FACT CHECK: जमाल खशोगी हत्याप्रकरणी खरंच न्याय झालाय का ?
X
पत्रकार जमाल खशोगीच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबियाच्या रॉयल कोर्टानं ५ आरोपींना मृत्यूदंड तर तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मात्र या प्रकरणी न्याय झाला आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय, नक्की वास्तव काय आहे ते आपण पाहूया...
काय आहे नेमकं प्रकरण?
२ ऑक्टोंबर २०१८ रोजी अमेरिकेचा नागरिक असलेला पत्रकार जमाल खशोगी तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूलमध्ये सौदी अरेबियाच्या दूतावासात गेला. खशोगीला तुर्कीची नागरिक असलेल्या त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी कागदपत्रं हवी होती. मात्र जमाल दूतावासातून बाहेर आलाच नाही. जमालची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. अतिशय क्रूर पद्धतीनं खशोगीची हत्या करण्यात आली. जमालचं शरीर अक्षरश: करवतीनं कापण्यात आलं. हत्या करण्याचे आदेश सौदीचा राजपूत्र मोहम्मद बीन सलमान याने दिले होते. हत्येपूर्वी दोन विशेष विमानांनी १५ जणांची टीम तुर्कस्थानात दाखल झाली. सुरुवातीला सौदी अरेबियन सरकारने खशोगी हत्याप्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र जागतिक दडपणामुळे हत्येची कबुली द्यावी लागली.
खशोगी हत्याप्रकरणी न्याय झाला आहे का?
सौदी अरेबियाच्या दूतावासात जमाल खशोगीची क्रूर हत्या झाली. आजपर्यंत त्याच्या मृतदेहाचा पत्ता लागलेला नाही. हत्येदरम्यान मारेकऱ्यांमध्ये झालेलं संभाषण तुर्कस्थानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हाती लागलं होतं. त्यामुळे सौदी अरेबियाला खशोगीच्या हत्येची कबुली द्यावी लागली. अमेरिकेच्या सीआयएनं सौदी राजपूत्राच्या निर्देशानुसार खशोगीची हत्या झाल्याचा अहवाल दिला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चौकशीतही हे सिध्द झालं. सौदीच्या प्रशासनावर मोहम्मद बिन सलमानची एकहाती सत्ता आहे. त्याच्या संमतीशिवाय हायप्रोफाईल खून होणे शक्य नव्हतं. हत्येपूर्वी मोहम्मद बिन सलमान याची जगभरात उदारमतवादी अशी प्रतिमा रंगवण्यात आली होती. मात्र या हत्येमुळे राजपुत्राच्या या प्रतिमेला धक्का बसला. त्यामुळे मोहम्मद बिन सलमानने पुढे येवून, या हत्येची जबाबदारी स्वीकारली. मात्र मी केवळ जमाल खशोगीला सौदीमध्ये घेवून येण्यास सांगितलं होतं. पण मारेकऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊन जमालला संपवण्याचा निर्णय घेतला असा युक्तीवाद या राजपुत्राने केलाय.
या प्रकरणातील निकाल संशयास्पद
सौदी पोलिसांनी या प्रकरणी ३१ जणांची चौकशी केली. यापैकी २१ जणांना अटक झाली आणि यापैकी ११ जणांविरुध्द प्रत्यक्षात कोर्टात खटला चालवण्यात आला. यापैकी ५ जणांना मृत्यूदंड देण्यात आला तर ३ जणांना २४ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र आरोपींची नावं सौदी अरेबिय़ाने उघड केलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात या निकालाची अंमलबजावणी होईल का हे अजून स्पष्ट नाही. सौदी अरेबियात याबाबत कमालीची गुप्तता पाळली जातेय. दुसरी गोष्ट म्हणजे या खटल्याचं कामकाज पाहण्याची परवानगी केवळ युरोपियन युनियन आणि काही देशांच्या राजदुतांना देण्यात आली होती. मात्र याची माहिती गुप्त ठेवण्याची शपथ त्यांना देण्यात आली होती.
हत्येचे सूत्रधार मोकळे
या हत्येचा सूत्रधार सौदी गुप्तचर खात्याचा अधिकारी अहमद अस्सेरी याला पुराव्याअभावी निर्दोष सोडून दिलं गेलंय. हत्येच्या वेळी इंस्तबूलच्या सौदी राजदुतावासात उपस्थित असलेल्या राजदूत मोहम्मद—ल-औतेबीला सोडून देण्यात आलंय. तर राजपुत्राचा मुख्य सल्लागार सौद अल खतानी याची साधी चौकशीदेखील करण्यात आली नाही. या हत्याकांडात सहभागी असलेल्य़ा बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यात आलंय. केवळ खालच्या एजंटला म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनवण्यात आलंय. त्यामुळे हा निकाल म्हणजे केवळ फार्स आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.