मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मानायला कुणी तयार नाही - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मानायला कुणी तयार नाही - देवेंद्र फडणवीस;
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीच्या आज बैठक पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.
आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आहे पण त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आहे आणि यात जनतेचे मात्र हाल होत आहेत'. महाराष्ट्रातली जनता होरपळते आहे. मात्र, जनतेकडे कुणाला पाहण्यास वेळ नाही. कुणी राज्य म्हणून विचार करत नाही, कुणी समस्या पाहात नाही. जनतेचे हाल होत आहेत. जनता या सगळ्यांमुळे भरडली जाते आहे. असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी झालेल्या दंगलीवर बोलताना फडणवीस यांनी मालेगावची घटना साधी नव्हती. हा एक प्रयोग होता. देशात अराजक माजवण्यासाठी अल्पसंख्यकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा प्रयोग आहे. देशात ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयोग आहे. हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात, एक तरी महाविकास आघाडीचा नेता त्यावर बोलला का? दुकान हिंदूचं असो की मुस्लिमांचं ते जाळणं चुकीचं आहे. पण एक तरी नेता बोलला का? असा सवाल केला आहे.
सरकार हे कायद्याचे राज्य नाही तर 'काय दे' चे राज्य आहे.
राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण...
राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.