परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
X
वसई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते विश्वास सावंत यांनी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे, गुन्हा दाखल न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा देखील सावंत यांनी दिला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देतांनाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते विश्वास सावंत यांनी पोलीस ठाण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारकडून पोलीस प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. सोबतच काल अनिल परब यांनी देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप भाजपने केला आहे. केंद्रीय मंत्री राणे यांची कोणत्या कायद्याखाली केली याचा खुलासा सरकारने करावा असं देखील भाजपकडून बोललं जातं आहे.
नारायण राणे यांच्यावर झालेली अटकेची कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे म्हणत जर पोलिसांनी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही तर भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही इशारा विश्वास सावंत यांनी दिला आहे.