fact check: घरात दुचाकी असेल तर रेशन कार्ड रद्द होणार का ?
Max Maharashtra | 17 July 2019 7:36 PM IST
X
X
तुमच्या मालकीची दुचाकी, चारचाकी गाडी किंवा जमीन असेल तर तुम्ही रेशनकार्डवरून घेत असलेले स्वस्त धान्य बंद होऊ शकते’ या आशयाच्या पोस्ट्स तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअपवर वाचल्या असतील. गेल्या काही दिवसांत या आशयाच्या पोस्ट फेसबुक, व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात फिरल्या होत्या. काही माध्यमांनीही याबाबत बातम्या दिल्या होत्या. त्यामुळं सहाजिकच सर्वसामान्य नागरिकांमध्ये रेशनकार्डबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
अनेक नेटीझन्सनी याबाबत सरकारप्रति आपला संताप व्यक्त करत सरकारवर टीका केली. सोशल मीडियावर हा विषय काही दिवस चर्चेत राहीला. म्हणूनच ‘मॅक्स महाराष्ट्र’नं या मेसेजचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि सत्य समोर आलं.
काय होती बातमी?
तुमच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि शिधापत्रिकेवरुन तुम्ही स्वस्त धान्य घेत असाल, तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो. कारण, दुचाकी किंवा चारचाकी असेल किंवा तुमचं शेतीचं उत्पन्न वाढलं, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाने राज्यातील साधारण 30 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोखांच्या तोंडचा हक्काचा घास पळवला जाऊ शकतो.
राज्यात आधार लिंक झालेले साधारण दीड कोटींपेक्षा जास्त रेशनकार्डधारक आहेत. यातील अनेकांच्या शिधापत्रिका लवकरच रद्द होणार आहेत. म्हणजे यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारं धान्य बंद होऊ शकतं. ग्रामीण भागामध्ये अनेकदा शेतीच्या कामात सहकार्य होण्यासाठी दूध विकण्यासाठीही दुचाकी घेतली जाते. पण दुचाकी घेतली म्हणून तो व्यक्ती श्रीमंत होत नाही. तर शहरी भागातही अनेक गरीब कुटुंब प्रवासी वाहतूक करण्यासाठी चारचाकी खरेदी करतात. या शिधापत्रिकाधारकांनाही हक्काचं धान्य मिळणं बंद होण्याची शक्यता आहे.
तुमच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती आरटीओकडून तपासली जाणार आहे, तर शेतीत वाढलेल्या उत्पन्नाची माहिती महसूल विभागाकडून तपासली जाणार आहे. त्यामुळे खरी माहिती द्यावी लागेल. वाहनं असलेल्या अनेक गरीब कुटुंबांनाही श्रीमंतीचा ठपका लावून शिधापत्रिका रद्द केली जाण्याची भीती आहे
काय आहे सत्य?
दुचाकी, चारचाकी किंवा जमीन असल्यास रेशनकार्ड (शिधापत्रिका) रद्द करण्याचा निर्णय घेतला नसल्याचा खुलासा शासनाने परिपत्रकाद्वारे केलाय. या परिपत्रकामध्ये रेशनकार्डचा लाभ घेत असलेल्या कुटुंबाकडे दुचाकी, चारचाकी वाहन तसेच जमिनीची मालकी असल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचं सांगण्यात आलंय. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत निश्चित केलेले सर्व लाभ पूर्वीप्रमाणे त्या कुटुंबाला मिळतील असंही स्पष्ट करण्यात आलंय. रेशनकार्डद्वारे मिळणारे सर्व लाभ यापुढेही लाभधारकांना मिळणार आहे. ५/११/१९९९ च्या निर्णयान्वये निश्चित केलेल्या निकषामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
घरात वाहन किंवा जमीन असल्यास रेशनकार्ड बंद होणार नाही, असं ‘मॅक्स महाराष्ट्र’च्या पडताळणीत समोर आलंय. त्यामुळं अशा कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका.
Updated : 17 July 2019 7:36 PM IST
Tags: bike cancel fact check fact check: घरात दुचाकी असेल तर रेशन कार्ड रद्द होणार का ? fact-check-can-ration-card-be-canceled-if-there-is-a-bike-in-the-house ration card दुचाकी रेशनकार्ड
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire