खरं प्रेम : डेटिंग ॲप्सच्या पलीकडचं !
प्रेम म्हणजे काय असतं हो? आजच्या डिजिटल युगात प्रेम एका क्लिकवर शक्य झालंय खरं... परंतु तंत्रज्ञान तुमच्या नैसर्गिक भावना एकमेंकांशी जुळवतात का? डेटिंग ॲप प्रेम मिळवण्याचे योग्य ठिकाण आहे का? प्रेम करण्याची पारंपारिक पद्धत इतिहासजमा झाली आहे का? प्रेमाच्या व्यापारीकरणात तुमची फसवणूक होत आहे का? तर हा लेख तुमच्यासाठी लिहिला आहे राईट टू लव्ह चे संचालक के अभिजीत यांनी... वाचा आणि सावध रहा..;
आजच्या डिजिटल युगात, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. यामध्ये डेटिंग ॲप्सचा वापर विशेषतः उल्लेखनीय आहे. डेटिंग ॲप्सवरून लोक एकमेकांशी संपर्क साधतात, मैत्री करतात आणि प्रेम शोधतात. परंतु, या डिजिटल माध्यमात खरं प्रेम मिळवणं हे नेहमीच शक्य नसतं. खरं प्रेम हे नैसर्गिक भावना असून, ते कोणत्याही ॲपच्या माध्यमातून निर्माण होऊ शकत नाही. खरं प्रेम हे अशा डेटिंग ॲप्सच्या पलीकडे जाणारं असतं.
जगभरात डेटिंग ॲप्सची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे कारण त्यांनी तरुणाईच्या भाषेतील डेटिंगला सहज आणि सोपं केलं आहे. अशा ऍप्सवर तुम्ही आपल्या आवडी-निवडी, छंद, आणि विचारसरणीशी जुळणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता. ह्या ॲप्सवर विविध प्रोफाइल्स बघणं, मेसेज पाठवणं, आणि जवळपास असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधणं अगदी सोपं आहे. परंतु, ह्या ॲप्सवर प्रेम आणि जोडीदाराच्या शोधात अनेक जणांना फसवले जात आहे. हे ॲप्स बनवणाऱ्यांचा उद्देश फक्त पैसा कमवणे आहे.
या ॲप्सचे निर्माते असा दावा करतात की, हे प्लॅटफॉर्म आपल्याला खरं प्रेम आणि दीर्घकाळ टिकणारं नातं किंवा जोडीदार मिळवून देतील. पण, वास्तवात हे दावे कितपत खरे ठरतात? अशा ॲप्सच्या माध्यमातून जगभर फसवणूक झालेल्या तरुणाईची उदाहरण आपल्याला सांगता येतील. अनेकदा ह्या ॲप्सवर फसव्या प्रोफाइल्स असतात, आकर्षक आणि मादक फोटो असतात जे खोट्या माहितीसह बनवलेले असतात. त्यामुळे आपली भावनिक आणि आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.
डेटिंग ॲप्सवर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती शेअर करावी लागते. यामुळे डेटा सुरक्षेचा धोका जास्त असतो. अनेकदा कंपन्या आपल्या डेटाचा वापर करतात किंवा विक्री करतात, ज्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात येते. फसवे प्रोफाइल्स, खोट्या वचनांमुळे व्यक्तींना भावनिक आघाताला सामोरे जावे लागते. अशा अनुभवांमुळे निराशा, दु:ख, आणि मानसिक ताण निर्माण होतो. त्यामुळे, अशा ॲप्सचा वापर न करण्याचा विचार केला पाहिजे.
खरं प्रेम हे कोणत्याही डेटिंग ॲप्सच्या पलीकडे जाणारं असतं. ते नैसर्गिकरित्या निर्माण होत असतं. आपला जोडीदार निवडताना वैयक्तिक अनुभवांना प्राधान्य देणं कधीही आवश्यक असतं. डेटिंग ॲप्सवरील किंवा अन्य कोणत्याही ॲप्सवरील माहितीवर अवलंबून राहण्याऐवजी, प्रत्यक्ष संपर्क साधून व्यक्तीची पारख करावी. खरं प्रेम हे व्यक्तीच्या वागणुकीतून, स्वभावातून आणि त्याच्या विचारसरणीतून दिसून येतं.
प्रेम आणि नातेसंबंध जपण्यासाठी परस्पर आदर आणि विश्वास आवश्यक असतो. एकमेकांच्या विचारांचे आणि भावनेचा आदर करणं महत्वाचं आहे. प्रामाणिकता, पारदर्शकता, आणि समर्पणानेच खरे नाते निर्माण होऊ शकते. प्रेम आणि दीर्घकाळ टिकणारं नातं हे फक्त जवळीक आणि समर्पणानेच निर्माण होत असतं. एकमेकांना समजून घेऊन, त्यांच्या आनंदात आणि दु:खात सहभागी होणं महत्वाचं आहे. हे नातं घट्ट करण्यासाठी एकमेकांना वेळ देणं, त्यांच्यासोबत असणं आणि त्यांच्या गरजा समजून घेणं आवश्यक आहे.
आजच्या तरुणाईने अशा ॲप्सच्या पलीकडे खरं प्रेम शोधण्यासाठी पारंपारिक मार्गांचा विचार करावा. हे मार्ग अधिक विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. सामाजिक कार्यक्रम, कौटुंबिक स्नेहसंमेलने, मित्र मैत्रिणींमध्ये सहभागी होणे यामुळे आपल्याला नवे लोक भेटतात. या सामाजिक घडामोडींतून नवे नाते निर्माण होऊ शकते. आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये सहभागी होणं, जसे की पुस्तकांचे क्लब्स, सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळे सामाजिक उपक्रम यामुळे आपल्याला समान आवडी असलेल्या लोकांशी संपर्क साधता येतो. आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या माध्यमातून नव्या लोकांशी ओळख होऊ शकते. हे नाते अधिक विश्वासार्ह असते कारण आपल्या कुटुंबीय आणि मित्र आपल्याला ओळखून, आपल्या जुळणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास मदत करतात.
ऑनलाइन संवादावर अवलंबून राहण्याऐवजी, शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष भेटणे आणि संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यामुळे, व्यक्तीचा खरा स्वभाव आणि आचरण समजेल. आम्ही गेली नऊ वर्षांपासून "राईट टू लव्ह" या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेम आणि जोडीदार निवडीच्या अधिकारासाठी जनजागृती करतोय. खरं प्रेम शोधण्यासाठी तरुणाईला योग्य मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
"राईट टू लव्ह" ची जनजागृती
प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, परंतु तो निवडताना योग्य विचार आणि अनुभव आवश्यक आहेत. कोणत्याही तंत्रज्ञानाने किंवा प्लॅटफॉर्मने हे निर्माण करता येणार नाही. प्रेमासाठी वेळ, परस्पर आदर, आणि जवळीक हवी असते. नातेसंबंध हे फक्त बाह्य आकर्षणावर आधारित नसावेत. नात्यांची खऱ्या अर्थाने जपणूक करण्यासाठी परस्पर विश्वास आणि आदर महत्त्वाचे आहेत. डेटिंग ॲप्सवरील माहिती आणि संवाद खरे असतातच असे नाही. त्यामुळे, आपला जोडीदार निवडताना वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीला ओळखणे आवश्यक आहे.
आजच्या डिजिटल युगात डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून प्रेम शोधणं सोपं झालं आहे, पण खरं प्रेम हे नेहमीच त्यापलीकडे असतं. डेटिंग ॲप्सच्या फसवणुकीपासून सावध राहून, पारंपारिक मार्गांचा अवलंब करून, खरं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करा. प्रेमात परस्पर आदर, विश्वास आणि जवळीक महत्त्वाची आहे, जी कोणत्याही ॲपच्या माध्यमातून निर्माण होऊ शकत नाही.
के. अभिजीत
संचालक
राईट टू लव्ह | अनहद सोशल फाऊंडेशन