BRS ची ‘मत’ वाली चाल

Update: 2023-06-24 15:06 GMT

आंदोलनाच्या माध्यमातून केसीआर राव यांनी तेलंगणा हे स्वतंत्र राज्य करून दाखवलं. त्यानंतर त्यांनी तेलंगणाच्या विकासाचा झपाटा लावलाय. तेलंगण राष्ट्र समितीचं नामकरण करून त्यांनी भारत राष्ट्र समिती हा पक्ष काढला. त्यातून तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदावर ते विराजमानही झाले. आता शेजारच्या महाराष्ट्रात त्यांनी मागील १ वर्षांपासून आपल्या पक्षाचा विस्तार करायला सुरूवात केलीय. बीआरएसची ही ‘मत’वाली चाल महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनी वेळीच ओळखली नाही तर 2024 मध्ये महाष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्यात बीआरएसचीही भुमिका दिसेल.

मराठवाड्यावर निजामांनी राज्य केलं. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट सामील झालेल्या मराठवाड्याच्या मागासलेपणाचा मुद्दा उपस्थित करत केसीआर राव यांनी मराठवाड्यातून महाराष्ट्रात प्रवेश केलाय. त्यांच्या या राजकीय विस्तारात महाराष्ट्रातील साईड झालेल्या दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी प्रवेश करायला सुरूवात केलीय. महाराष्ट्रातील ४५ हजार गावांमध्ये पक्षाचा विस्तार आणि नगरपालिका, नगरपरिषदांमधील ५ हजार वॉर्डमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. बीआरएसचा विस्तार करतांना केसीआर राव हे कार्यकर्ते, नेत्यांना प्रशिक्षण देतात. त्यातून त्यांना पक्षाची ध्येयधोरणं आणि पुढील रणनीति शिकवली जातेय.

अब की बार, किसान सरकार

केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून विस्ताराला सुरूवात केलीय. त्यासाठी त्यांनी तेलंगणा मॉडेल प्रमोट करायला सुरूवात केलीय. मुख्यमंत्री होण्याआधी तेलंगणामध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या आत्महत्या थांबल्या आहेत. त्यासाठीचं तेलंगणा मॉडेल आज देशभरात चर्चेत असल्याचा दावा केसीआर राव आपल्या सभांमधून करत आहेत. तेलंगणाच्या प्रत्येक घरातील नळाला पाणी आणल्याचा मुद्दाही ते भाषणातून सांगत आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या दैनंदिन अडचणी, त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांनाही केसीआर हात घालत आहेत. तर दुसरीकडे फुले-शाहू-आंबेडकरांसारख्या महापुरूषांचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला तो महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत अजूनही मागे असल्याचा मुद्दाही केसीआर भाषणातून पुढे आणत जातीय समतोल राखण्याचाही प्रयत्न करत आहेत.

तेलंगणाच्या लगत विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि मराठवाड्यातील नांदेड हे जिल्हे थेट जोडल्या गेले आहेत. त्यामुळं याच जिल्ह्यातून केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलाय. विशेष म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड हे जिल्हे अजूनही पूर्णतः विकसित झालेले नाहीत. शिवाय शेतकरी आत्महत्या, नक्षलवाद, बेरोजगारी, असे मुद्देही इथं आहेत. शिवाय या भागातील बहुतांश नागरिकांचे रोटी-बेटी व्यवहार, किंवा औद्योगिक संबंध थेट तेलंगणाशी निगडीत आहेत किंवा तिथल्या व्यवस्थेवरच महाराष्ट्रातील अनेकांचे छोटे-मोठे व्यवसायही अवलंबून आहेत. शिवाय तेलगू भाषा हा देखील महत्त्वाचा धागा या दोन्ही राज्यांना जोडणारा दुवा आहे. अशा परिस्थितीत केसीआर यांनी या सर्व जमेच्या बाजू लक्षात घेऊन सुरू केलेली ही सावध सुरूवात आहे.

महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यातून थेट महाराष्ट्रात येऊन लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची किमया एआयएमआयएम या राजकीय पक्षानं अलिकडच्या काळात केली. त्याची सुरूवातही नांदेड महापालिकेमधून झाली. त्यानंतर आमदार, खासदारही या पक्षानं निवडून आणले. त्यामुळं साहजिकच दक्षिणेतल्या कर्नाटक आणि तेलंगणा इथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षेनं उचल खाल्ली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी सांगली, सोलापूर या दोन जिल्ह्यातील काही भाग कर्नाटकमध्ये सामील करण्यासाठी ऐन विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्टंट केला होता. त्याला प्रतिसाद मिळाला नाही हा वेगळा मुद्दा. मात्र, त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी शेजारील राज्यातले राजकीय पक्ष किती आतूर आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांमध्ये गुंतलेले असतांना महाराष्ट्रातील कळीच्या मुद्द्यांना हात घालत बीआरएस सारखे पक्ष विस्तार करत आहेत. बीआरएस मध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांना तेलंगणामध्ये अगदी व्हीआयपी पाहुणचार मिळत असल्याचं अनेकांनी सांगितलं. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय पक्षात दुर्लक्षित झालेल्या नेत्यांना मान-सन्मान तर मिळालाच पण राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी व्यासपीठही मिळालं. तर दुसरीकडे बीआरएस सारख्या पक्षाला महाराष्ट्रात रेडिमेड नेते आणि कार्यकर्ते मिळाले. शिवाय त्यांची राजकीय वाटाघाटी कऱण्याची कुवतही यामुळे वाढणार आहे. हा धोका महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी योग्य वेळी घेतली असेल तर उत्तम नाहीतर २०१४ च्या सार्वजनिक निवडणूकांमध्ये बीआरएस सारखे पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भुमिका साकारतील यात दुमत नाही.

Tags:    

Similar News