राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनीही अण्णांची भेट घेऊन केंद्र सरकारची भूमिका अण्णांपुढे मांडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. पण ज्यावेळी पत्रकारांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना दिल्लीतल्या शेतकऱ्यांशी सरकार अण्णांप्रमाणे संवाद का साधत नाही असा सवाल विचारला तेव्हा त्यांचे बोलणे संपताच फडणवीस यांनी मंत्र्यांच्या विमानाची वेळ झाली असल्याचे सांगत पत्रकार परिषद गुंडाळली. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना फडणवीस यांनी का बोलू दिले नाही असा सवाल आता उपस्थित झाला आहे.