FACT CHECK | अजित पवारांचं फार्म हाऊस जळालं नाही! मग ‘तो’ व्हिडीओ कसला?
Max Maharashtra | 12 Aug 2019 3:02 PM IST
X
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्याजवळच्या फार्म हाऊसला आग लागली आहे असा आशय असलेला एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर फिरतोय. अनेक प्रसारमाध्यमांनीही यासंदर्भात बातमी प्रकाशित केली. मात्र, फार्म हाऊसला कोणतीही आग लागली नसल्याचं पार्थ पवार यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना स्पष्ट केलंय.
पुण्याच्या घोटावडे गावाजवळ हे फार्म हाऊस आहे. काल संध्याकाळी या फार्म हाऊसला भीषण आग लागल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यानंतर काही मिनीटातच शेकडो जणांनी तो शेअर केला. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला असलेल्या कम्पाउंडमधून आगीचे प्रचंड लोळ दिसत होते. त्यामुळे ही गंभीर आग असल्याचं दिसत होतं. दुचारीवरुन जात असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता.
हे आहे वास्तव
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही याबद्दलची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. फार्म हाऊसला आग लागल्याच्या वृत्ताचं अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खंडण केलं. आग फार्म हाऊसला नाही तर त्या परिसरात असलेल्या फायबरच्या कृत्रिम झोपडीला लागली असल्याची माहिती त्यांनी दिली. या झोपडीमध्ये फोम असल्यानं मोठ्या प्रमाणात धूर झाला, आग मर्यादीत होती आणि अग्निशमन दलाने ३० ते ४० मिनीटात ही आग आटोक्यात आणली. या आगीत फार्म हाऊस किंवा इतर कशाचंही कसलंच नुकसान झालं नाही, असं पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं.
मुळात बातमी होण्यासारखी ही घटना नव्हती मात्र, तरीही सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये हा व्हिडीओ एवढ्या लवकर व्हायरल कसा झाला, असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली.
Updated : 12 Aug 2019 3:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire