Woman Day: शब्दांनी घोळ घातलाय !!

महिलेला भाषेने स्वतंत्र स्थान दिले आहे का? भाषा आणि महिला स्वातंत्र्य काही संबंध आहे का? पुरूषसत्ताक व्यवस्था मोडीत काढण्यासाठी भाषेचा वापर कसा करता येईल वाचा महिला दिनानिमित्त डाॅ. प्रदीप पाटील यांचे विचार करायला लावणारे विचार;

Update: 2022-03-08 06:42 GMT

बाई...महिला...स्त्री हे शब्द बरोबर आहेत कारण ते स्त्रीलिंगी आहेत. पण... हे सर्व शब्द 'मानव' या शब्दाखाली मांडले जातात ! बाई असो, महिला असो, स्त्री असो. त्या सर्व 'मानव' आहेत. मानव हा शब्द मनु या शब्दापासून बनलाय. मनुचा अर्थ आहे ब्रम्ह्याचा पुत्र, अंतःकरण, मंत्र. पुत्र हा अर्थ घेतला तर स्त्री पुत्र होऊ शकत नाही. म्हणजे पुल्लिंगी होऊ शकत नाही. मग स्त्रीसाठी 'मानव' या अर्थी स्त्रीलिंगी शब्द कोणता? कोणताच नाही.

मग स्त्रीने पुरूषी, पुल्लिंगी शब्दाचा आधार घेऊन स्वतःला मानव म्हणवून घ्यायचे. पुरूषांच्या आधारे स्वतःचे अस्तित्व दाखविणे हे स्त्रीसाठी क्लेशकारक स्त्रीलाच वाटत नाही. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या सर्व स्त्रिया पुरूषी शब्द 'मानव व मनु' वर परावलंबी आहेत.

कारण मानव या पुरूषी शब्दाला स्त्रीलिंगी पर्यायी शब्दच उपलब्ध नाही! मग परंपरा म्हणून तोच शब्द वर्षानुवर्षे वापरणे चालूच आहे. स्त्री मुक्त शब्दशः अजुनही व्हायची आहे!! सामान्य बोलीत त्या माणूस आहेत. बोलताना देखील 'बाईमाणूस' असा शब्द वापरला जातो. शब्दांचा घोळ आहे तो इथेच. म्हणजे...

माणूस हा शब्द पुल्लिंगी आहे. आणि पुल्लिंगी शब्द हा या सर्व मानवजातीचा प्रमुख बनला आहे. म्हणजे स्त्री, बाई किंवा महिला यांच्यासाठी मानव किंवा माणूस हा शब्द सर्रास वापरला जातो.

भाषा जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती आदिम अवस्थेत होती. आणि आदिम अवस्थेतला मानव हा नरपशू होता. माद्यांवर मालकी, अत्याचार आणि अंकुश ही त्याची शस्त्रे तो अथकपणे वापरत होता. स्त्री आणि पुरुष हे सुरुवातीला नर आणि मादी या नावाने ओळखले जात. म्हणजेच शब्दाने ओळखले जात. पण नराचे वर्चस्व अबाधित होते. हेच वर्चस्व शब्दांमध्ये देखील उतरले आहे. स्त्री साठी वापरले जाणारे शब्द हे नरप्रधान आहेत! पुरुषप्रधान आहेत!!

माणूस प्रधान आहेत!!!

मानव प्रधान आहेत..!

म्हणजे तुम्ही-आम्ही सहज बोलताना देखील स्त्रियांवर पुरुषी शब्द लादत असतो. माणूस हा शब्द आपण माणुसकी या अर्थाने जर बघितला तर स्त्री साठी सुद्धा माणुसकी या अर्थाने शब्द माणूस शब्दांतून येतो. म्हणजे विशेषण जे आपण वापरतो स्त्रीसाठी ते पुरुषी आहे किंवा पुल्लिंगी आहे.

स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी हे व्याकरण दृष्ट्या आणि आणि जीवशास्त्रदृष्ट्या भाषेसाठी स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे. अन्यथा पुरुष वाचक शब्द स्त्रीवर लादले जाणे सहज शक्य होते. किंबहुना ते आत्ता झालेच आहे.

जीवशास्त्र दृष्ट्या बघितले तर नर आणि मादी हे शब्द योग्य आहेत. पण स्त्री साठी इतर शब्द जर पाहिले तर मात्र प्रत्येक शब्द हा 'पुरुष' गृहीत धरून बनला आहे.

म्हणजे इथेही शब्दांचा घोळ आहे...

स्त्री हा शब्द संस्कृतमध्ये ज्या अर्थाने वापरलेला आहे तो असा-

" त्सायेते शुक्र शोणिते यस्याम सा स्त्री ".

याचा अर्थ असा आहे की, स्त्री म्हणजे जिच्यामध्ये शुक्र आणि रक्त यांचा संचार असतो ती व्यक्ती. शुक्र म्हणजे पुरूषांचे वीर्य. म्हणजे इथे स्त्री कोण आहे ? 'तो' वीर्य जिच्यात सांडतो 'ती'! वीर्याशिवाय स्त्री बनू शकत नाही का?

सूत्री किंवा सोत्रि या शब्दापासून बनलेल्या स्त्रीचा एक अर्थ आहे जी मुलं धारण करते ती. स्त्री फक्त मुलं पैदा करते? त्यापलीकडे ती काहीच करत नाही?

स्त्रीचा दुसरा अर्थ असा आहे की स्त्री म्हणजे भार्या, बायको, मादी. जी पुरूषाशिवाय राहते ती कोण?

आयुर्वेदात म्हटले आहे... स्त्रवते अशी जी स्त्रावण म्हणजे स्त्री.

पुरूष देखील स्त्रवतो. दुसरे म्हणजे रक्त स्त्रावणे एवढे एकच काम स्त्रीचे असते का?

'स्त्यै' या धातूपासून स्त्री हा शब्द बनला आहे असेही म्हटले जाते. याचा अर्थ आहे, लाजून चूर होणे म्हणजे..

" लज्जार्थस्य लज्जन्तेपि हि ता:l"

स्त्री लाजते..पण पुरुषही लाजतो. पण त्यांची कारणे ही जन्मताच नसतात. लाजणे ही एक समाजामध्ये संस्काराने निर्माण होणारी गोष्ट आहे. आज तर स्त्री डोळ्यात डोळे घालून पुरुषाच्या बरोबरीने कामे करते आहे. ती कुणी लाजणारी बाहुली बनलेली नाही.

पतंजलीने पाणिनीय सूत्र घेऊन म्हटले आहे की..

" स्तन-केशवती स्त्री स्यात्लोमशः पुरूष: स्मृत: l"

म्हणजे जिला स्तन आणि केस असतात अशी स्त्री. खरेतर पुरुष आणि स्त्री दोघांनाही केस असतात. जीवशास्त्रीय दृष्ट्या स्तन दोघांनाही असतात. सस्तन प्राणी फक्त स्त्री नसते. पुरूषही आहे.

ऋग्वेदात म्हंटले आहे..

" स्त्रिय: एव एता: शब्द-स्पर्श-रूप-गन्धहारिण्य: l"

म्हणजे स्त्रीच्या शब्द, स्पर्श, रूप, वगैरेंनी पुरुष आपली मानसिक तृप्ती करतो. पण स्त्री देखील आपली मानसिक तृप्ती पुरुषाच्या शब्द,रूप, इत्यादींनी करते. मग पुरुषाच्या तृप्तीची गोष्ट समोर ठेवून स्त्रीचा शब्द तयार करणे हे पुन्हा पुरुषसत्ताक शब्द लादणे होय.

ज्योतिषशास्त्र लिहिणाऱ्या वराहमिहिर याने...' जिला नुसते पाहिले किंवा जिचे नुसते ऐकले किंवा तिची नुसती आठवण झाली तरी सुखच सुख मिळते अशी म्हणजे कोण असेल तर ती स्त्री होय' असे बृहत्संहिता या ग्रंथात म्हटले आहे.

" श्रुतं दृष्टं स्पृष्टं स्मृतमपि नृपा ह्लादजननं न रत्न स्त्रीभ्योन्यत् क्वचिदपि कृतं लोकपतिना l"

पुरूषाची स्त्रीभोगी लालसा यातून व्यक्त होते. स्त्रीसुख एवढ्याच चौकटीत जर, पुरूषांनी आपली नजर ठेवली तर प्रत्येक स्त्री मादीच राहील. आणि तो नर. पशुपातळीवरील व्यवहार!

नारी हा शब्द नर पासून बनलेला आहे. काहींच्या मते नर याचा अर्थ आहे नाचणारा पुरुष. जेव्हा कामपूर्ती साठी हातापायाने जो नाचतो व नाचवतो तो नर होय. आणि नराच्या या कामपुर्तीत स्त्री सहभागी होते म्हणून ती नारी ठरते.

स्त्रीयांविषयी विचार करताना सेक्सच्या पलीकडे पुरूषाची नजर "या" अर्थाने कशी जाणार? तीच गोष्ट महिला या शब्दाची आहे. पतीचा सन्मान करणारी म्हणजे महिला. स्त्री साठी वापरल्या जाणार्या प्रत्येक शब्दात पुरूष कशासाठी? माणूस या अर्थाने स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी इंग्रजीत देखील ह्युमन हा शब्द वापरला जातो. यामध्ये ह्यु+मॅन आहे. मॅन म्हणजेच पुरुष याचा अंतर्भाव आहे. तिथेही परंपरेनं सुरुवातीपासून स्त्रीसाठी मानव या अर्थाने योग्य शब्द तयार केला नाही.

इंग्रजीत 'वुमन आणि फीमेल' असे शब्द आहेत. म्हणजे इथेही 'मॅन किंवा मेल' हे पुरुष आलेच. म्हणजे स्त्री शब्दांसाठी जिकडंतिकडं पुरूष चिकटलाय! स्त्रियांसाठी असलेल्या भाषेच्या दुर्भिक्ष्यासाठी बदल घडवायला हवंय. नवीन शब्द शोधून काढायला हवेत. यासाठी स्विडन देशात सातत्याने प्रयत्न होत आहेत. भाषिक वृद्धीची चळवळ व्हायला हवीय. जर भाषेतच लिंग भाव असेल तर लिंग द्वेष किंवा लिंग असमानता फैलावलेलीच राहील.

स्त्रीवादी भाषा सुधारणा किंवा फेमिनिस्ट लँग्वेज रिफाॅर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० वर्षापूर्वी ध्यानात आलं होतं. अँड्रोसेंट्रीजम इन ग्रामर या अर्थाने त्याकडे लक्षही वेधण्यात आले. मराठीत तर या सगळ्याचा विचार देखील झालेला नाही. आॅस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनीही या विषयी पुढाकार घेतला होता. पुरूषसत्ताक व्यवस्था मोडीत काढायची असेल तर भाषा आणि शब्दांपासून सुरवात करावी लागेल!

- डाॅ. प्रदीप पाटील

Tags:    

Similar News