Home > Video > `वायदा` बंद झाल्यानं शेतकऱ्याचा झाला वांदा

`वायदा` बंद झाल्यानं शेतकऱ्याचा झाला वांदा

`वायदा` बंद झाल्यानं शेतकऱ्याचा झाला वांदा
X

मुठभर प्रभावी व्यापारी ज्यांना सर्व मलई एकट्याने खायची इतके वर्ष सवयी लागली त्यांना त्यातली थोडी मलई शेतकऱ्यांना मिळालेली पाहवली नाही. त्यानंतर चक्रे फिरली आणि अचानक महागाईच्या नावावर वायदे बाजाराला बळीचा बकरा बनवून चणा, सोयाबीन, मोहरी, पाम तेल, सोयातेल, गहू, सारख्या वस्तूंचे वायदे बंद केले गेले. शेतकऱ्यांना आपल्या मालाला मागणी-पुरवठ्याच्या आधारावर मिळणारा चांगला भाव देणारे पर्यायी मार्केटच बंद करण्यात आल्याने जोखीम व्यवस्थापन करणे अशक्य झाले, MaxMaharashtra चे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी शेतमाल बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांच्याशी साधलेला संवाद....

कुवळेकर म्हणाले, अस्मानी आणि सुलतानी संकटे झेलत, कायम कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आपला जीव पणाला लावून अन्न पिकवतो. त्यासाठी वर्षातील सहा-आठ किंवा अगदी दहा महिने कुटुंब चालवण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करीत जगतो. परंतु एवढ्या ढोरमेहनतीने पिकवलेले अन्न जेव्हा विकायला जातो तेव्हा योग्य किंमत तर सोडाच परंतु अनेकदा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. कोरोना काळात तर शेतकऱ्यांच्या त्यागावर हा देश तरुन गेला. नाही म्हणायला मागील एक-डिड वर्ष सोयाबीन, नंतर कापूस या पिकांना चांगला भाव मिळाला. अर्थात तो देखील सर्वांना नाही तर ज्यांनी आपला माल थोडा साठवणूक करून ठेवला त्यांनाच बरे पैसे मिळाले. दुसरीकडे शहरी ग्राहक देखील शेतमालाला अधिक भाव देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे. परंतु त्यामुळे व्यापाऱ्यांचे वांदे झाले होते.

ते पुढे म्हणाले महागाईच्या नावावर सरसकट सर्व व्यापारी नव्हे.. तर असे मूठभर परंतु प्रभावी व्यापारी ज्यांना सर्व मलई एकट्याने खायची इतके वर्ष सवयी लागली त्यांना त्यातली थोडी मलई शेतकऱ्यांना मिळालेली पाहवली नाही. त्यानंतर चक्रे फिरली आणि अचानक वायदे बाजाराला बळीचा बकरा बनवला जाऊन चणा, सोयाबीन, मोहरी, पाम तेल, सोयातेल, गहू, सारख्या वस्तूंचे वायदे बंद केले गेले. शेतकऱ्यांना आपल्या मालाला मागणी-पुरवठ्याच्या आधारावर मिळणारा चांगला भाव देणारे पर्यायी मार्केटच बंद करण्यात आल्याने जोखीम व्यवस्थापन करणे अशक्य झाले.

अगदी थोडक्यात सांगायचे तर जून महिन्यात पेरलेले खरिपाचे सोयाबीन तेव्हा ७,०००-७,२०० रुपये बाजार भाव चालू असताना वायदे बाजारात निदान ६,७००-६,८०० रुपयात आगाऊ विकून जोखीम व्यवस्थापन करणे सहज शक्य होते. परंतु वायदे बाजार बंद केल्याने हि संधी हिरावून घेतली गेली. आज रोजी सोयाबीन ४,५०० रुपयांवर आले आहे. चक्क २०००-२,२०० रुपये प्रति क्विंटलचा तोटा. वायदे बंदीचा मोठ्ठा फटका बसला आहे.

मागील हंगामात १०,००० रुपयांना देखील न मिळणारे सोयाबीन आज निम्म्याहून कमी विकले जात आहे. ते सुद्धा संपूर्ण जगात महागाई असताना. तीच अवस्था चण्याची. चणा तर हमीभावाखाली विकला जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये हंगाम सुरु होईल तेव्हा सोयाबीन देखील हमीभावाच्या म्हणजे ४,००० रुपयांखाली घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लक्षात घ्या वायद्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. केंद्र आणि राज्य सरकार वायदे बाजाराचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करून घेण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखत आहे. त्यासाठी स्मार्ट सारख्या योजनांमध्ये देखील प्रशिक्षण देण्याचा इरादा आहे. फ्युचर्स आणि पुट ऑप्शन्स द्वारे क्रांती होणे दृष्टीपथात आलेले आहे. मात्र काही हितसंबंधी व्यापारी वायदा बंद ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे मनसुबे हाणून पाडून वायदे बाजार परत सुरु करण्यासाठी शेतकरी ही सर्वात मोठी (परंतु अनेक पक्षात विभागलेली) मतपेढी जर मोठे आंदोलन करू शकली तर सरकारला हार मानावी लागेल असे त्यांनी सांगितले.

सर्व शेतीमित्रांना काय आवाहन कराल या प्रश्नावर कुवळेकर म्हणाले, या प्रश्नावर सर्वांनी आपले राजकीय अजेंडा आणि पक्षीय कार्यक्रम बाजूला ठेवून एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारणे गरजेचे आहे. शेतीमित्र म्हणजे त्यात सर्व प्रकारची माध्यमे, शेतकरी संघटना, सामाजिक संस्था, FPO फेडरेशन्स आणि शेती विषयातील अभ्यासक हे सर्वच जण आपापल्या परीने सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे सर्वांना परत एकदा आवाहन आहे कि त्यांनी आपापल्या परीने आणि आपापल्या पातळीवर प्रयत्न सुरु करून व्हाट्सएप्प च्या माध्यमातून याचा जागर करावा. म्हणजे बघता बघता चळवळ उभी राहील.



Updated : 3 Oct 2022 9:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top