पाळणा हलला, पण दोऱ्या कुणाकडे? सामनातून खोचक सवाल

बहुप्रतिक्षेत असलेला राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मात्र त्यानंतर सामनातून शिंदे-फडणवीस सरकारला खोचक सवाल केला आहे. वाचा सामनात नेमकं काय म्हटलंय?

Update: 2022-08-10 05:55 GMT

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला 40 दिवस उलटून गेल्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार केला. दरम्यानच्या काळात मंत्रीमंडळ विस्तारावरून विरोधकांनी रान उठवले होते. मात्र आता अखेर मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरही सामनातून खोचक टोला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. तर फडणवीस यांच्या दोन्ही मांडय़ांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे आणि ही महाराष्ट्राची बदनामीच आहे, असं म्हणत सामनातून टीकास्र सोडले आहे.

दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे. विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच 'क्रांती' म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? असा सवाल सामनाच्या अग्रलेखात केलं आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, 40 दिवसानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले. पण पाळण्यात नेमकं काय आहे? असा सवाल केला आहे. त्याबरोबरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्र सोडताना म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस गटाच्या 18 मंत्र्यांना राज्यपालांनी मंत्रीपदाची शपथ दिली. त्यावेळी राज्यपालांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता. त्यांनी महिनाभरापुर्वी बेकायदा सरकारचा शपथविधी केला आणि त्यानंतर आता बेकायदा मंत्रीमंडळाचा शपथविधी केला. त्यामुळे त्यांनी फार मोठे ईश्वरी कार्य केल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याची टीका सामनातून केली.

शिंदे-फडणवीस सरकारवर पक्षांतरबंदीची टांगती तलवार आहे. तर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर आमदारांना मंत्रीपदाची शपथ देणे हा लोकशाहीचा खून असल्याची संतप्त प्रतिक्रीया सामनातून व्यक्त केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रीमंडळ विस्ताराला इतका वेळ का लागला? 12 ऑगस्ट हा जजमेंट डे आहे. त्यापार्श्वभुमीवर सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटलं म्हणूनच त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार केला असल्याचे म्हटले.

मंत्रीमंडळातील नव्या मंत्र्यांची नावं घेत त्यांचं घोडं गंगेत न्हालं असं म्हटलं आहे. ज्यांच्या अंगावर मंत्रीपदाची झुल पडली. ते आनंदात असले तरी हा सरकार औटघटकेचे ठरणार असल्याचे सामनातून म्हटले आहे. मात्र ज्यानी विश्वासघाताच्या उड्या मारूनही ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्यांचं समाधान कसं होणार असा सवाल करत ईकडं आड तिकडं असंतुष्टच राहणार असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

ज्यांनी ईडीच्या भीतीने उड्या मारल्या. त्यांचं जगणं चालढकलवर चालेल. पण विश्वासघाताचा कलंक नेमका कसा पुसणार? असा सवाल सामनातून केला आहे.

निती आयोगाच्या बैठकीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मागच्या रांगेतील फोटो पाहुन महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची भावना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

जळगावमध्ये गुलाबराव पाटील विरुध्द चिमणराव पाटील हा राडा होणारच आहे. तर सिँधुदुर्गमध्ये राणे विरुध्द केसरकर सामना रंगणार असल्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याबरोबरच पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर भाजपने आरोप करून त्यांना मंत्रीपदावरून पायऊतार व्हायला भाग पाडले होते. मात्र आता तेच राठोड भाजपच्या वॉशिंगमधून स्वच्छ झाले आहेत का? असा सवाल सामनातून केला आहे.

गिरीश महाजन यांची मारहाण, खंडणी अशा गंभीर प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलाचे नाव टीईटी घोटाळ्यात आले आहे. मात्र अब्दुल सत्तार यांनी शिंदे गट सोडण्याचीही पर्वा केली नाही. त्यामुळेच त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

त्यामुळे फडणवीस यांच्या दोन्ही मांड्या पापाने भरलेल्या आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

Tags:    

Similar News