न्यायालयाकडून विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनाच दिलासा मिळत आहे, अशी थेट टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का, न्यायव्यवस्थेवर विशेष असे लोक बसवण्यात आले आहेत का आणि ते कुणाच्या सूचनेनुसार काम करतात का, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर टीका करत आता सोमय्या यांचा टॉयलेट घोटाळा आपण बाहेर काढणार आहोत, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. हा शंभर कोटींचा घोटाळा आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट केले, त्यावरुन संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. "काल त्यांनी माननीय पवार साहेब यांच्यावर ट्विट केलं एखादा त्यांनी आयएनएस विक्रांत वरती करावं आम्ही काढणार आहोत, शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा आहे" असाही आरोप त्यांनी केला.
भाजपच्या नेत्यांनी कितीही दावा केला असला तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, उलट किमान पुढले पंचवीस वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.