेही आव्हान केले.
"भोपाळच्या भाषणात मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर भ्रष्ट्राचार आणि घराणेशाहीची टीका केली होती. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी राज्य शिखर बँक आणि इरिगेशन घोटाळ्यावर जोर दिला होता. देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे माझा एकच आग्रह आहे की, जिथे सत्तेचा गैरवापर झाला असे त्यांना वाटते त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजापुढे ठेवावी. हातात सत्ता असल्याने त्यांनी केलेल्या आरोपांवर लवकरात लवकर अॅक्शन घ्यावी", असे थेट मोदींना पवारांनी आव्हान दिले आहे.