रायगड : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या कर्नाळा अभयारण्यातील वन्य जीवांच्या संरक्षणासाठी स्वयंसेवी संस्था आक्रमक झाल्या असून वन विभागाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढील एक महिन्यात उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोकण कट्टा विलेपार्ले आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था , बांधनवाडी पनवेल यांनी दिला आहे.
स्वयंसेवी संस्थाच्या वतीने कर्नाळा पक्षी अभयारण्य हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मानवी साखळी निर्माण करीत वन्य जीव संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत कर्नाळा पक्षी अभयारण्य प्रशासनाचा निषेध नोंदवून महामार्गावरील प्रवासी व पर्यटकांना माहिती पत्रके वाटून आणि हातात बॅनर्स घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.त्यानंतर कर्नाळा अभयारण्यात रॅली देखील काढण्यात आली. यावेळी कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये पशु-पक्षी आणि प्राण्यांवर उपचारासाठी पशु वैद्यकीय सुविधा तात्काळ करण्यात यावीन, कर्नाळा पक्षी अभयारण्यात येणाऱ्या सर्व पर्यटक व प्रवाशांना वन्यजीव संरक्षण कायद्याबाबत माहिती देण्यात यावी त्यासाठी तिकीट काउंटरवर माहिती पत्रके देण्यात यावीत,सध्या लावण्यात आलेल्या साऊंड ब्रेकर वॉलच्या वरचे टॉप सरफेस निमुळते करण्यात यावे किंवा काटेरी तार लावण्यात यावी,मंकी लॅडरची संख्या वाढविण्यात यावी,अभयारण्य हद्दीतील महामार्गावर रंबलर स्ट्रिप्स मारण्यात याव्यात,खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेशिस्त प्रवासी आणि पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी सी.सी. टी.व्ही कॅमेरे लावण्यात यावे, वन कर्मचाऱ्यांमार्फत महामार्गावर गस्त घालण्यात यावी,अशा मागण्यांचे निवेदन कर्नाळा पक्षी अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांना देण्यात आले.
कर्नाळा अभयारण्य येथील माकड व इतर पक्षी व प्राणी यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. दररोज किमान एक तरी प्राणी अथवा पक्षी अभयारण्य असलेल्या महामार्गावर जखमी होत आहे अथवा त्यांचा मृत्यू होत आहे. तसेच जे पर्यटक वन्य प्राण्यांना खाऊ देतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच पुढील महिन्याभरात सदर उपाय योजनांवर कारवाई न केल्यास कर्नाळा अभयारण्य प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला.
कर्नाळा अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी रॅलीला सामोरे जात निवेदनात मांडलेल्या उपाययोजनांवर कारवाई करण्याबाबतचे सकारात्मक आश्वासन दिले असून लवकरात लवकर वरील मागणीची पूर्तता करणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी मानवी साखळीत कोकण कट्टा, विलेपार्ले संस्थापक अजित पितळे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, कोकण कट्टा खजिनदार सुजित कदम यांच्यासह १७३ प्राणीमित्र सहभागी झाले होते.