घाटवाटा धुंडाळताना....
महाराष्ट्राला निसर्गसौंदर्याची अद्भुत देणगी मिळाली आहे हे आपण सगळेच जाणतो. सह्याद्री म्हणजे आपला स्वाभिमानच जणू! आपल्याला स्वाभिमान वाटणाऱ्या या सह्याद्रीमध्ये किती घाट आहेत? किती घाटवाटा आहेत? या घाटमाथ्यावर वसलेली गावं कोणती आहेत? याबद्दल इत्थंभूत माहिती जाणून घ्यायची असेल तर संतोष डुकरे यांचा हा लेख आवर्जून वाचायला हवा...;
सह्याद्रीतील घाटवाटा म्हणजे महाराष्ट्राच्या धमण्या आणि रक्तवाहिन्या. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात या घाटवाटांचा अतिशय महत्वाचा वाटा. मग तो प्राचिन अर्थकारणाचा वसा व वारसा सांगणारा, दख्खनच्या पठाराची नाळ जगाशी जोडणारा नानेघाट असो वा इगतपुरीचा कसारा. खंडाळा, ताम्हिणी ते अगदी कोल्हापूरच्या फोंडा, आंबोली सह सह्याद्री आणि सातपुड्यातील उभ्या आडव्या घाटवाटांचे जाळे आजही आपले महत्व अबाधीत ठेवून आहे.
पुर्वी खंडाळा, माळशेज सारख्या एखाद दुसऱ्या घाटाभोवती ठराविक काळ फिरणारं घाटवाटा पर्यंटन आता बारमाही होते आहे. घाटवाटांचे ट्रेक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यात ट्रेकर, पर्यटकांना साद घालणारी विपूल आव्हानं आहेत आणि स्थानिकांना चांगल्या रोजगार व व्यवसायिक संधीही. व्यवसायिक वाटाड्या, घरगुती निवास व भोजन व्यवस्था आणि टेंटमध्ये मुक्कामाची व्यवस्था करणारी कॅम्पसाईट यांची साखळी घाटवाटा व त्यासंलग्न किल्ल्यांच्या आसपास विकसित होते आहे. हळूहळू का असेना स्थानिक आदिवासी तरुणांच्या यशोगाथा घडत आहेत. या सर्व पैलूंच्या अनुषंगाने घाटवाटा व संलग्न बाबींचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.
- डोंगरवाट, जंगलवाट, घाटवाट
प्रत्येक घाटवाट ही डोंगरवाट असते. मात्र प्रत्येक डोंगरवाट ही घाटवाट नसते. त्या डोंगरानुसार घाटवाटेची नजाकत बदलते. जसं जंगलवाटेचं सौंदर्य ती ज्या प्रकारच्या जंगलातून जाते त्यानुसार बदलत जाते तसंच घाटवाटांचही. घाट आणि घाटाच्या वर राहणारी लोकं म्हणजे घाटी, ही संकल्पना मराठी जनमानसात शेकडो वर्षापासून रुजलेली असावी. पुढे इंग्रजांनी भारताच्या पुर्व व पश्चिम दोन्ही किनारपट्यांवरून देशांतर्गत भागात विस्तार सुरु केल्यानंतर डोंगररांगा आडव्या आल्या आणि त्यांचे नामकरण करताना त्यांनी इथल्या मातीत रुजलेल्या घाट शब्दाला त्यांचा दृष्टिकोन जोडत ईस्टर्न घाट (पूर्व घाट) आणि पश्चिम घाट (वेस्टर्न घाट) असे नामकरण केलं. ते बरेच दिवस कायम होतं. पुढे शासनदरबारी पूर्व घाट कायम राहीला, मात्र पश्चिम घाटाचा सह्याद्री आणि पश्चिम सह्याद्री असे नामरुपांतरण झाले. वापराच्या प्रकारानुसार घाटवाटांचे अनेक प्रकार पडतात. रेल्वे जाणारे, मोटरगाडी जाणारे, पाऊलवाटेचे आणि प्रस्तरारोहन तंत्र अत्यावश्यक असलेले असे साधारणतः चार ढोबळ प्रकार आहेत.
घाटवाटांच्या देशा...
महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीचा सागर किणारा लाभलाय. तसा सह्याद्रीचा सर्वाधिक सहवासही महाराष्ट्राला लाभलाय. त्याच्या मुख्य रांगेसोबत पुर्व पश्चिम विस्तारलेल्या डोंगररांगाही आहेतच. या सर्वामध्ये असंख्य ज्ञात अज्ञात घाटवाटा आजही वापरात आहेत. काही घाटवाटा इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आहेत तर काही नव्याने रुप पालटत पर्यटकांच्या, साहसवीरांच्या भावविश्वात रुंजी घालत आहेत. घाट व त्यासंलग्न खिंडी हिमालयातही आहेत आणि पश्चिम व पुर्व घाटासंलग्न इतर राज्यांतही. घाटच नाही अशीही काही राज्य असू शकतील. पण या सर्वात महाराष्ट्र आणि घाटवाटा हे जे काही समिकरण आहे, ते एकमेकाद्वितीय आहे.
घाटदार लोकसाहित्य
घाटवाटा आणि मराठी भावविश्व याचं अतुट नातं आहे. लोकसाहित्यात, लोकगितात, कथा, कविता, कादंबऱ्यांत ते अगदी मुरलेल्या राजकारणातही घाटवाटांनी आपली अमिट छाप सोडलेली आहे. मग एखादी सासुरवाशीन जात्यावर दळता दळता घाटापलीकडून येणाऱ्या भाऊरायाला साद घालते, एखादी लावण्यवती आपल्या रायाच्या आठवणीत हुरहुरत आपल्या जवानीचा घाट घालते तर एखादा पक्का मुरलेला राजकारणी आपल्या प्रतीस्पर्ध्याला कात्रज चा घाट दाखवतो. आचार्य अत्रेंच्या साहित्यात तर खंडाळा घाटाची पखरण आहेच. याशिवायही खुप काही सापडतं प्रत्यक्ष घाटवाट चालताना...
मुळात घाटवाट ही फक्त चालण्याची गोष्ट नाही. ती पाहण्याची आहे, तेवढीच ऐकण्याची, अनुभवण्याची आणि त्यातील अनुभुती अंगभर, मन व मेंदूभर रुजवण्याचीही गोष्ट आहे. त्या त्या घाटासंबंधीत कथा, कहाण्या, किस्से यांचा खजिना स्थानिकांकडून ऐकायला मिळतो. तो लुटला नाही तर काय घाटवाट पाहिली. तुम्ही किती घाट पाहिलेत, किती घाटवाटा केल्यात याला महत्व नाही. तुम्ही त्या घाटवाटेचा ठेवा किती समग्रतेने, तल्लिनतेने काळजात शोषून घेतलाय ते महत्वाचं. नुसतं भोज्याला हात लावून पळायचं तर त्यासाठी घाटवाटा हे क्षेत्र नाही. त्यासाठी इतर तिर्थक्षेत्र आहेत.
घाटवाट अंगी मुरवताना...
ज्ञात असो वा अज्ञात पण प्रत्येक घाटाला इतिहास असतो. भुगोल हा तर त्याचा पाया आहेच, पण वनस्पतीशास्र, प्राणीशास्र, सुक्ष्मजीवशास्र, अर्थशास्र, नागरिकशास्र, मानसशास्र, समाजशास्रानंही तो अलंकृत असतो. एक घाट समजून घ्यायचा तर एक वारी पुरेशी ठरेल असे नाही. अर्थात तुम्ही कोणत्या वारीचे वारकरी त्यावरही बरंच काही अवलंबून. उदाहरणादाखल विचार करायचा तर महाराष्ट्राच्या इतिहासाची शेकडो पानं एकट्या नानेघाटाच्या वाटेभोवती गुंफलेली आहेत. त्याला महाराष्ट्राच्या सर्वांगिण समृद्धीचा ऐतिहासिक महामार्ग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्राच्या कैक राजधान्या नानेघाटाच्या वाटेवर उदयास आल्या, वाढल्या, विस्तारल्या आणि लयास गेल्या... याच नानेघाटवाटेवर (कल्याण ते पैठण मार्ग) महाराष्ट्रानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, प्रयोग झाला, शिवजन्म झाला आणि अवघ्या विश्वाला स्वराज्याचा नवा अर्थ, नवा आयाम देणाऱ्या स्वराज्य संस्थापक शिवरायांचा जन्मही याच वाटेवरील. या एका वाटेला येवून मिळणारे, उर्वरीत महाराष्ट्राला या व्यापारी मार्गाला जोडणारे उभे आडवे असे असंख्य घाट आहेत. या सर्व शिरा आणि धमण्यांतून महाराष्ट्राचा साम्राज्यविस्तार, धर्मविस्तार आणि इतर सर्व आयामांचे विस्तार झाले आहेत ही बाब ध्यानात घेतली तर घाटवाट तुडवताना तिचे आयामही आपसूक बदलून जातात. आपलं घाटवाट तुडवणं स्वतःला अधिक समृद्ध करणारं ठरतं.
जुन्नर आणि घाटवाट
जुन्नर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीतील अशा मोजक्या तालुक्यांपैकी एक आहे की जो जगाशी घाटवाटांनी जोडला गेला आहे. पुर्वेला गुळंचवाडी - आणे घाट, पश्चिमेला माळशेज, नानेघाट, दाऱ्याघाट, दक्षिणेला पेठ अवसरी घाट तर उत्तरेला अकोले व जुन्नर तालुक्याच्या सिमेवरील अनेक घाटांचे दक्षिणोत्तर जाळे. त्याही पुढे जायचं तर चंदनापुरीचा घाट. या घाटांचा, डोंगररांगाचा जुन्नरच्या सर्व क्षेत्रांवर मोठा प्रभाव आहे. इथं स्थानिक मायक्रोक्लायमेट डेव्हलप होण्यापासून अनेक गोष्टी आहेत. विविधता आहे त्याच्या मुळाशी ही सर्व नैसर्गिक यंत्रणा आहे. जुन्नरमधील सर्व किल्ल्यांचे जाळे हे ही घाटवाटांभोवती, त्यांना संरक्षण देण्यासाठी वा त्यांच्या अनुषंगाने सत्ता राखण्यासाठी आहेत. हरिश्चंद्रगड, सिंदोळा, भैरवगड, निमगिरी, हनुमंतगड, हडसर, जिवधन, चावंड, शिवनेरी, नारायणगड, दुर्ग व ढाकोबा हे सर्व या वाटांवर पहारा देते आहेत. त्यांना पाठबळ देते आहेत. आजही जुन्नरच्या जनजीवनात या घाटवाटांचे महत्व अनन्यसाधारण आहे. घाटवाटा समजून घेताना, पर्यटकांना, ट्रेकर्स मंडळींना त्याची अनुभूती देताना हे सर्व संदर्भ आयाम महत्वाचे ठरतात.
घाटांची गावं
एकट्या जुन्नर तालुक्याचा विचार केला तर सह्याद्रीच्या मुख्य गाभ्याला भिडलेली खिरेश्वर, खुबी, तळेरान, निमगिरी, देवळे, अंजनावळे, घाटघर, फागुळ गव्हाण, आंबोली, भिवडे बुद्रुक, हातवीज ही गावं आणि पश्चिम पूर्व रांगांमधील कोल्हेवाडी, सांगनोरे, कोपरे, जांभुळशी, मांडवे, मुथाळणे, चिल्हेवाडी, आंबेगव्हाण, ओतूर, खामुंडी, आणे, नळावणे, गुळंचवाडी, औरंगपूर-निमगाव सावा ही सर्व गावे घाटांची गावे आहेत. आणि त्याही सर्वाधिक घाट गेलेल्या गावांचा विचार केला तर त्यात आंबोली, अंजनावळे, तळेरान आणि खिरेश्वर या चार गावांचा अग्रक्रम लागतो.
जुन्नर तालुक्यातील घाटसमुह
जुन्नर तालुक्यात सुमारे 25 हून अधिक घाटवाटा आहेत. त्यांची वर्गवारी करायची झाल्यास हरिश्चंद्रगड घाटसमुह, नानेघाट घाटसमुह, दाऱ्याघाट घाटसमुह, भिमाशंकर घाटसमुह आणि इतर असा विचार करता येईल. साध्या सोप्या सुखद अनुभूतीपासून जीवघेणा थरार देणाऱ्या सर्व ग्रेडच्या घाटवाटांचा यात समावेश आहे. तुम्ही अजान बालक असा वा एव्हरेस्टवीर प्रत्येकाला जुन्नरच्या घाटवाटा अमर्यात आनंद व अनुभूती देतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या घाटवाटा पर्यटनात नानेघाट आणि माळशेज अग्रस्थानी आहेत, यात नवल नाही. जुन्नरमधील काही घाटवाटांचा अल्पपरिचय पुढीलप्रमाणे...
1) डोणीदार
- त्रिगुण धारा या नावानेही ओळखली जाते.
- दुर्गवाडी व आंबेगावच्या हद्दीवर .
- जुन्नरमधून आंबेगावमध्ये जाणारी घाटवाट
2 ) खुटेदार
- दुर्गवाडी (जुन्नर) ते रामपूर (मुरबाड) वाट
- दुर्ग, ढाकोबा, गडद लेणी यांच्याजवळ
- दुय्यम वाट, मात्र ऐतिहासिक वापराच्या पाऊलखुणा
- उभ्या कातळात ठिकठिकाणी खोदलेल्या खोबण्यांच्या रांगा
- सोप्या श्रेणीचे अनेक कातळारोहण टप्पे, उतराई अवघड, पावसाळ्यात टाळावी.
- रामपूर व दुर्गवाडी दोन्ही ठिकाणी मंदीरात मुक्काम शक्य
- या वाटेला साधारणतः 4 तास लागतात
3) दाऱ्याघाट
- मीना नदीच्या खोऱ्यातून कोकणात डोकावणारी घळ
- आंबोली (जुन्नर) ते धसई (मुरबाड), दुर्ग, ढाकोबाचा शेजार
- नाळेत खोदीव पावठ्या ट्रेकर्सनी नोंदवल्या आहेत.
- घाट उतरायला लागल्यावर माथ्यापाशी झरा - घाटाच्या तळाशी रांजणखळग्यांमध्ये फेब्रुवारीपर्यंत पाणी
- तांत्रिक कातळारोहणाची आवश्यकता भासत नाही.
4) रिठ्याचं दार
5) घोडे पाण्याचं दार
- या दोन्ही वाटा आंबोली जवळ येतात
- दाऱ्या घाटाजवळच आहे. संलग्न वाटा
6) नाणेघाट
7) भोरांडेची नाळ
- नानेघाटाच्या शेजारीच
8) नांगरदरा
- भैरवगड (मोरोशी) ते अंजनावळे
- अतिशय अवघड, फिटनेसचा अंत पाहणारी, पावसाळ्यात न करण्याची
- फेब्रुवारीनंतर गिर्यारोहणातील ज्ञानी व अनुभवी व्यक्तीसोबतच करावी.
9) अस्वलदरा घाटवाट
- नांगरदरा वाटेच्या शेजारी
10) भोजदारा - तळेरान घाटवाट
- शिनलोप डोंगर, वाघ्या डोंगर, भोजदारा डोंगर, दिवाणपाडा माथा, आणि अंजणावळ्याचा व-हाडी डोंगर
- या ठिकाणाहून विविध घाटवाटांनी माळशेज घाटात उतरता येते.
- यापैकी ऐतिहासिक मार्ग म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खिंडीचा मार्ग.
- यावाटेवर पुरातन कातळकोरीव टाक्या पहावयास मिळतात.
11) जुनी माळशेज घाटवाट
- एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूने खाली उतरणारी
- हीच वाट खालच्या दिशेने पुढे काळू धबधब्याकडेही जाते.
12) जुन्नर दरवाजा मार्गे हरीचंद्रगड
- खिरेश्वर ते हरिश्चंद्रगड, अतिशय सुंदर मार्ग
- उजव्या हाताला नेढं, डाकीकडे विस्तिर्ण पठारं
13) टोलार खिंड घाटवाट
- खिरेश्वर - टोलार खिंड - हरिश्चंद्रगड
- जुन्नर व अकोले तालुक्यांना जोडणारी महत्वाची खिंड
14) म्हसवंडी घाट
- पिंपरी पेंढार ते म्हसवंडी
15) वाघाचं द्वार घाटवाट
- आडोशी ते आवळ्याची वाडी
- थोडी नामशेष झाली आहे
16) औरंगपूर - गांजवेवाडी घाटवाट
- भागडोबा डोंगररांग.
- पुर्वी राजरोस वापरातली. आता फक्त गुराख्यांकडून वापर
17) निमगाव सावा/सुलतानपूर - भागडी घाटवाट
- भागडोबा डोंगररांगांच्या माथ्यावरुन जाणारी वाट
- कॅनाल ही पाऊलवाट पासून सुरु होते.
- पुढे डोंगरमाथ्यावर जावून संपूर्ण डोंगररांग ओलांडून भागडोबा जवळ उतरते
18) आणे घाट
- गुळंचवाडी व आणे यांना जोडणारी वाट
- याच वाटेचे रुंदीकरण करुन पक्का रस्ता आणि नंतर महामार्ग
- या वाटेच्या पॅरलल पाण्याच्या प्रवाहालगत पायवाट
- या व्हॅलीत जुन्नरमधील सर्वोत मोठा नैसर्गिक पूल
- अतिशय सुंदर वनसंपदा, पक्षिसंपदा व जैवविविधता
- चांगल्या पावसाचा भाग व दुष्काळी भाग यांच्या सिमेवर
19) वाघोबाचा घाट
- वाघाबोच डोंगर, व्याघ्रशिल्प
- मांदारणे - मुथाळणे - मांडवे
- राजूर, जांभुळशी, कोतुळ, फोफसंडी इ. भागातील वाड्या वस्त्यातुन दररोज सुमारे 50 पिकअपमधून सुमारे 2 ते अडीच हजार लोकं दररोज कामाला येतात.
20) खामुडी - बदगी बेलापूर घाट
- डांबरी रस्ता, मुथाळणे सारखाच मोठा घाट
- लोड च्या गाड्या जात नाहीत, जाग्यावर चढ व टर्न
21) लागाचा घाट
- ओतूर - ब्राम्हणवाडा
- नाशिक हायवेला पॅरलल वापरला जातो.
22) इतर घाटवाटा
- नळावणे घाटवाटा
- दावल मलीक देवस्थाने घाटवाटा
- दुर्गवाडीकडून डिंभेला जाणारी खोदीव पायऱ्यांची ऐतिहासिक घाटवाट
- इत्यादी
गाईड आणि घाटवाटा
घाटावाटांचे वाटाडे म्हणून काम करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील, विशेषतः आदिवासी भागातील तरुणांना विपूल संधी आहेत. पर्यटनाच्या अनुषंगाने विचार केला तर गाईड किंवा वाटाड्या हा फक्त वाट दाखवणारा नसतो. त्याहून अधिक जबाबदारी त्याच्यावर असते. ती वाट, तो घाट, तो परिसर, त्याच्याशी संलग्न इतिहास, लोकांच जगणं आणि संलग्न सर्व आसमंत पर्यटकासमोर, ट्रेकरसमोर खुला करुन आयुष्यभरासाठी त्या भागाशी त्या व्यक्तीची नाळ जोडू शकला तर तो गाईड संबंधीत ट्रेकरचा आयुष्यभराचा साथीदार होतो. त्यासाठी इतिहास व वर्तमानाची गुंफण घालणं, वर उल्लेख केलेल्या घाटवाटांसंबंधीत सर्व शास्रांची पर्यटकांसमोर लिलया उकल करणं, त्याला आपल्या बोलीची, त्यातील रंजक बाबींची साथ देणं, तुमचा सहवास त्यांच्यासाठी आश्वासक व सुखद करणं आणि हे करता करता संबंधीत पर्यटकाची सुरक्षा व वैयक्तिक स्पेस, एकांत जपणे महत्वाचे आहे.
जबाबदारी पर्यटक घडवण्याची.
चांगला गाईड व अनुभवी ट्रेकर यांची अलिखित जबाबदारी असते जबाबदार पर्यटक व ट्रेकर घडवण्याची. यासाठी मॉब किंवा गृप हँडलिंग आणि सेफ्टी च्या अनुषंगाने नो मिन्स नो चे स्किल आणि ठामपणा स्वतःत विकसित करायला हवाच. पर्यटकांच्या सुरक्षेचीही जबाबदारी गाईडवर असते. घाटवाटांच्या ट्रेकमध्ये मोहाचे अनेक क्षण येतात. कधी मनोहारी धबधबे तर कधी विहंगम कोकणकडे साद घालतात. अशा वेळी संभाव्य धोके, डु अॅन्ड डोन्ट ची जाणिव त्यांना करून देणे आणि त्यासाठी प्रसंगी कठोर होणे जमले पाहिजे.
घाटवाटांचे संदर्भ साहित्य
घाटवाटा संदर्भात विपूल संदर्भ साहित्य आपल्या आसपास उपलब्ध आहे. ते धुडाळायची, अभ्यासायची,पुस्तकं व मानसं वाचायची सवय जोडून घ्यायला हवीच. घाटवाटा संदर्भात डॉ प्रिती पटेल यांचे भटकंती घाटवाटांची आणि आनंद पाळंदे सरांचं चढाई उतराई सह्याद्रीतील घाटवाटांची ही पुस्तकं अतिशय उत्तम आहेत. त्याशिवाय गुगल गेल्यास अनेक ट्रेकर मंडळींचे घाटवाटांच्या अनुभवाचा मौल्यवान ठेवा असलेले ब्लॉग, लेख सापडतात. त्याशिवाय आपल्या परिचयातील ट्रेकर मंडळींचे मार्गदर्शनही मौल्यवान ठरते. मोहिमेच्या पूर्वतयारीचा हा संस्कार प्रत्येकानं स्वतःवर बिंबवून घ्यायलाच हवा.
हे सर्व करायचं तर गाईडनं आपलं वैयक्तिक शारिरिक व मानसिक आरोग्यही उत्तम राखणं आवश्यक असतं. गुटखा खाणारा, तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणारा, आपल्या भागाशी, इतिहासाशी, वैशिष्ट्यांशी भावनिक, अस्मितीक नातं नसलेला गाईड कोणाला हवाहवासा वाटेल ? महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यातील लोकप्रिय गाईड, वाटाड्यांचा अभ्यास केला तर त्यांचं त्या वाटेशी, त्या घाटाशी वा वास्तुशी असलेलं समर्पन पटकन नजरेस भरतं. गाईड वा इतर पर्यटनपुरक व्यवसायिक म्हणून उभे राहू पाहणाऱ्या तरुणांनी या बाबी काळजीपुर्वक अभ्यासणे आणि उत्तमोत्तम ते आत्मसाद करणे गरजेचे आहे.
जुन्नर वन विभाग यासाठी विशेष प्रयत्न करतो आहे, आदिवासी भागातील तरुणांना पर्यटन गाईड म्हणून प्रशिक्षित करतो आहे. त्यांच्या व्यवसाय विकासासाठी हातभार लावतो आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. त्याबद्दल जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अजित शिंदे आणि त्यांच्या सर्व टिमचे मनपुर्वक अभिनंदन.
संतोष डुकरे
- संचालक, शेकरू आऊटडोअर्स
- सचिव, शिवनेरी ट्रेकर्स, जुन्नर
- - -