Home > Fact Check > Fact Check | शरद पवार यांच्या दबावामुळे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद?

Fact Check | शरद पवार यांच्या दबावामुळे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद?

Fact Check | शरद पवार यांच्या दबावामुळे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद?
X

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी ही बंद होत असल्याचे काही मेसेज सध्या फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये दावा करण्यात येत आहे की, ही मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावामुळे बंद होत आहे.

मुस्लिम समाजाच्या भावना दुखावू नये म्हणून शेवट न दाखवता मालिका बंद करण्यासाठी शरद पवार (sharad pawar).यांनी दबाव टाकला, असा गौप्यस्फोट मालिकेत संभाजी महाराज यांची भूमिका करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले अमोल कोल्हे यांनी केल्याचाही दावा या पोस्ट्समधून करण्यात येत आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या बातमीच्या स्वरूपात ही माहिती व्हायरल होत आहे. या पोस्टसह एक फोटोही व्हायरल करण्यात येत आहे. यामध्ये शरद पवार आणि अमोल कोल्हे यांचे फोटो आहेत.

तथ्य पडताळणी

या आशयाचे मेसेज आल्यानंतर ‘मॅक्स महाराष्ट्र’च्या टीमने याची पडताळणी केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या बातमीच्या स्वरूपात व्हायरल होत असेल्या पोस्ट्सवर स्वतः एबीपी माझाने खुलासा करत ही माहिती चुकीची असल्याचं सांगितलंय.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबद्दल आपण कोणत्याही प्रकारचं वृत्त दिलेलं नसून चॅनेलच्या लोगोचा वापर करून समाजात तेढ निर्माण करणार मजकूर काही लोक प्रसारित करत आहेत असा खुलासा एबीपी माझानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केला आहे. यासोबतच अशा व्यक्तींवर कारवाईची मागणीही केलीय.

यासोबतच मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत खुलासा केला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबद्दल कोणतीही शहानिशा न करता काही लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मालिकेच्या आशयाबद्दल अशी माहिती पसरवणे हे दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे, परंतु मालिका पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नसल्याचं कोल्हे यांनी म्हटलंय.

निष्कर्ष

शरद पवार यांच्या दबावामुळे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवला जाणार नाही, हा दावा साफ खोटा आहे. यात कोणतेही तथ्य नाही. एबीपी माझा वृत्तवाहिनीनेही याबाबत कोणतं वृत्त प्रसारित केलेलं नाही. केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत.

Updated : 5 Feb 2020 1:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top