#Tokyo Paralympic : भालाफेकीत देवेंद्र चे तिसरे पॅरालिंपिक पदक

Update: 2021-08-30 07:38 GMT

अथेन्स आणि रियो पॅरालिंपिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या भालाफेकपटू देवेंद्र झाझरीया चे तिसरे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. F46 भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझरीया ने रौप्य तर सुंदर सिंह ने कांस्य पदकाची कमाई केली.

सोमवार ३० ऑगस्ट चा दिवस भारतासाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. पहाटे अवनी लखेरा ने सुवर्ण तर योगेश कथुनिया ने रौप्य जिंकल्यानंतर भारतासाठी देवेंद्र झाझरीया आणि सुंदर सिंह यांनी अप्रतिम कामगिरी करत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. पॅरालिंपिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कधीच भारताने एकाच दिवशी ४ पदके जिंकली नव्हती.



भारतीय पॅरा भालाफेकपटू देवेंद्र झाझरीया याने टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत ६४.३५ मीटर लांब भाला फेकत भारतासाठी या स्पर्धेतील चौथे रौप्य पदक जिंकले. देवेंद्र ने त्याच्या दुसऱ्या संधीत ही कामगिरी केली. खरं तर देवेंद्र ने या खेळीने त्याचा स्वतःचाच विश्व विक्रम मोडला होता परंतु पुढच्याच क्षणी श्रीलंकेच्या प्रियान हेरथ ने ६७.७९ मी लांब भाला फेकत नवा विश्व विक्रम स्थापित करत सुवर्ण पदक जिंकले. या शिवाय देवेंद्र झाझरीया हा भारतीय क्रीडा इतिहासातील तीन पॅरालिंपिक पदकं जिंकणारा पहिलाच खेळाडू बनला. त्याच्या नंतर भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा क्रमांक लागतो. तिने रियो आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सलग दोन पदके जिंकली आहेत.



दुसरीकडे देवेंद्र सोबतच सुंदर सिंह ने ६४.०१ मीटर लांब भाला फेकत भारतासाठी या स्पर्धेतील दुसरे कांस्य पदक आपल्या नावे केले. पोडीयम वर पदक वितरण सोहळ्यात एकाच वेळी दोन भारतीय खेळाडूंना पदक स्वीकारताना पाहणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचीच बाब म्हणावी लागेल.



भारताच्या खात्यात एकूण ७ पदके

यासोबतच भारताच्या खात्यात आता एकूण ७ पदकं झाली आहेत. रविवारी भाविना, निषाद आणी विनोद यांच्या रुपात अनुक्रमे रौप्य, रौप्य, कांस्य अशा तीन पदकांची कमाई केली होती. तर सोमवारी पहाटे अवनी सुवर्ण तर योगेश ने रौप्य अशा दोन पदकांची कमाई केली होती. या नंतर लगेचच देवेंद्र आणि सुंदर यांनी भालाफेकीत रौप्य आणि कांस्य पदक जिंकल्यामुळे भारताच्या खात्यात, १ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ७ पदके झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेत अनेक क्रीडा प्रकारात भारताला आणखी पदकांच्या अपेक्षा आहेत.

Tags:    

Similar News