आली...! आली..! प्रियांका आली...!

Update: 2017-01-25 19:23 GMT

त्या आल्या..! त्या आल्या...! वातावरणात एकच कल्लोळ उडाला आणि गेली काही वर्षे देशभरच्या राजकीय पटलावर गेली पाच वर्षे उभे ठाकलेले प्रश्नचिन्ह गळून पडले. अखेर प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात निदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं उडी घेतलीच. काँग्रेसने आपल्या'स्टार प्रचारक' म्हणून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीत प्रियांका यांचा समावेश आहे. याचाच अर्थ निदान या निवडणुकीत तरी त्या अमेठी आणि रायबरेली या त्यांच्या परंपरागत 'घरेलू' बनून राहिलेल्या मतदारसंघांबाहेर प्रचार करणार आहेत. आतापर्यंत मोठ्या कसोशीनं राखून ठेवलेली काँग्रेसची 'झाकली मूठ' आता उघडणार आहे. या मुठीत खरेच काही मौल्यवान आहे की, ही सुद्धा केवळ हवाच, हे येत्या 11 मार्च रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हाच साऱ्यांना समजेल. तोपर्यंत स्व. इंदिरा गांधी यांची लाडकी नात, राजीव गांधी यांची बिटिया आणि काँग्रेसचे आता उरलेले एकमेव आशास्थान प्रियांका यांना आपण शुभेच्छा देऊया!

गेली अनेक वर्षे प्रियांकांना सक्रिय राजकारणात आणण्याचे कसोशीचे प्रयत्न बरेच ज्येष्ठ काँग्रेस नेते करत होते. देशातील महत्त्वाची वृत्तपत्रे व टीव्ही वाहिन्यांनीही आडून - आडून तसे प्रयत्न केले. पण प्रियांका आपल्या निर्णयावर ठाम होत्या. 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसचे पार पेकाट मोडले. उत्तर प्रदेशात तर त्सुनामीच आली. काँग्रेस या राज्यात आपल्या जेमतेम दोन जागा वाचवू शकली. त्या होत्या रायबरेली व अमेठीच्या. त्या जागांवर सोनिया गांधी व राहुल गांधी हे माय-लेक निवडून आले. केवळ याच दोन मतदारसंघांत प्रियांकांनी स्वत: प्रचारात भाग घेतला होता, हा निव्वळ योगायोग नव्हे. खादीची साडी नेसून झपाझपा पाऊले टाकत चालणाऱ्या, गर्दीत अचानक मिसळणाऱ्या, अस्खलीत हिंदीत सराईतपणे बोलणाऱ्या आणि विरोधकांच्या हल्ल्यांना बेदरकारपणे तात्काळ उत्तरे देणाऱ्या प्रियांका अनेक देशवासीयांना स्व. इंदिराजींची आठवण करून देत राहिल्या. त्यामुळेच एका बाजूला राहुल गांधी आपल्याच पराक्रमामुळे चारही मुंड्या चीत होत असताना व सोनियाजींना आजाराने ग्रासले असताना काँग्रेस वाचवायची, तर प्रियांकांच्या शिवाय पर्याय नाही, असे काँग्रेसजनांना मनापासून वाटू लागले. तसे वाटणे स्वाभाविकच होते, कारण जवाहरलाल नेहरू यांचा भारतीय राजकारणात उदय झाल्यापासून देशभरच्या काँग्रेसजनांनी नेहरू-गांधी परिवारापलिकडे 'नेता' म्हणून कुणाकडे पाहिलेच नाही. मधल्या काळात कधी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सारख्यांनी प्रयत्न केले, पण ते हरले. आता तर असे प्रयत्न कुणी करेल, असा नेताही या पक्षाकडे उरलेला नाही व तशा नेत्याचा उदय नजीकच्या दहा वर्षांच्या भविष्यकाळात तरी शक्य वाटत नाही. तोपर्यंत पक्ष संपूनही गेलेला असेल.

राजे-राजवाड्यांच्या काळात सत्ता राजघराण्यातच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहते. भारतात अशी राज्ये व छोटी-मोठी संस्थाने खालसा झाली. तरीही नामधारी राजे आजही आपल्या मुलांचा 'राज्याभिषेक' करवून घेतच आहेत. राज्ये नाहीत, सत्ताही नाही, स्वत:चे सैन्य किंवा प्रशासन नाही, तरीही 'राजे' मात्र राहिलेच. अलिकडेच सैफ अली खानने पातौडी संस्थानचे 'नबाब' म्हणून राज्यारोहण करवून घेतले. हे पतौडी संस्थान कुठे आहे, ते नकाशावर भिंग घेऊन शोधावे लागते. सैफचे वडिल मन्सूर अलीखान हयात होते, तेव्हाच त्यांचे उरले सुरले संस्थानही इंदिरा गांधींनी खालसा केले. तरीही नबाब म्हणवून घेण्याचा सोस काही सुटत नाही. तसेच काँग्रेसचे आहे. याच पक्षाने देशात लोकशाही आणली, म्हणून डंका पिटवला. पण काँग्रेस पक्ष मात्र 'संस्थान'च राहिला. सध्या त्याचे राणीपद सोनियाजींकडे असले, तरी राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची तयारी जोरात चालू आहे. अशा वेळीच प्रियांका रिंगणात आल्यामुळे कदाचित वर्षा-दीड वर्षांत गादीच्या मालकीवरून वाद होऊ शकतील.

पण तूर्तास तरी काँग्रेसजनांना प्रियांका यांच एकमेव तारणहार वाटत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळाले, याचे श्रेय भाजपने आणलेले व्यूहरचनातज्ज्ञ प्रशांत किशोर यांना दिले जाते. आता तेच प्रशांत किशोर काँग्रेसच्या नोकरीत आहेत. त्यांनीच म्हणे आग्रह करून प्रियांकाना रिंगणात आणले. त्यांची ही चाल सध्या तरी यशस्वी ठरलेली दिसते. कारण आपली 'न्यू ईयर फॅमिली टूर' बाजूला ठेवून प्रियांका दिल्लीत राहिल्या व समाजवादी पार्टीचे नवे नबाब अखिलेश यादव यांच्याबरोबरची राहुल गांधी यांची तुटलेली बोलणी प्रियांकांनीच पुन्हा रुळावर आणली. त्यासाठी म्हणे त्यांनी स्वत:च अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यांना फोन करून त्यांची भेट घेतली. दोघींनी बरीच 'चर्चा' करून आघाडी पुन्हा सांधण्याचे ठरवले व डिम्पलच्या आग्रहासमोर अखिलेश म्हणे नमले.

आता समाजवादी पार्टीने आपल्या जागा कमी करून काँग्रेसच्या जागा वाढवल्या आहेत. समाजवादी पार्टीची आधीच दोन शकले झाली आहेत. त्यातच भाजपला टक्कर द्यायला सपा व काँग्रेस जर स्वतंत्रपणे आखाड्या उतरले, तर भाजपविरोधी मते सपाचे दोन गट, काँग्रेस व मायावतींची बहुजन समाज पार्टी यांच्यात विभागली जातील, अशी भीती या सर्वच पक्षांना होती. पण सपा-काँग्रेस यांच्यात दिलजमाई झाल्यामुळे निदान एक दुफळी टळली आहे. त्याचा फायदा सपा-काँग्रेसला नक्की किती होतो, ते पहायचे. पण या घडामोडीमुळेच प्रियांका राजकारणाच्या आखाड्यात थेट उतरल्या. याचे दूरगामी परिणाम संभवतात. एक तर प्रियांकांची पाटी अद्याप कोरी आहे. त्यामुळेच त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्यावरील आरोप वगळता प्रियांकांविरुद्ध बोलण्यासारखे कोणत्याही विरोधकाकडे काहीच नाही. उलट, त्यांचे दिसणे, बोलणे, वागणे यामुळे इंदिराजींचे स्मरण होत असल्याने उत्तर प्रदेशातील निदान बुजुर्ग मंडळी पुन्हा एकदा काँग्रेसकडे सहानुभूतीने पाहू लागतील, असे पक्षाच्या धुरिणांना वाटते.

माध्यमांना आवडतील व सनसनी पैदा करतील अशी वाक्ये फेकण्यात प्रियांका हुषार आहेत. त्यामुळेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोनच मतदार संघांत प्रचारासाठी फिरूनही प्रियांकांनी देशभर प्रसिद्धी मिळवली. अर्थात त्याचा फायदा मिळवण्यात उत्तर प्रदेश व अन्य राज्यांतील काँग्रेसजन कमी पडले, पण हा दोष प्रियांकांचा नाही. आता त्या राज्यभर फिरतील, अशी चिन्हे असल्याने त्यांच्या वक्तृत्वाचे पडसाद सारे उत्तर प्रदेश राज्य, तसेच, पंजाब सह अन्य तीन राज्यांतही उमटणारच. त्याचा फायदा काँग्रेसवाले किती व कसा उठवतात, यावर निवडणुकांचे निकाल अवलंबून आहेत.

एक नक्की की, या वेळी प्रथमच काँग्रेसने स्वत:च स्वत:ला दुय्यम स्थान देण्याचा निर्णय घेतला. हेतू हाच असणार की, दुय्यम स्थान मिळाले, तरी त्यामुळे निदान एका राज्यात काँग्रेस निवडणुकीनंतर निश्चितच जीवंत राहील. जर झाड जीवंत राहिले, तर त्याला खत-पाणी घालून व नीट निगा राखून त्याचा पुन्हा वृक्ष करता येतो, हे प्रशांत किशोर व प्रियांका यांना नीट ठाऊक असावे, म्हणूनच त्यांनी प्रियांकांची उत्तर प्रदेशच्या राजकारणत वाजत-गाजत स्थापना केली आहे. आता त्यांच्या सकाळ-संध्याकाळ आारत्या गायला देशभरचे समस्त काँग्रेसजन मुक्त आहेत. प्रश्न केवळ हाच आहे की, जर प्रियांका प्रभावी ठरल्या, तर युवराज राहुल यांचे काय करायचे?

-भारतकुमार राऊत

Twitter: @BharatkumarRaut

Similar News