ICC T20 World Cup 2022 Australia मध्ये दक्षिण अफ्रिकेकडून(South Africa) भारताला(India) पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून हाराकिरी झालेली पाहायला मिळाली. एकट्या सुर्यकुमार यादव(Surya Kumar Yadav) च्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १३४ धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेला दिलं. जे दक्षिण अफ्रिकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात अगदी सहजरीत्या पार केलं. आणि भारताचा ५ गड्यांनी पराभव केला.
सामन्याच्या सुरूवातीला भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो अगदीच अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारताने अवघ्या ५१ धावांच्या मोबदल्यात ५ गडी गमावले होते. राहूल, रोहित,विराट, पंड्या कुणीच मोठी खेळी करू शकलं नाही. तर सुर्यकुमार यादव ने ४० चेंडूत ६८ धावांची अतुलनीय खेळी केली. लुंगी एन्गीडी आणि वेन पार्नेल या दोन्ही गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताच्या नाकेनऊ आणले.
त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेला देखील सुरूवात कठीणच गेली. सध्या तुफान फॉर्मात असलेल्या अर्शदीपने एकाच षटकात क्विंटन डी कॉक आणि रायली रूसो ला माघारी धाडलं पण त्यानंतर आलेल्या मार्करम ने हळूवार पणे सामना दक्षिण अफ्रिकेक़डे झुकवला. ४१ चेंडूत ५२ धावा करत तो हार्दिक पांड्या च्या चेंडूवर सुर्यकुमार यादव कडे झेल देऊन बाद झाला. सामना अखेरच्या षटकात गेला खरा पण उर्वरीत काम डेव्हीड मिलरने पुर्ण करत सामना २ चेंडू राखत खिशात घातला. भारताकडून अर्शदीप सिंह ने सर्वाधीक २, शमी, पंड्या आणि अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. ४ विकेट घेऊन भारताच्या फलंदाजीला सुरूंग लावणारा लुंगी एंगिडी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.