1965 ला पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये शत्रूचे अनेक रणगाडे उध्वस्त करणारे आणि 'परमवीर चक्र' विजेते अब्दुल हमीद यांचा मुलगा अली हसन (61) यांचा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. अब्दुल हमीद याचं कुटुंब गाजीपुरमध्ये रहातात. मात्र त्यांचा दोन नंबरचा मुलगा अली हसन आपल्या कुटुंबासोबत कानपुरमधील सय्यद नगरमध्ये राहत होते.
हसन यांच्या मुलाने सांगितले की,21 एप्रिल रोजी हसन यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना खूप खोकला येत होता आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.त्यामुळे मध्यरात्री त्यांना हैलट रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुरवातीला त्यांना ऑक्सिजन लावले,त्यामुळे त्यांची तब्येत सुधारू लागली होती.मात्र पुढील चार तासांनी डॉक्टरांनी तब्येत सुधारू लागली असल्याचं कारण सांगत ऑक्सिजन काढून घेतले.मात्र त्यानंतर अली हसन यांची तब्येत पुन्हा बिघडल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
त्यानंतर डॉक्टरांनी बाहेरून ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचं सांगितले.त्यामुळे त्यांच्या मुलाने अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर शोधण्याचा प्रयत्न केला. तर रुग्णालयातील डॉक्टरांसमोर हात जोडून ऑक्सिजन पुरवण्याची विनवणी सुद्धा केली. आणि याचवेळी अली हसन यांनी शेवटचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे, अली हसन यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली नाही.मृत्यू झाल्यावर त्यांचा मृतदेह रुग्णालयाकडून कुटुंबातील सदस्यांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर अली हसन यांच्यावर गंज शहीदा कबरस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.