केरळमध्ये रामायणातील जटायू पक्षी आढळल्याचा व्हिडीओ अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल आहे. हिंदी, मराठीसह इंग्रजी भाषांमध्ये वेगवेगळे संदेश लिहून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येतोय.
एका डोंगरकड्यावरून एक मोठा पक्षी झेप घेत असल्याचा हा व्हिडीओ आपणही कधी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअवरती पाहिला असेल. ‘मॅक्स महाराष्ट्र’ने या व्हिडीओची तथ्यता पडताळली.
व्हायरल पोस्ट -
Jadayu found at chadayamangalam, Kerala. The bird is in Ramayan also.
Please watch. pic.twitter.com/NOx55ijOPb
— Senthil Andavan🇮🇳 (@NatarajaMurthi) July 27, 2019
तथ्य पडताळणी –
या पोस्टमध्ये पहिला दावा होता की हा पक्षी रामायणातील जटायू आहे. मोठ्या प्रमाणावर व्हायरस असलेल्या या व्हिडीओतील स्क्रीनशॉट आम्ही आधी गुगल इमेजमध्ये सर्च केली. तेव्हा हा पक्षी कॉन्डॉर (Condor) असल्याचं समजलं.
ही गिधाड पक्षाची एक जात आहे. हा पक्षी केरळ किंवा भारतात नाही तर दक्षिण अमेरिकेत आढळतो. दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या पक्षांमधला हा सर्वात मोठा पक्षी आहे. कॉन्डॉर अतिशय दुर्मीळ आहे. या पक्षांची कमी होत असलेली संख्या पाहून अमेरिकेत संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत.
कॉन्डॉर (Condor) पक्षाबाबत विकीपीडीयावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
या पोस्टमध्ये दुसरा दावा करण्यात आला होता की, हा पक्षी केरळमध्ये आढळला आहे.
वास्तवात, हा पक्षी किंवा हा व्हिडीओ हा अर्जेंटीनामधल्या कॅटामोराका (Catamarca, Argentina) भागातला आहे. डिसेंबर २०१२ मध्ये हे गिधाड मरणासन्न अवस्थेत सापडलं. त्याला विषबाधा झाली होती. स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्याला ब्युनोस आयर्स प्राणीसंग्रहालयात दाखल केलं. त्याच्यावर दीड वर्ष उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर २८ मार्च २०१४ रोजी त्याला जंगलात सोडण्यात आलं. तेव्हा हा व्हिडीओ घेण्यात आला आहे.
द डोडो या वेबसाईटवर यासंदर्भात सविस्तर वृत्तांत दिला आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर युट्युबवर यासंदर्भात व्हिडीओ सर्च केला असता या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आढळला. यातील काही भाग व्हायरल केला जात आहे.
संपूर्ण व्हिडीओ : Full View
निष्कर्ष –
व्हायरल पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे हा पक्षी जटायू आहे आणि तो केरळमध्ये आढळून आला आहे असे दोन्ही दावे खोटे आहेत. हा पक्षी कॉन्डॉर जातीचं एक गिधाड असून ते दक्षिण अमेरिकेत आढळतं. हा व्हिडीओही केरळचा नसून अर्जेंटीनामधला आहे.