पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. यासाठी काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. यानंतर सकाळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण त्यानंतरही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सागर बंगला गाठत आंदोलन केले, यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
"सागर" लाड तुम्ही आव्हान दिले होते तुमचे आव्हान स्वीकारून मी सागर बंगल्यावर पोहोचलो महाराष्ट्र द्रोह्यांचा निषेध केला, असा टोला अतुल लोंढे यांनी प्रसाद लाड यांना लगावला. "पोलिसांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरीही एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. तुम्ही म्हणाले होते सागर बंगल्यावर आलात तर परत जाऊ देणार नाही मी परतही आलो पण तुम्ही काही दिसला नाहीत." असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जमून काँग्रेसला उत्तर देण्याची तयारी केली होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा जयजयकार करत घोषणाबाजी केली. तसेच भाजपचे कार्यकर्ते असताना आपल्या बंगल्यावर येण्याची हिंमत कुणी करणार नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही, उलट काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याने त्यांनीच माफी मागावी असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.