कॉर्पोरेट भांडवलशाहीचं छोट्या उद्योगांवर वर्चस्व वाढल्यास काय होईल?
देशातील अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांचं खाजगीकरण होत असताना कॉर्पोरेट भांडववशाहीच्या नव्या रुपाने देशातील छोट्या उद्योगावर काय परिणाम होईल? जाणून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून;
ओला / उबेर / झोमॅटो / स्विगी / ओयो/ गोबिगो / ऍमेझॉन / फ्लिपकार्ट / युट्युब / विविध प्लॅटफॉर्म्स यांचे राजकीय आर्थिक अन्वयार्थ काय आहे याचा आपण कधी विचार केला आहे का?
जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाही आपल्या भांडवलावर जास्तीतजास्त परतावा मिळवण्याचे लाईफ मिशन न विसरता सतत विकसित असते. सतत विकसित होणारी ही प्रणाली समजून घेणे आव्हानात्मक आहे.
उदा. मागच्या शतकातील वस्तुमाल उत्पादनाच्या फॉरमॅट मध्ये बडे / कॉर्पोरट भांडवल स्वतः प्रत्येक वस्तुमाल तयार करण्याचे अध्याहृत होते, त्यात अनेक बदल झाले आहेत. वरील बदल त्यापैकीच एक
सतत प्रसरण पावणे, नफ्यासाठी सतत नवनवीन गुंतवणुकीची क्षेत्रे शोधणे. हा कॉर्पोरेट भांडवलाचा अंगीभूत गुण आहे. सध्या दोन आघाड्यांवर त्याचे आक्रमण सुरु आहे.
(एक) ज्या सेवा गेली. शेकडो वर्षे सार्वजनिक मालकीच्या सार्वजनिक उपक्रमांमार्फत उत्पादन / पुरवल्या जायच्या त्या सार्वजनिक क्षेत्राकडून हिसकावून घेणे.
(दोन) जो वस्तुमाल / सेवा व्यक्तीकडून / असंघटित / नॉन कॉर्पोरेट / क्षेत्रातून दिल्या जातात. त्या एमएसएमई क्षेत्राला आपले मंडलिक बनवणे.
ही पोस्ट फक्त या दोन नंबरच्या घडामोडींशी संबंधित आहे.
एमएसएमई क्षेत्रात अक्षरशः कोट्यवधी एकेकट्या व्यक्ती, लघु उद्योजक, छोटे दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट चालवणारे, हस्त व्यावसायिक, कारागीर मोडतात.
तांत्रिक दृष्ट्या त्या सर्वांची मालकी खाजगी असते (आमचा खाजगी मालकीला विरोध आहे. अशी पुस्तकी मांडणी करणाऱ्यांनी कृपया याची नोंद घ्यावी )
कॉर्पोरेट भांडवलशाहीचे वरील नवीन आग्रीगेटर बिझनेस मॉडेल या कोट्यवधी लोकांची मालकी हिसकावून घेत नाही; तर त्यांना आपल्या बिझनेस मॉडेल मध्ये सामावून घेऊन दुय्यम स्थान देऊ इच्छिते.
ओला / उबेर : टॅक्सी ड्रायव्हरना
झोमॅटो / स्विग्गी : हॉटेल / रेस्टॉरंट वाल्याना
अमेझॉन / फ्लिपकार्ट : छोट्या दुकानदारांना
ओयो / गोबिगो : हॉटेल / खोल्या / भाड्याने देणाऱ्यांना
ऍमेझॉन: हस्त कारागिरांना
युट्युब / अमेझॉन : संगीत / म्युझिक/ फिल्म्स अल्बम बनवणाऱ्याना
यात अजून भर पडणार आहे.
उदा BYJU घरोघर शाळेच्या मुलांचे शिकवणी / क्लासेस घेणाऱ्या स्त्रियांना आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेऊ शकते.
भविष्यात या व्यक्तीनी धंदा कसा करायचा, कोणता माल विकायचा, कोणत्या दिशेला आपली टॅक्सी न्यायची अशा अगणित गोष्टींवर कॉर्पोरेट भांडवलाचे नियंत्रण असणार आहे. आणि सर्वात महत्वाचे या सर्व वस्तुमाल / सेवांच्या उत्पादनात व वितरणात / ऍक्टिव्हिटीज मध्ये असणारी अंगीभूत जोखीम त्या त्या छोट्या उत्पादकांच्या / व्यक्तींच्या शिरावर राहील. पण या सर्व वस्तुमाल / सेवांच्या उत्पादनात व वितरणात जो वाढावा (सरप्लस ) तयार होतो त्यात कॉर्पोरेट भांडवलशाहीचा वाटा वाढत जाणार आहे.
ज्यांना परिवर्तनाचे राजकारण करायचे आहे. त्यांना हे सगळे समजून घेतल्याशिवाय पर्याय नसेल.
संजीव चांदोरकर (२१ ऑक्टोबर २०२१)