एकीकडे नारायण राणे यांच्यावरील ठाकरे सरकारची कारवाई ताजी असतानाच आता EDने पुन्हा कारवाईला सुरूवात केली आहे. मनी लॉँन्डरिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची जळगाव आणि लोणावळा येथील 5 कोटी 70 लाखांची मालमत्ता EDने जप्त केली आहे. पुणे येथील भोसरी MIDC भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसें तसेच त्यांच्या परिवाराच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें तसेच जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील MIDC चा भूखंड अब्बास उकानी यांच्याकडून खरेदी केला होता. 3 कोटी 75 लाखांना हा भूखंड खरेदी केला होता. मात्र ह्या सर्व व्यवहारात राज्य सरकारच्या 60 कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाल्याचा तसेच या व्यवहारातील पैसा बोगस कंपन्यांमधून आल्याचा संशय ईडीला आहे.
ह्याच प्रकरणात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें ह्यांना ही ईडीने तीनवेळा ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले असतांना ते हजर झाले नाहीत. ईडी केव्हाही त्यांना ताब्यात घेऊ शकते असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ईडीने अगोदरच दोन वेळा चौकशी केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2016 मध्ये भोसरी MIDC भूखंड प्रकरण चांगलंच गाजलं होत . एकनाथ खडसेंकडे महसूलसह 12 खात्यांचा कारभार होता. या प्रकरणी महसूल खात्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामुळे खडसेंना 12 खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भोसरी MIDC भूखंड प्रकरणी चौकशी साठी झोटिंग समितीही नेमण्यात आली होती. या झोटिंग समितीचा अहवालसुद्धा राज्य सरकारकडे जमा करण्यात आला आहे.