Fact Check | ...आणि औरंगाबादमध्ये बसचालकाला मारहाण केलेला व्हिडीओ झाला दिल्लीचा

Update: 2020-02-26 13:47 GMT

CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून राजधानी दिल्लीत मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह १३ जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली असून १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर हे वातावरण आणखी चिघळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम आहे. या हिंसाचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्यात आडवे येऊन बसचालकाला मारहाण करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्लीचा म्हणून व्हायरल करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

हा व्हिडीओ गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. आपल्यापैकी अनेकांच्या व्हॉट्सअपवर हा व्हिडीओ आलेला असेल.

‘मॅक्स महाराष्ट्र’च्या माहितीनुसार हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड इथला आहे. ओव्हर टेक करण्यासाठी जागा न दिल्याने काही माथेफिरुंनी राज्य महामंडळाचे बस चालक सुधाकर शिससाट यांना मारहाण केली होती. १८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद-शिरपूर या बसवर हा हल्ला झाला होता.

या संदर्भातील बातम्या

दै. लोकमत

टीव्ही ९ मराठी

दै. सकाळ

ठळक मुद्दे

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ देशपातळीवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हल्ला करणारी व्यक्ती ही मुस्लिम असल्याचं दिसतंय. त्यामुळे याचा फायदा घेत या व्हिडीओला चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येतंय. याप्रकारे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.

दिल्ली आणि हिंदीभाषिक प्रदेशातील युझर्सनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

निष्कर्ष

सदर व्हायरल होत असलेला व्हिडीओ औरंगाबादच्या कन्नड इथला आहे. याचा दिल्लीतील हिंसाचार किंवा CAA आणि NRC विरोधी आंदोलनाशी कसलाही संबंध नाही. केवळ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतून हे व्हायरल करण्यात येतोय.

Similar News