लता मंगेशकर आणि गुलाम हैदर

Update: 2017-02-16 18:40 GMT

लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला यंदा तब्बल 75 वर्ष पूर्ण होत आहेत. कोट्यवधी रसिकांच्या मनावर आजही मोहिनी असलेल्या लतादीदींच्या कारकिर्दीचा आढवा घेणारं विशेष सदर

" ल ता मं गे श क र " ...... सात अक्षरं .... सप्त सूर .....

रसिकांच्या जवळ जवळ तीन पिढ्या एकाच सुरेल सप्तसूरांच्या धाग्यात ओवल्या गेल्या आहेत आणि तो धागा आहे " लता मंगेशकर "

गेली कित्येक वर्ष हा आवाज गातच आहे ..... गातच आहे ..... गातच आहे .....

स्वर्गातून अवतरलेल्या ह्या स्वरगंगेच्या अविरत सूरधारांनी आजवर लाखो करोडो संगीत रसिकांचे कान व अंतःकरण तृप्त केले आहेत .

लताच्या आवाजाला आता खरंतर कोणतीच उपमा शिल्लक उरली नाहीये. लताचा आवाज हा फक्त आणि फक्त लतासारखाच होता, आहे आणि या पुढेही असणार आहे .... कारण लताला उपमा नाही हे देवाघरचे देणे ....

तर अशा या अद्वितीय, उत्तुंग व्यक्तिमत्वाने या वर्षी म्हणजेच २०१७ साली संगीत क्षेत्रात व्यावसायिक रित्या थोडी थोडकी नव्हे तर ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. आज ७५ वर्षे ह्या अनभिषिक्त गानसम्राज्ञीच्या स्वरधारांचा अखंड स्रोत, ऐकणाऱ्याचा कण न कण व्यापून टाकतो. कधीही, कुठेही आणि कितीही गाणी ऐका लताची. ऐकणाऱ्याचं समाधान होत नाही आणि म्हणूनच ह्या व्यावसायिक पंच्याहत्तरीच औचित्य साधून लताच्या काही गाण्यांची एक सफर तुमच्या बरोबर करायच ठरवलं.

लता मंगेशकर आणि गुलाम हैदर

पण लताची संगीत कारकीर्द एवढी प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण आहे कतिची गाणी निवडणं म्हणजे डोळे दिपवणाऱ्या रत्नांनी खच्चून भरलेल्या खाणीतून एक एक रत्न शोधणं. बरं, सगळीच रत्न अमूल्य, सगळीच हवीहवीशी, कुठलं उचलू आणि कुठलं नको.

पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी होती. मग ठरवलं की तिला या प्रवासात अगदी सुरुवातीपासून साथ देणारे २५ गीतकार, २५ संगीतकार आणि २५ नायिका निवडून त्यांचं एक एक गाणं घ्यायचं.

पण परत यात एक अडचण आली. यातील प्रत्येकाबरोबरची तिची कामगिरी एवढी अफाट आहे क त्यांचं मला एकच एक गाणं निवडता येईना. म्हणूनच मग प्रत्येकाची पाच गाणी घेतली. म्हणजे त्यांनाही थोडाफार न्याय देता येईल आणि आपली सफर देखील जास्त रंगतदार होईल.

कोणतंही कार्य करताना ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सर्वप्रथम गजाननाची नांदी करायची पद्धत आहे.

चला तर ...... आपणही आज सर्वप्रथम नांदी करणार आहोत .....

कुणाची नांदी?

अहो लताच्या हिंदी संगीतातील यशस्वी वाटचालीची नांदी ज्याने केली त्याची अनेक लता प्रेमींना माहीतच असेल १९४२ मध्ये अवघ्या वयाच्या १३व्या वर्षी तिच्या वडिलांचं, मास्टर दीनानाथ मंगेशकरांच निधन झालं आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करण्याची जबाबदारी सर्वात मोठ्या असणाऱ्या लतावर आली .

मास्टर विनायकांनी तिला १९४२ मध्ये "पहिली मंगळागौर" या मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका दिली. त्यातलं "नटली चैत्राची नवलाई" हे तिने पडद्यावर साकारलेलं पहलं वहिलं मराठी गीत. तिचं पाहिलं हिंदी गाणं देखील १९४३ मध्ये आलेल्या "गजाभाऊ" ह्या मराठी सिनेमातलं आहे .

छोट्या छोट्या भूमिका करून आणि गाणी म्हणून लता आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत होती. पण म्हणावा तसा break मात्र अजून मिळत नव्हता.... आणि तो तिला मिळवून दिला गुलाम हैदर यांनी .

"शहीद" चित्रपटासाठी पार्श्वगायिका म्हणून त्यांनी शशधर मुखर्जींना लताच नाव सुचवलं. पण, मुखर्जींना लताचा आवाज तेव्हा खूपच नाजूक आणि पातळ वाटला आणि त्यांनी तिला नाकारलं .

त्यावर चिडून गुलाम हैदार म्हणाले क "आज जिला तुम्ही नाकारत आहेत उद्या तिने आपल्या चित्रपटात गावं म्हणून तुम्ही भीक मागाल" आणि त्यांनी तिला आपल्या "मजबूर" ( १९४८ ) या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. लतानेही आपल्या mentor च हे वचन शब्दशः खरं करून दाखवलं .

" गुलाम हैदर हे खऱ्या अर्थाने माझे गॉडफादर होते. कारण मी नवखी असताना तेच सर्वात पहिले संगीतकार होते ज्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला" असं म्हणून लता आजही त्यांचं हे ऋण मान्य करते.

म्हणूनच आज जरी गुलाम हैदर सर्वांच्या विस्मृतीत गेले असले तरी एक दिव्य आवाज आपल्या समोर आणल्याबद्दल संपूर्ण सिनेजगत आणि संगीतरसिक नक्कीच त्यांचे कायमचे ऋणी राहतील . दुर्दैवाने त्यांचे १९५३ साली निधन झालं .

लता त्यांच्याकडे "पद्मिनी" आणि "मजबूर" अशा फक्त दोनच चित्रपटात गायली ....पण गुलाम हैदर मुळेच संगीत जगताला एक अनोखं रत्नं मिळालं .....

मजबूर ( १९४८ ) मधील

"दिल मेरा तोडा, मुझे कहींका ना छोडा"

हे लताचं पदड्यावर खऱ्या अर्थाने हिट झालेलं पाहिलं गाणं

पद्मिनी ( १९४८ ) मधील

"बेदर्द तेरे दर्द को सिने से लगाके

रो लेंगे तसव्वूर में तुझे पास बिठाके"

हे गाणं देखील खूप गाजलं आणि लता नावाच्या चांदणीचा, अहं पौर्णिमेच्या चंद्राचा सिनेसंगीताच्या क्षितिजावर उदय झाला .

आणि म्हणूनच आपण आज गुलाम हैदर यांच्या नांदीने ह्या सूरसफरीची सुरुवात केली....

तर मग येताय न माझ्याबरोबर ?

चला तर, तिच्याच जादुई स्वरांच्या गालिच्यावर बसून सुरु करू हअदभूत सफर..त्या निमित्ताने गतकाळातील अनेक स्मृत आणि काही विस्मृतीत गेलेल्या अप्रतिम रचनांचीही आपसूक उजळणी होईल .

तयार रहा पुढच्या आठवड्यात ह्याच ठिकाणी ह्याच वेळी लताच्या सूरमयी दुनियेत भरारी घ्यायला .....

Similar News