एकीकडे राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटलेला आहे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच वादात राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. "मी टरबुज्या म्हणणार नाही, पण मी मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावललं, अशी घणाघाती टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्रीपदाचा अधिकार खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेले तरी खान्देशवर अन्याय करण्यात येत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. "70 वर्षात कोकणात नारायण राणे, मनोहर जोशी असे मुख्यमंत्री झाले. विदर्भातील 4 नेते मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस झाला" या शब्दात त्यांनी टीका केली. तसेच मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील कोणताही नेता मुख्यमंत्री झालेला नाही. उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकही संधी देण्यात आली नाही, चाळीस चाळीस वर्ष पक्षात आम्ही हमाली केली, मात्र अधिकार असतानाही मुख्यमंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी याआधीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे, पण त्यांच्यावर टीका करताना खडसे यांनी टरबुज्या उल्लेख पहिल्यांदाच केल्याची चर्चा आहे.