मुंबई : वन-डे टीमच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला हटवून रोहित शर्माला कॅप्टन करण्यात आले. या निर्णयावर विराट नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. तो दक्षिण आफ्रिका विरुद्धची वन-डे मालिका खेळणार नाही, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कारणाने भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये सध्या गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हा गोंधळ आज दूर होण्याची शक्यता आहे.
विराट या सर्व प्रश्नांवर अखेर मौन सोडण्याची शक्यता आहे. टीम इंडिया गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वी विराट कोहली मुंबईत आज मीडियाशी संवाद साधणार आहे. तसेच सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असलेला विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे सीरिज खेळणार नाही, असे वृत्त आले आहे. विराटला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ हवा आहे. वामिकाचा पहिला वाढदिवस 11 जानेवारी रोजी आहे. विराट टेस्ट सीरिजनंतर वामिकाचा वाढदिवस साजरी करण्यासाठी सुट्टीचं नियोजन करत आहे, अशी बातमी आहे. विराटने मात्र अद्याप या विषयावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या प्रश्नावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले होते. आपण विराटला टी20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस, अशी विनंती केली होती. विराट या विषयावर देखील उत्तर देण्याची शक्यता आहे.