युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध क्षेत्रातील कार्य कर्तुत्वाचा वेध घेणारा आश्विनी गावंडे यांचा लेख नक्की वाचा…;
सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा
ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा
ना सागराचा ना कूजनाचा
ना आमंत्रक ओठातील हसण्याचा
सर्वात मधुर स्वर कोठेतरी कुणाच्यातरी मनगटातील श्रृंखला खळखळा तुटण्याचा.
कुसुमाग्रज
शेकडो वर्ष गुलामगिरीच्या शृंखला मनरूपी मनगटात बांधून ठेवणाऱ्या खळखळा तोडणारा एकच तो युगपुरुष म्हणजे शिवाजी महाराज. स्वतंत्रतेची आस दाखविणारा आणि स्वतःची (लोकांची स्वतःची स्वतःच्या मनात)अस्मिता निर्माण करणाऱ्या या शिवाजी महाराजांचे महत्त्व आचंद्र सूर्य अबाधित राहील .
कारण निराकार हिंदवी स्वराज्याला प्रत्येकाच्या मनात आकार देणे. आणि मग स्वतःचे प्राण पणाला लावून प्रसंगी अर्पण करून ते साकारण्यात बाध्य करायला लावणारा हा योगी म्हणजे कोणी साधासुधा व्यक्ती असूच शकत नाही.
ज्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत.जो अनेकांगी आहे तोच हे करू जाणे. गेले चारशे वर्ष अखंड अविरत डोक्यावर घेणाऱ्या या महाराष्ट्राच्या किंबहुना विश्वाच्या दैवताला आज खरोखरच डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
डोक्यावर घेणे याचा अर्थ दैवत म्हणून शिरावर घेणे अभिप्रेत आहे. आणि आज डोक्यात घेणे याचा अर्थ त्यांची शिकवण त्यांचे नितीनियम वापरून स्वतःचे आयुष्य घडवण्याचे दिवस आले आहेत.असे म्हणणे आजच्या या 21व्या शतकात अशासाठी शोभनीय आहेत की शिवाजी महाराजांना दैवत्व प्रदान करून त्यांच्या निती नियम पालन आणि प्रयत्न यापासून स्वतःला विभक्त करून मानवी जीवनातील मानवी प्रयत्नांचे महत्त्व कमी करत आहोत.
मी शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जेव्हा अवलोकन करते तेव्हा ते कोण होते? व्यवस्थापन तज्ञ, इंजिनियर, मानसोपचार तज्ञ, मोटिव्हेशनल स्पीकर ,शास्त्रज्ञ, एच आर मॅनेजर, राजकारणी, उद्योजक ,अर्थशास्त्री ,अभिनय शिकवणारे ,माणसाची अचूक पारखं करणारे की वेळेवर योग्य निर्णय घेणारे.
आजच्या आधुनिक जगातील कितीही वैशिष्ट्यपूर्ण नामाभिधाने त्यांना लावली तरी त्यांचं वर्णन पूर्ण होऊच शकत नाही. उच्च प्रतीचे मानव घडवणारी विख्यात विद्यापीठे जी काही पायाभूत तत्वे शिकवतात, आणि जगाला दिशा देणारे नागरिक घडवतात. असं एकूण -एक नामा भिधान ज्याला आपण प्रदान करू शकू असं प्रत्यक्ष जगणारा , कर्तुत्ववान पुरुष आपल्याच मातीत आपल्यातलाच झाला आहे. म्हणून शिवाजी महाराज हे हृदयात मनात आणि डोक्यात घेण्याची गोष्ट आहे जे प्रत्यक्ष जगणं शिकवतात.
जगात माणसं अपयशी होण्याची मुख्यतः दोन कारणे असतात
1) नुसतेच काम करणारे त्यामागे काही विचारच करत नाहीत.
2) किंवा नुसतेच विचार करणारे त्यामागे प्रत्यक्ष कृती शून्य.
जशी माणसं अयशस्वी होण्याची कारण आहेत तसेच व्यवस्था अयशस्वी होण्याचा देखील कारण आहेत. ते म्हणजे अधिकार आणि कर्तव्य यातील असमतोल. याचा अर्थ काम करताना कर्तव्य भरपूर परंतु अधिकार काहीच नाही. याचीच दुसरी बाजू अशी की काम करताना अधिकार भरपूर आणि कर्तव्य काहीच नाहीत. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास चाचपडताना एवढी जाणीव मात्र होते की व्यक्ती आणि व्यवस्था यांचे योग्य व्यवस्थापन करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज.
म्हणून संपूर्ण पन्नास वर्षाच्या जगण्यात एकही अपयश पदरी नाही. शिवाजी महाराजांचे यश हे अपघाताने मिळालेली गोष्ट नाही, की आपण दैवत्व प्रदान केले म्हणून मिळालेले नाही. त्यामागे आहे ते सातत्यपूर्ण अभ्यास , अचूक योजना, अंमलबजावणी व पार पाडलेल्या कामाचे मूल्यमापन.
आजचे व्यवस्थापन तंत्र सांगते की मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी तीन गोष्टी फार महत्त्वाच्या .
एक म्हणजे माणसाच्या आयुष्याला उद्देश(मिशन) असला पाहिजे.
दुसरं म्हणजे दृष्टी (व्हिजन) आणि
तिसरं म्हणजे म्हणजे कृती(ॲक्शन).
शहाजीराजे आणि जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या जीवनाचे ध्येय अर्थात उद्देश अर्थात मिशन दिलंच होतं "स्वराज्य स्थापनेच".
" प्रतिपद चंद्र लेखइव वर्धिष्णु: विश्ववंदिता!
शाह सुनो शिवस्य ईशा मुद्रा भद्राय राजते!!
"अर्थात प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रमाणे शहाजीपुत्र शिवाजीच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल."
आजचे व्यवस्थापन शास्त्र असं सांगते की व्यक्तीला जे व्हायचं आहे. जो त्याच्या आयुष्याचा उद्देश आहे. तो त्याने प्रत्येक वेळी लिहिला पाहिजे. वाचला पाहिजे. वयाच्या बाराव्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना सुपूर्त केलेली हि मुद्रा प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज पत्रावर उमटवत.तेव्हा हे मिशन नजरेसमोर लिहिल्या जात असे.
शिवाजी महाराजांना शहाजीराजे आणि जिजाऊंनी एवढे तयार केलं होतं की वय वर्ष बारापर्यंत शिवाजी महाराजांचा 32 विषयांचा अभ्यास झालेला होता. चैतन्य पक्ष आणि भौतिक पक्षाचे ज्ञान माहिती रूपाने त्यांच्याकडे होतच. बारा वर्षाचा हा मुलगा या दांम्पत्याने किती निष्णात केला असेल, की त्यांच्या हाता खाली काम करायला अष्टप्रधान मंडळ होतं. ज्यांच्या वयाची रेंज ही 16 ते 80 वर्ष वयाची होती.
दुसरे म्हणजे दृष्टी व्हिजन प्रत्येक काम करायला मिशनच्या अनुषंगाने कृती झाली पाहिजे. गरज असेल तेव्हा गाईडलाईन द्यायला मां जिजाऊ होत्या. शेवटचाआणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कृती अर्थात ॲक्शन. गुण प्रदान करणारी जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षा गुणग्राहकता असणारा महत्त्वाचा किंबहुना तोच निर्माता असतो. "निराकार साकार करणारा" दृष्टी आपल्या प्रत्येकाकडेच आहे ."नजर निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आपल्यासाठी करतं."
बाराव्या वर्षी हाती घेतलेलं मिशन वयाच्या 44 व्या वर्षी छत्रपती झाल्यावर खरे तर पूर्ण झाले. आणि विशेष म्हणजे या काळात शिवाजी महाराजांनी स्वतःला एक तसू भरही ध्येयापासून परावृत्त होण्याची संधी दिली नाही. कधी कधी तर असेही वाटते की आताच्या काळात अस्तित्वात असणारी म्हण do or die ही शिवाजी महाराजांच्या काळात do it before die अशी असावी.
वय वर्ष बारा ते पंधरा पूर्ण मावळ प्रांत फिरून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेणे त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं. धरणे बांधणे ,शेतीसाठी लागणारी बियाणे अवजारे पुरवणे, एवढेच नाही तर प्रसंगी त्रास देणारी जंगली श्वापदे मारणे यासारखी पडेल ती कामे शिवाजी महाराजांनी लोकांसाठी केली.
लोकांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य दिले. त्यांच्या जीवनाशी आणि त्यांच्याशी एकरूप झाले."माझं स्वराज्य अर्थात प्रत्येकाचं स्वतःचं राज्य हे बीजारोपण त्यांनी प्रत्येकाच्या मनात केलं .आणि तेथूनच जीवाला जीव देणारी माणसं तयार झाली. म्हणूनच इतिहास सांगतो की शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांना एकही माणूस सोडून गेला नाही उलट त्यांच्या वयाच्या 27 व्या वर्षी आदिलशाहीतील 700 माणसं शिवाजी महाराजांकडे आली.
शिवाजी महाराजांचे पैशांचं व्यवस्थापन इतके जबरदस्त होते की आताच्या हिशोबाने प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा पगार व्हायचा म्हणजे व्हायचाच. हा नियम त्यांच्या संपूर्ण हयातीत चुकला नाही .जेव्हा की 35 वर्षाच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांना नऊ वर्ष मंदीत काढावी लागली, दुष्काळात काढावी लागली ,की चार- चार वर्ष कोणाच्या हाताला काहीच काम नव्हतं अशाही काळात हे पैशांचा व्यवस्थापन ढळलं नाही.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती होण्याचे 17 नियम होते पैकी व्यक्ती निर्व्यसनी असणे हा सर्वात पहिला नियम होता म्हणजे आजही असे म्हणता येईल की "खरा महाराष्ट्र अर्थात स्वराज्य निर्माण झाले तो निर्व्यसनी लोकांच्या बळावरच."
सैनिकांना रोज ताक सक्तीने प्यायला लावणारे शिवाजी महाराज. हा एकमेव राजा असावा इतिहासात. सामान्य लोकांपैकी कोणीही गडावर चढणारा माणूस कुठल्याही कामासाठी येवो पण जेवण केल्याशिवाय परत जाणार नाही .असा प्रत्येक गडावरचा दंडक होता. म्हणून तर हा जाणता राजा.
घोडखिंडीच्या जगप्रसिद्ध लढाईत केवळ तीनशे लोकांनी 16 किलोमीटरची खिंड कव्हर केली. बेचकी ,गोफण आणि विटा (भाल्याचा एक प्रकार) याशिवाय एक हत्यार नाही. शत्रूची पाच हजाराच्या वर माणसे मारली गेली शिवाजी महाराजांची केवळ 23 लोक. हत्यारांचा प्रकार आणि वापरातून दिसतं की स्थानिक उपजत गुणांचा विकास केला तर काय घडू शकतं आपण त्यांच्या अशा तत्त्वांना कधी डोक्यात घेतलंच नाही.
तानाजी मालुसरे यांच्या वाईट अनुभवानंतर तर शिवाजी महाराज पुढे लढायला जाणाऱ्या सैनिकांना आधीच सोन्याचं कडं आणि फेटा बांधत असत. म्हणजे आजच्या व्यवस्थापन तंत्राच्या भाषेत इन्सेंटिव्ह आधीच देत असत.अशा प्रकारची मोटिव्हेशन देणारा बहुतेक जगातला हा पहिलाच राजा असावा म्हणून युगप्रवर्तक. केवळ पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत आदिलशाही, कुतुबशाही ,मुघल इत्यादींना मागे टाकून स्वराज्य सर्वात श्रीमंत राज्य होतं. CEO of the century .Still no one can surpass after 400 years.
स्वराज्याचे नियम इतके जबरदस्त होते की एकदा सूर्यास्तानंतर बंद झालेला किल्ल्याचा दरवाजा खुद्द शिवाजी महाराजांसाठी ही उघडत नसे. नियम म्हणजे स्वराज्याची घटना.आणि घटना व्यवस्थित पाळली की दुर्घटना घडत नाहीत हा दंडक.
दक्षिण दिग्विजय मोहिमेत बाजी जेधे चा सतरा वर्षाचा नुकताच लग्न झालेला मुलगा ,नागोजी जेधे ,होप्पळला आदिलशहा सोबत झालेल्या युद्धात मारला गेला. महाराजांनी बाजींना मुलाचे कार्य उरकण्यासाठी माघारी जाण्यास सांगितले त्यावर बाजी म्हणाले महाराज "आलो तुमच्या सोबत वापसीही तुमच्या सोबतच होईल."
बाजींनी तिथेच मुलावर अग्निसंस्कार केले. त्यानंतर 18 महिन्यांनी सर्वजण मोहीम संपवून स्वराज्यात पोहोचले शिवाजी महाराज पहिले बाजींच्या घरी गेले.नागोजीच्या आई आणि बायकोचे सांत्वन केले .स्वतःची मुलगी समजून नागोजी च्या बायकोला दरवर्षी स्वराज्य असेल तोपर्यंत सव्वाशेर सोनं मिळत राहील याची सोय केली.आजच्या बाजारभावाच्या तुलनेत 45 लाख रुपये दरवर्षी. एवढा मोठा क्लेम तर आजपर्यंत कोणतीही इन्शुरन्स कंपनीने दिला नसेल.
शहाजीं नी बारा वर्षाच्या शिवरायांना पुणे बेंगलोर- बेंगलोर पुणे हा डोळस प्रवास करत घडवलं. तेच शिवरायांनी संभाजीच्या बाबतीत केलं. राजगड ते आग्रा हा पंधराशे ते सोळाशे किलोमीटरचा प्रवास संभाजींना करायला लावला. कारण प्रवास हा नजर विकसित करतो. जपानचे पालक आपल्या उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कम मुलांना फिरवण्यावर खर्च करतात.
इस्राइल ,जपान ,व्हिएतनाम , जर्मनी यासारख्या देशांनी शिवाजी महाराजांचा खडानखडा अभ्यास करून स्वतःच्या जगण्याची काही तत्वे ठरवलेली आहेत. त्यांचे ते काटकोर पालन करतात.आणि तेच त्यांच्या प्रगतीचे गमक आहे असे सांगतात.
शिवाजी महाराजांच्या माणसाची निवड करण्याच्या तत्त्वासाठी हे उदाहरण खास नमूद करावेसे वाटते.
बारा वर्षाचे शिवबा जेव्हा लाल महालात बसलेले होते तेव्हा त्यांनी लग्नाच्या वरातीतएक दांडपट्टा चालवणारा मुलगा बघितला. त्याला चौकशीसाठी बोलवले. त्याची चौकशी केली कशासाठी हा खेळ करतोस. त्याने सांगितलं महाराज दोन वेळच्या जेवणासाठी. महाराजांनी त्याला विचारले की हेच काम जर मी माझ्यासोबत करायला सांगेल तर तू करशील का? नकार देण्याची काही कारणच नव्हते. त्यानंतर तब्बल 25 वर्ष खाणे पिणे व्यायाम आणि दांडपट्ट्याची प्रॅक्टिस एवढेच त्याचे काम होते.
अफजलखानाच्या भेटीच्या आदल्या दिवशी त्याला सांगण्यात आले की उद्या तुझे काम आहे कारण समोर सय्यद बंडा होता. सय्यद बंडाचा हात उडवणारा हाच तो जीवा महाला. "होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणायला लावणारा." माणसाची योग्य पारख, निवड, योग्य ती कामगिरी ,पाहिजे ते अधिकार आणि निभावयाचे कर्तव्य असा अतिशय संतुलित कारभार.
आजच्या विश्व विद्यालयात शिकविली जाणारी सर्व व्यवस्थापन तत्व आपल्या स्वराज्यात दिसतात. Planning, organisation, direction, control and unity of command. शिवाजी महाराज म्हणजे पहिला असा मराठी माणूस ज्यांनी मुंबई विकत घेण्यासाठी इंग्रज आणि पोर्तुगीजांना टेंडर दिलं होतं.
हॉलीवुड मधील एक प्रसिद्ध सिनेमा हे 300 Spartans. शिवचरित्राचा अभ्यास करणारे भारतीय अभ्यास हा सिनेमा घोडखिंडीवर व शिवाजी महाराजांवर आधारित असल्याचा दावा करतात जो खरा आहे. कारण तो आजपर्यंत कोणीही फेटाळून लावत नाही.
एक दिलाने लढणारे मराठे महाराजांनी तयार केले मराठा हा जातीवाचक शब्द नाही स्वराज्याचा सैनिक म्हणजे मराठा "जो मरके के भी नही हटा वो मराठा." वाचकाला इतिहासातील शब्द नीट कळले नाही ,तर त्याचा गाभा उकलत नाही. गाभ्याला भिडणे झाले नाही तर त्याचा अर्थ अंत:करणाला लगडत नाही. आणि अर्थाचा ठसा मनावर उमटला नसेल तर पारायणाची परिपूर्ती आचरणात होत नाही. पारायण आणि आचरण यात फट असेल तर तिथे दंभाचरणाचे बीजारोपण होते. म्हणून शेवटी एकच प्रश्न आपण नेमके कोणत्या वाटेचे पांथस्थ आहोत?
अश्विनी गावंडे
शिक्षिका
आंतरराष्ट्रीय NLP कोच .