लालूप्रसाद यादव हा गेली साधारण अडीच-तीन दशके भारतीय राजकारणातील टिंगलीचा विषय बनला आहे. गावरान दिसणाऱ्या माणसाची नक्कल करण्यात शहरी लोकांना मजा वाटत असते. आणि ही नक्कल टीव्हीच्या खोक्यासमोर बसलेली गावरान माणसंही मिटक्या मारत पाहात असतात. ही नक्कल करण्यामागची पांढरपेशी मानसिकता त्यांच्या लक्षात येत नाही. ही आपलीच टिंगल आहे. हे त्यांच्या ध्यानात येत नाही.
त्यामुळे लालूप्रसाद हा भारतीय राजकारणातील विडंबनाचाही विषय बनला. टीव्ही वाहिन्यांचा प्रसार आणि लालूप्रसाद यादव यांचे राजकारण एकाचकाळात तेजीत आल्यामुळे लालूप्रसाद हे देशपातळीवर लोकप्रिय बनले.
लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळा प्रकरणातील दोषी आहेत, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. कायद्यानुसार ते त्याची शिक्षा भोगत आहेत. अर्थात भ्रष्टाचारी एकटे लालूप्रसाद नाहीत. इथल्या सगळ्याच राजकारण्यांना भ्रष्टाचाराचा रोग लागला आहे.
डाव्या पक्षाचे काही सन्माननीय अपवाद वगळता भ्रष्टाचारात सर्वपक्षीय मंडळी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी असताना बंगारू लक्ष्मण यांना तर टेबलाखालून पैसे घेताना कॅमेऱ्यात पकडले होते. हवाला रॅकेटमध्ये लालकृष्ण अडवाणींपासून अनेकांची नावे आली होती. नोटाबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मानले जाते. आता पीएमकेअर्स त्याला मागे टाकतेय का हेच बघावे लागेल. तर मुद्दा असा आहे की, जेव्हा कुणी राजकीय नेता भ्रष्टाचाऱ्याकडे बोट दाखवतो. तेव्हा चार बोटे त्याच्या स्वतःकडे असतात, हे विसरून चालत नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन राजकीय नेत्यांच्या भूमिकांचा विचार केला तर काय दिसते ?
बाबरी मशीद पाडल्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि जातीयवादी असे राजकारणाचे दोन तट पडले. काँग्रेस आणि भाजपकडे त्यांचे नेतृत्व राहिले. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार किंवा आघाडीमध्ये सहभागी न झालेले एकमेव नेते म्हणून लालूप्रसाद यादव यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याजोडीला आणखी एक नाव होते, ते शरद पवारांचे !
पण २०१४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या सरकारला एकतर्फी पाठिंबा जाहीर करून पवारांनी आपल्यावरचा कट्टर धर्मनिरपेक्षतेचा डाग पुसून टाकला. नीतिशकुमार दीर्घकाळ भाजपच्या कँपमध्ये आहेत, परंतु लालूप्रसाद यादव यांनी धर्मनिरपेक्ष भूमिकेबद्दल कधीच तडजोड केली नाही. या भूमिकेची किंमत त्यांना वेळोवेळी चुकवावी लागत आहे. वाजपेयींचे सरकार होते, तेव्हा लालू लोकसभेत होते. त्यावेळी वाजपेयी आणि अडवाणी यांना संसदेत वाक्चातुर्याने निरुत्तर करणारे एकटे लालूप्रसाद यादव होते. भारतीय जनता पक्षाचे नामकरण ‘भारत जलाओ पार्टी’ असे त्यांनी त्याचवेळी केले होते.
लालूप्रसाद यांच्या बदनामीची मोहीम भाजपने सातत्याने चालवली. त्यामागे त्यांचा आणखी एक सेल आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती, तेव्हा त्यांचा रथ बिहारमध्येच अडवून लालूप्रसाद यांनी त्यांना अटक केली होती. त्यावेळी भाजपने व्हीपी सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडले होते. अडवाणींना अटक केल्यामुळे लालूप्रसाद भाजपच्या नेहमीच हिटलिस्टवर राहिले. परंतु लालूप्रसाद यांनी त्याची पर्वा केली नाही.
राष्ट्रीय राजकारणातले चित्र पाहिले तर असे दिसते की, लालूप्रसाद हे काँग्रेसचे सर्वात निष्ठावान सहकारी होते. सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून जेव्हा शरद पवारांसह सगळ्यांनी रान उठवले होते, तेव्हा एकटे लालूप्रसाद त्यांच्या समर्थनार्थ उरले होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या उपकाराची कदर केली नाही. २००९च्या निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या आणि लालूंची गरज उरली नाही तेव्हा युपीए-२ मध्ये त्यांनी लालूंना घेतले नाही. तेव्हापासून खऱ्या अर्थाने लालूंचा वनवास सुरू आहे.
Lalu Prasad Yadav, Nitish kumar
नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये लोकसभा निवडणुकीत सगळ्यांना फटका बसला, तसा तो लालूंच्या पक्षालाही बसला. परंतु त्यापासून धडा घेऊन २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नीतिशकुमार यांच्याशी जमवून घेतले. भाजपने नीतिशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर त्यांनी सर्व वाद विसरून नीतिशकुमार यांचे सरकार वाचवले. नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या निवडणुका लढवण्यास संमती दिली.
नीतिशकुमार यांनी भूतकाळात लालूप्रसाद यांच्याविरोधात कठोरातील कठोर शब्दांत टीका केली आहे. परंतु ती कटूता लालूंनी मनात ठेवली नाही. भाजपच्या रुपाने येणाऱ्या मोठ्या राक्षसाला रोखायचे असेल, बिहारचे सामाजिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून तडजोड केली. नीतिशकुमार ज्युनिअर असले तरी त्यांचे नेतृत्व स्वीकारण्यात कमीपणा मानला नाही. काँग्रेसलाही सोबत घेतले. या सगळ्यातून २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमधले धर्मनिरपेक्ष पक्षांचे यश साकारले.
लालूप्रसाद यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. जबतक है समोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू…ही आपलीच घोषणा त्यांनी पुन्हा एकदा सार्थ करून दाखवली. परंतु नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा दगा दिला. त्यांनी काही काळानंतर लालूप्रसाद यांचे बोट सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले.
लालूप्रसाद यादव यांचे पुन्हा वाईट दिवस आले. भल्या भल्यांनी मोदी-शहांसमोर गुडघे टेकले आहेत, परंतु लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्याशी तडजोड केली नाही. त्यासाठीची किंमत ते आजही चुकवत आहेत.
(कालच लालूप्रसाद यांचा ७२ वा वाढदिवस झाला. लालूप्रसाद यांच्यासंदर्भात चार वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख किरकोळ नव्या संदर्भांसह)