भाजपला शिवसेनेप्रमाणे नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्यात यश का आलं नाही?

बिहारमध्ये एकनाथ शिंदे शोधण्यास भाजपला उशीर झाला का? शिवसेने प्रमाणे नितीश कुमार यांचा पक्ष संपवण्याचा भाजपचा डाव फेल ठरला का? भाजपच्या शतप्रतिशत भाजपची घोषणा प्रादेशिक पक्षांना इशारा आहे का? वाचा सुनिल सांगळे यांचा महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकारणाचा वेध घेणारा लेख;

Update: 2022-08-10 11:55 GMT

महाराष्ट्रात भाजप-प्रणित सरकारचा शपथविधी पार पडत असतांनाच तिकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी धोबीपछाड मारत भाजपाला सत्तेतून बाहेर काढून एनडीए सोडले आणि भाजपाची स्थिती एका डोळ्यात हसू आणि एक डोळ्यात अश्रू अशी झाली. महाराष्ट्राच्या धर्तीवर जदयू पक्ष फोडून भाजप तिथेही ऑपरेशन लोटस राबवण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला असला तरी बिहारमध्ये काल जे रामायण घडले, त्याला केवळ एवढेच कारण आहे. हे संपूर्ण खरे नाही. महाराष्ट्रात भाजपने शिवसेना फोडल्यामुळे देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष आता अत्यंत सावध झाले आहेत आणि "शत प्रतिशत भाजप" या घोषणेचा अर्थ त्यांना चांगलाच लक्षात आला आहे.

त्यातच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जणू काही कोणाच्याही मनात याबाबत थोडीही शंका राहू नये. यासाठी देशात पुढील काळात आता भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील व सर्व प्रादेशिक पक्ष नष्ट होतील असे विधान केले. त्यामुळे आज ना उद्या सगळ्याच पक्षांची स्थिती शिवसेनेप्रमाणेच होणार ही प्रादेशिक पक्षांची खात्री झाली आहे. आणि एनडीए मधील जेष्ठ भाऊ म्हणून भाजपाची विश्वासार्हता अगदी खालच्या पातळीला गेली आहे. हे सगळे जरी खरे असले तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्धच्या बंडातून धडा घेऊन नितीश कुमार यांनी नजीकच्या भविष्यात ते जे करणार होते. ते त्यांनी तात्काळ करून टाकले असे दिसते.

बिहारमध्ये भाजपला जो धक्का बसला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी नितीश कुमार हे काय रसायन आहे ते पाहावे लागेल.

नितीश कुमार हे समाजवादी विचारसरणीच्या पठडीतले राजकारणी आहेत आणि सुरूवातीच्या काळात ते राम मनोहर लोहिया, सत्येंद्र नारायण सिंह, कर्पुरी ठाकूर आणि व्ही.पी.सिंग यांच्या बरोबर काम करीत होते. लालूप्रसाद यादव यांच्याशी त्यांचा राजकीय संबंध त्या काळापासूनच आहे. नंतर जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश यांनी समता पार्टी स्थापन केली व लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नितीश यांनी जनता दल आणि आपली समता पार्टी विलीन करून जनता दल युनायटेड (ज्याला जेडीयू असे म्हटले जाते) या पक्षाची स्थापना केली.

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत लालूंच्या पक्षाला भाजप आणि जेडीयू या आघाडीने मात दिली व विधानसभेच्या ३४४ जागांपैकी (तेंव्हा झारखंड राज्य झाले नव्हते) १९९ जागा जिंकल्या. १९९८-९९ या काळात नितीश वाजपेयी सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. परंतु एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. वाजपेयींच्या पाठिंब्यामुळेच नितीश मार्च २००० मध्ये पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले; परंतु पुरेसे बहुमत नसल्याने ते सिद्ध न करताच त्यांनी त्या पदाचा एका आठवड्यातच राजीनामा दिला. परंतु नितीश कुमार आणि बिहारचे मुख्यमंत्री पद यांच्यात जे अतूट नाते मागील २० वर्षात आहे त्याची ती फक्त सुरवात होती आणि त्यानंतर ते तब्बल सात वेळा मुख्यमंत्री झाले आणि आज त्यांनी तब्बल आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या दरम्यान त्यांनी कधी भाजपशी तर कधी लालूंच्या पक्षाशी युती केल्या आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत लालूंनी त्यांना "पलटू राम" ही उपाधी दिली होती आणि नितीश यांनी आता त्याच लालूंच्या पक्षाशी परत काल युती करून लालुंच्याच मुलाला आपले उपमुख्यमंत्री केले आहे.

वेळोवेळी केलेल्या असल्या युती सोडल्या तर नितीश कुमार यांची स्वतःची प्रतिमा भ्रष्टाचार मुक्त आहे. आपल्या स्वच्छ प्रतिमेला जपायचा नितीश कुमार किती प्रयत्न करतात ते पाहायचे झाले तर नितीश यांचे जवळचे सहकारी आरसीपी सिंग आणि तेजस्वी यादव यांची प्रकरणे पाहावी लागतील. आरसीपी सिंग नितीश कुमारांच्या अत्यंत जवळचे सहकारी असल्याने त्यांना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले होते व नंतर ते मोदींच्या मंत्रिमंडळात होते. ते नितीश कुमार यांच्या कुर्मी जातीचेच आहेत व पूर्वाश्रमीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची भाजपशी जवळीक नितीश यांना खटकत होती.

त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यामुळे नितीश यांनी त्यांना राज्यसभेची खासदारकी नाकारल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सिंग आता त्यांचे कट्टर शत्रू झाले आहेत आणि ते बिहारचे एकनाथ शिंदे होण्याच्या शंकेनेच नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडण्याची घाई केली असे म्हटले जाते. यापूर्वीही तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतांना त्यांच्यावर जेंव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, तेव्हा नितीश यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. लालूंच्या राजद पक्षाने त्याला नकार दिल्यावर, नितीश यांनी जुलै २०१७ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राजद बरोबरची युती तोडली होती.

नितीश कुमार यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या प्रशासनिक कौशल्याची भाजपावाले लोक ही स्तुती करतात आणि निवडणूक प्रचारात त्यांचा उल्लेख "सुशासन बाबू" असा केला जाई.. याचे कारण असे सांगितले जाते की, बिहारमधील कायदा व सुव्यवस्था स्थिती त्यांनी सुधारली आणि बिहारचा जीडीपी त्यांनी खूप उंचावला. ज्या मुली शाळेत प्रवेश घेतील व शाळा सोडून जाणार नाहीत (ड्रॉप आऊट) त्यांना सायकल देण्याची त्यांनी योजना अत्यंत यशस्वी झाली आणि शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण दुप्पट झाले.

नितीश कुमारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न

अर्थात बिहारसारख्या मोठ्या राज्याचे सात वेळा मुख्यमंत्री झालेल्या या प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखाला संपविले नाही तर बिहारमध्ये भाजपाची वाढ एका मर्यादेपलीकडे होऊ शकणार नव्हतीच. त्यामुळे भाजपचे प्रादेशिक पक्ष संपविण्याचे जे धोरण आहे त्याला अनुसरून भाजपने पावले टाकायला सुरवात केली होती. पण इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नव्हती तर इथे मागील वीस वर्षे (काही थोडा काळ वगळता) मुख्यमंत्री असलेल्या मुरब्बी नेत्याशी त्यांना सामना करायचा होता.

जोपर्यंत जेडीयूचे आमदार कमी होत नाहीत तोपर्यंत नितीश कुमार यांचे बिहारमधील स्थान नगण्य करणे शक्य नव्हते. दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते आणि त्यांची लढत तेजस्वी यादव या तरुण नेत्याशी होती. सत्ता तर हवीच, परंतु नितीश कुमार यांचे महत्वदेखील कमी करायचे हा तिढा भाजपने कसा सोडवला ते मनोरंजक आहे.

यासाठी त्यांनी रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना हाताशी धरले. चिराग पासवान यांचा लोक-जनशक्ती पार्टी हा स्थानिक पक्ष आहे आणि तो एनडीएला मदत करायचा. या चिराग पासवान यांनी दोन वर्षांपूर्वीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत जाहीर केले की ते भाजपच्या उमेदवारांच्या विरुद्ध एलजेपी चे उमेदवार उभे करणार नाहीत, परंतु नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या उमेदवारांच्या विरुद्ध मात्र, एलजेपीचे उमेदवार उभे करतील. त्याचा अर्थ स्पष्ट होता की ते नितीश कुमार यांचे आमदार कमी येतील यासाठी प्रयत्न करणार होते. आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. चिराग पासवान यांनी नितीश कुमारांच्या जेडीयू उमेदवारांच्या विरुद्ध आपले १३७ उमेदवार उभे केले. यातही महत्वाची बाब ही होती की यातले अनेक भाजपचेच लोक पासवान यांच्या एलजेपीच्या तिकिटावर उभे होते. चिराग पासवान यांच्या या १३७ पैकी केवळ एक उमेदवार निवडून आला, परंतु त्यांनी नितीश कुमार यांच्या पक्षाचे जवळपास ३० उमेदवार पाडले. पासवान यांच्या पक्षाने जवळपास २५ भाजपच्या लोकांना आपल्या पक्षाच्या चिन्हावर उभे केले होते. हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.

याचा परिणाम असा झाला की ज्या जेडीयूने २०१५ च्या निवडणूक ७१ जागा जिंकल्या होत्या, त्यांना २०२० मध्ये केवळ ४३ जागाच मिळाल्या. त्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला सर्वात जास्त म्हणजे ७५ जागा मिळाल्या, तर भाजपाला ७४ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे एनडीए जरी निवडून आले तरीही नितीश कुमार हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आणि त्यांचे राजकीय महत्व ४३ जागा मिळाल्याने एकदम कमी झाले.

ह्या सगळ्या गोष्टींमुळे नितीश कुमार हे दुखावले गेलेले होते. त्यांच्या दृष्टीने ही अस्तित्वाची लढाईच होती. असे असले तरी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केलेले असल्याने भाजपने त्यांना मुख्यमंत्री केले. याला परत महाराष्ट्राच्या घटनांची पार्श्वभूमी होती. त्याआधीच मुख्यमंत्रीपदावरून वाद होऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली होती. त्यामुळे पुन्हा एका मोठ्या राज्यात तोच वाद निर्माण होणे भाजपला परवडले नसते.

पंतप्रधान पदाची शर्यत...

या सगळ्या गोष्टींना आणखी एक पैलू आहे आणि तो म्हणजे नितीश कुमार यांना राष्ट्रीय राजकारणात उतरून नरेंद्र मोदी यांचा प्रतिस्पर्धी म्हणून विरोधी पक्षांचा उमेदवार होण्याची महत्वाकांक्षा आहे असे म्हटले जाते. यात काही आश्चर्य वाटायचे कारणही नाही, कारण जी व्यक्ती बिहारसारख्या मोठ्या राज्याची सात वेळा मुख्यमंत्री झाली आहे, त्या व्यक्तीची पुढची महत्वाकांक्षा तीच असू शकते. खरे म्हणजे २०१९ चा लोकसभा निवडणुकांच्या वेळीच हे जाणवत होते की विरोधी पक्षाचा कोणी अनुभवी व जेष्ठ नेता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याने भाजपचे काम सोपे होते. भाजप ज्या गोष्टीला TINA फॅक्टर म्हणते (There Is No Alternative ) तो भाजपच्या बाजूने आहे हे आजही म्हटले जाते.

अगदी मोदींबद्दल फार प्रेम नसलेले लोकही "मोदी नही तो फिर कौन?" असा प्रश्न विचारात असतात. त्या वेळेस नितीश कुमार हे नाव चर्चेत आले असते तर तो प्रश्न विचारला गेला नसता. परंतु राजकारणात लोणच्यासारखे मुरलेल्या नितीश कुमार यांनी तेंव्हा राजकीय वातावरणाचा अंदाज घेतला आणि हमखास पराभव होईल अशा शर्यतीत भाग घेण्याऐवजी हातात सहज उपलब्ध असलेले मुख्यमंत्रीपद अधिक श्रेयस्कर असा व्यावहारिक विचार त्यांनी केला. हे राजकीय निरीक्षकांना जाणवलेच होते. २४४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत केवळ ४३ आमदार घेऊन त्यांनी मागील दोन वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगले आहे.

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेला जो अनुभव आला तो पाहिलेला असल्यामुळे आणि चिराग पासवान मॉडेलचाही अनुभव स्वतः घेतलेला असल्याने भाजपला आपला पक्ष संपविण्याची संधी न देता, त्यांनीच योग्य वेळ साधून काल भाजपाला धोबीपछाड देत रामराम ठोकला. अर्थात तेजस्वी यादव यांच्याकडे ७५ आमदार असतांना त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी राजी करणे, आणि स्वतःकडे ४३ आमदार असतांना सात पक्षांना एकत्र करून १६० पेक्षा जास्त आमदार जमवणे ही गोष्ट काही काल एका दिवसात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक महिन्यांचे नियोजन असेल ज्याची कुणकुण कोणाला लागली नाही. महाराष्ट्रात भाजपने असेच नियोजन केले होते आणि शिवसेनेला धक्का दिला. आता बिहारमध्ये त्याच औषधाचा डोस नितीश कुमार यांनी भाजपला पाजला इतकेच!

आता नितीश कुमार यांचा या पुढचा प्रवास कसा असेल? ते जरी सध्या पुन्हा आठव्यांदा मुख्यमंत्री झाले असले तरी त्यासाठी त्यांनी भाजपशी युती तोडली हे शक्य नाही.. काही दिवसांनी किंवा एखाद्या वर्षाने ते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तेजस्वी यादव यांच्यासाठी खाली करून देऊन देशाच्या राजकारणात उडी घेतील अशी दाट शक्यता आहे. तिथे देखील ते विरोधी पक्षांचे सर्वमान्य उमेदवार होतील अशी शक्यता अजिबात नाही. कारण काँग्रेस हा कमी खासदार निवडून येत असलेला पक्ष असला तरी अखिल भारतीय पातळीवर अस्तित्व असलेला विरोधी पक्ष तोच आहे. याशिवाय मागील अनेक वर्षे भाजपशी कडवी लढाई लढणाऱ्या ममता बॅनर्जी आहेत. त्यामुळे कालपर्यंत भाजपशी युती असलेल्या नितीश कुमार यांना सहजासहजी विरोधी पक्षांचे नेतृत्व मिळेल हे शक्य नाही.

सध्यातरी नितीश कुमार यांनी त्यांचा पक्ष वाचवलेला आहे आणि ते विरोधी गटात सामील झाले आहेत यापेक्षा जास्त काहीही भविष्य कोणीही सांगू शकणार नाही.

Tags:    

Similar News