मिशन मॅथेमॅटिक्स: भिंतींची शाळा

Update: 2020-09-19 04:29 GMT

माझा जीवलग मित्र Rahul Kardile, IAS हा चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. काही महिने आधी राहुलने चंद्रपूर जिल्ह्यात परसबागा फुलवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्याची यशस्वी मोहीम राबवली, त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक झाले. आता राहुल त्याच्या "मिशन मॅथेमॅटिक्स" साठी देशभरातल्या मीडियात झळकत आहे.

अलीकडे कोरोनाच्या काळात जेव्हा सगळ्या शाळा बंद आहेत, तेव्हा शहरांमध्ये सुखवस्तू कुटुंबातली मुले स्मार्टफोनच्या माध्यमातून e-learning करतायत. पण, चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात जिथे आर्थिक विकास झालेला नाही, तिथल्या जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शिक्षणात कोरोनाने अडथळा आणला. आणि इथे राहुलची नेहमीची संकटातून वाट काढण्याची कल्पक वृत्ती कामी आली.

 

गेल्या काही दिवसांत राहुलने त्याच्या काही नव्या दमाच्या स्थानिक सवंगड्यासोबत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर गणित आणि इंग्रजीचे धडे रंगवून टाकले. ज्या भिंती आधी फुकटच्या जाहिरातीनी विद्रुप झाल्या होत्या.

तिथे गणितातली प्रमेये, सूत्रे, पाढे, इंग्रजीतले स्पेलिंग आणि उच्चार सुबक पद्धतीने झळकले. खेडोपाडीच्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी शाळेतला अभ्यास त्यांच्या घराजवळ आणला.

प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी आणि लोकाभिमुख असावे. हा वस्तुपाठ राहुल कर्डीलेसारखे नव्या पिढीचे प्रशासकीय अधिकारी आपल्या सर्वांनाच देत आहेत. अधिकारांपेक्षा आणि सरकारी बडेजावापेक्षा जनसेवा जास्त महत्वाची आहे. हे नेहमी बोलून दाखवणाऱ्या आणि त्यानुसार वागून दाखवणाऱ्या राहुलला त्याच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा

 

Similar News