दिल्लीतील शाहीन बाग आंदोलक महिलांची परवड थांबेनाशी झालीय. आंदोलन देशविरोधी असल्याचा आरोप त्यांच्यावर झालाय. आंदोलनाच्या ठिकाणी गुंडांकडून गोळीबार करून महिलांमध्ये दहशत पसरवण्याचा व त्यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. तो विफल ठरल्यावर दिल्लीतील उत्तरपूर्व भागात दंगल घडवून आणण्यात आली. आता त्या दंगलीच्या पुनर्वसन कार्याचे व्हिडीओसुद्धा आंदोलनासाठी पैसे घेतानाचे असल्याचे पसरवलं जात आहे. दिल्लीतील एक गल्लीत महिलांना पैसे वाटप होत असल्याचा .व ते शाहीन बाग आंदोलनातील सहभागासाठी असल्याचा प्रचार व्हिडीओसोबत करण्यात येत आहे. चेन्नईतील सामाजिक कार्यकर्ता चंद्र मोहन याच्या जागरुकतेमुळे संबंधितांचा खोडसाळपणा उघडकीस आला आहे.
चंद्र मोहन दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर मदत कार्यासाठी दिल्लीत आलाय. त्याने व्हिडीओत दिसणारे ठिकाण शोधून काढले. तिथल्या खाणाखुणा तपासत शोधलेले ठिकाण व्हिडीओतील असल्याची खात्री केलीय. तिथल्या स्थानिक लोकांशी बोललाय आणि त्यानंतर त्याने स्वत:चा विडिओ जारी करून खोट्याचा पर्दाफाश केलाय.
[video data-width="400" data-height="224" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2020/03/getfvid_10000000_621960078363848_19930800032055296_n.mp4"][/video]
चंद्र मोहन याने दिलेल्या माहितीनुसार, सदरचे ठिकाण जुन्या मुस्ताफबाद येथील बाबू नगरमधला आहे. शिवविहारमधील दंगल पीडितांनी या भागात आसरा घेतलेला आहे. तिथल्या स्थानिक नागरिकांनी आपसात मिळून पीडितांना मदत केली. ती शिध्याच्या स्वरुपात होती. पण पीडितांची संख्या मोठी असल्याने काही जण उरले होते. त्यांना काहीच मिळालं नव्हतं. तेंव्हा शहझाद मलिक नावाचा युवक पुढे आला. त्याने स्वत:च्या खिश्यातून पीडितांना पैसे वाटप केलं. त्याचाच व्हिडीओ शाहीन बाग आंदोलनातील सहभागासाठी महिलांना पैसे देतानाचा व्हिडीओ म्हणून प्रसारित केला गेलाय. नागरिकांना शिधावाटप केल्याचं ठिकाण आणि सोबत लगतचीच गल्ली, जिथे पैसे वाटप केल्याचा दावा केला गेला होता, चंद्र मोहन याने आपल्या विडिओत स्पष्टपणे दाखवलंय.
बारकाईने पहिले असता व चंद्र मोहन यांच्या दाव्यातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक विडिओत पडताळून पहिली असता स्पष्ट होतंय की शाहीन बागमधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा दावा खोटा व खोडसाळ आहे. सबंधित व्हिडीओ दिल्ली दंगलीतील पीडितांच्या मदतकार्याचा आहे.