धक्कादायक : तोतया अधिकाऱ्याने कर्जवसुलीच्या नावाखाली केली शेतकऱ्याची फसवणूक

रिकव्हरी एजंट म्हणून आलेल्या अधिकाऱ्याने पैसे घेतले पण बँकेत टाकलेच नाहीत

Update: 2022-08-20 15:38 GMT

बनावट बँक अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून लाखोची रक्कम वसुल करून त्याला फसवल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या आळसंद या गावातील जनार्दन निवृत्ती माने या शेतकऱ्याने शेतीकरिता बँक ऑफ इंडिया शाखा विटा येथून कर्ज घेतले होते. त्यांनी वन टाईम सेटलमेंट म्हणून साडे चार लाख रुपये भरले. पण जो अधिकारी पैसे घेऊन गेला त्याने हे पैसे बँकेत भरलेच नसल्याचा धक्कादायक आरोप या शेतकऱ्याने केला आहे. त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी प्रत्यक्ष बोलताना सांगितलेली हि घटना धक्कादायक आहे. कर्ज थकल्याने त्यांच्या घरी रीकव्हरी अधिकारी असल्याचे सांगून एक इसम आला. त्याने वन टाईम सेटलमेंट करून देतो असे सांगितले. शेतकऱ्याने हा इसम बँकेशी संबंधित असल्याचे तपासण्यासाठी बँक गाठली. तर तेथील शिपायाने रिकव्हरी साठी हे लोक कोल्हापूर येथून आले असल्याचे सांगितले. त्याच दरम्यान त्या इसमाने बँकेबाहेर तुमचे कर्ज कमीत कमी करून देतो असे सांगून त्या शेतकऱ्याच्या मित्राकरवी सुमारे साडेचार लाख रुपये घेतले.

घेतलेली रक्कम बँकेत भरल्याची पावती त्याच मित्राच्या वॉट्सप नंबर वरून पाठवली. पण बँकेत चौकशी केल्यानंतर त्या कर्जाचा एकही रुपया जमा झाला नसल्याचे शेतकऱ्याला विटा शाखेने सांगितले. यानंतर ज्या शाखेच्या पावत्या संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलेल्या होत्या शेतकऱ्याने ती कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी येथील बँक गाठली. तेथे या पावत्या दाखवल्यानंतर या पावत्या बोगस असून तुमच्यावरच गुन्हा दाखल करतो असे त्या शेतकऱ्याला सांगण्यात आले. आपली फसगत झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्या शेतकऱ्याने बँक ऑफ इंडिया शाखा विटा येथील मॅनेजर सोबत संपर्क साधला. तर तुम्ही बाहेर पैसे भरले आहेत त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे. तसेच कुठे तक्रार करू नका आम्ही सदर व्यक्तीला बोलावून घेतो असे सांगण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत या शेतकऱ्याची दखल घेण्यात आलेली नाही.

या उलट पैसे भरून देखील शेतकऱ्याच्या कर्जाचे व्याज वाढत आहे. तसेच हे पैसे भरण्यासाठी ज्यांच्याकडून पैसे घेतले ते व्याज देखील वाढत असून हा शेतकरी नैराश्येत आहे.

या संदर्भात बँक ऑफ इंडिया शाखा विटा येथील अधिकारी गायकवाड यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने वारंवार संपर्क केला परंतु त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. सदर शेतकऱ्याने या संबंधित लोकांच्यावर तक्रार करणार आहे.

एका बाजूला अनेक भांडवलदार कर्ज बुडवून देश सोडून जात आहेत. परंतु कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची अशा प्रकारे फसवणूक होण्याचा धक्कादायक प्रकार विटा येथे घडला आहे.

Tags:    

Similar News