Home > Fact Check > Fact Check | चीन जाणूनबुजून जगात कोरोना पसरवतंय?

Fact Check | चीन जाणूनबुजून जगात कोरोना पसरवतंय?

Fact Check | चीन जाणूनबुजून जगात कोरोना पसरवतंय?
X

जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावासोबत अफवाही वाढत आहेत. चीन जगातल्या वेगवेगळ्या देशात जाणूनबुजून कोरोना पसरवत असल्याचा दावा करणारा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल आहेत.

हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया देशातील आहे असं सांगण्यात येतंय. एक आशियाई महिला सिडनीमधील एक सुपरमार्केटमध्ये फळांवर थुंकत आहे असा हा व्हिडीओ आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिची तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.

२३ मार्चनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एका प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडूनेही हा व्हिडीओ शेअर केला.

व्हिडीओच्या पहिल्या भागात एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे आणि दुसर्‍या भागामध्ये एक महिला एका सुपरमार्केटच्या आतल्या भागात आहे. तिथे विक्रीसाठी ठेवलेल्या केळ्यांवर शिंकताना आणि थुंकताना दिसत आहे.

तथ्य पडताळणी :

या व्हायरल व्हिडिओचा पहिला विभाग १९ मार्च रोजीचा आहे. सिडनीच्या उत्तरेस असलेल्या गॉर्डन येथे एका महिलेला अटक करण्यात आली होती. एनएसडब्ल्यू पोलिसांच्या प्रवक्त्याने 'स्टोरीफुल' या वेबसाईटला सांगितले की, गोंधळ घातल्यामुळे या महिलेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ५४ वर्षांच्या या महिलेला सोडण्यात आलं.

अटक करण्यात आलेली महिला आणि फळांवर थुंकत असलेली महिला यांचे कपडे वेगवेगळे आहेत. व्हिडीओच्या दोन्ही भागातील घटनांचा एकमेकांशी कसलाही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय फळांवर थुंकणाऱ्या महिलेबाबत कोणतीही माहिती नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

व्हिडीओतील स्क्रीनशॉटच्या आधारावर 'स्टोरीफुल' या वेबसाईटने पुष्टी केलीय की हा व्हिडीओ गॉर्डन भागातील वूलवर्थ्स सुपरमार्केटमधला आहे. मात्र, फळांवर थुंकत असलेला व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. याशिवाय व्हिडीओत दिसत असलेली फळांना ठेवायची पद्धत आणि वूलवर्थ्स सुपरमार्केटमधील फळांना ठेवायची पद्धत वेगळी आहे.

यासोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल आहे. यामध्ये एक महिला लिफ्टमधील बटनांवर थुंकत असल्याचं दिसतंय. या व्हिडीओबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडीओ दक्षिण-पश्चिम चीनमधील चोंगकिंग शहरातला असल्याचं समोर आलं.

लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असलेल्या ४६ वर्षीय महिलेचं नाव 'ली' असून इतरांशी भांडण झाल्याच्या रागातून तिने लिफ्टमधील बटनांवर थुंकलं. तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

डेलीमेल.को.युके या वेबसाईटने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केलं आहे.

निष्कर्ष :

या दोन्ही व्हिडीओतील माहिती तथ्यहीन आहे. कोरोनाचा प्रसार व्हावा यासाठी अशाप्रकारे कोणीही प्रयत्न नाही. या व्हिडीओतून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

अशाप्रकारे अनेक व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल आहेत. त्यापैकी प्रत्येक व्हिडीओची आपली कहाणी आहे. हे व्हिडीओ एडिट करून लोकांमध्ये गैरसमज आणि भीती पासरावण्यासाठी वापरले जात आहेत. त्यामुळे अशा व्हिडीओवर विश्वास ठेवू नका. चुकीची माहिती आणि व्हिडीओ फॉरवर्ड करू नका.

[video width="320" height="560" mp4="http://www.maxmaharashtra.com/wp-content/uploads/2020/03/WhatsApp-Video-2020-04-01-at-17.57.26.mp4"][/video]

Updated : 31 March 2020 5:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top