ICC World Cup 2023 | भारत Vs पाकिस्तान सामन्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट
यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्सिल (ICC) आयोजक असलेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. यामध्ये वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात पाकिस्तान खेळणार की नाही याविषयी साशंकता होती. मात्र, आता पाकिस्तान सरकारनंच याविषयी खुलासा केलाय. (ICC World Cup 2023)
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय की, या क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात जाणार आहे. याआधी पाकिस्ताननं भारतात होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर भारतानंही पाकिस्तानमध्ये याचवर्षी होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023 )स्पर्धेत सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. त्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करत भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभागी होणार असल्याचं स्पष्ट करत खेळाचा संबंध राजकारणाशी जोडणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. दरम्यान, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या सुरक्षेविषयी भारतीय यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही अवगत केल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. विश्वचषकातील भारत विरूद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना येत्या १४ ऑक्टोबरला गुजरातच्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (Narendra Modi Stadium, Ahmedabad)