सार्वजनिक जीवन, राज्य व्यवस्था अशा बाबींची तोंडओळख झाली, त्या शाळकरी जीवनापासूनच पडलेले व आजवर न सुटलेले एक कोडे म्हणजे राजकारणातील 'डावे' व 'उजवे' कोण? तेव्हाचा काळ पंडित जवाहरलाल नेहरु, पंडित दीन दयाळ उपाध्याय, कॉ. श्रीपाद अमृत डांगे या मंडळींचा होता. नंतर पिढ्या बदलत गेल्या इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, कॉ. ज्योति बसू, नंबुद्रीपाद असे नेते बदलत गेले. नंतर राजीव गांधी, आता सोनिया व राहुल गांधी, नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, देवेंद्र फडणवीस आणि सीताराम येच्युरींपासून कन्हैय्यालाल यांच्यापर्यंत नेते बदलत राहिले. यातले काही डावे, तर काही उजवे होते. जे जगातील कामगारांच्या एकजुटीच्या विजयाच्या व भांडवलदार मुर्दाबादच्या घोषणा त्वेषाने डाव्या हाताच्या मुठी आवळून द्यायचे, अशी मंडळी म्हणजे 'डावे', जे अधून-मधून भारतमाता की जय व वंदे मातरम असे उच्चारवात बोलत, ते 'उजवे', असे माझ्या बालमनाने तेव्हा घेतले. डाव्यांना कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, समाजवादी असे पक्ष होते. उजव्यांचा आधी भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष बनला. सर्वत्र सत्ताधारी मात्र काँग्रेसवाले होते. ते नक्की डावे की उजवे हे समजायचे नाही.
पण इतिहासाच्या ओघात जग दिवसागणिक बदलत राहिले व त्याबरोबर राजकीय घडी व विचारही बदलले. बदलला नाही, तो फक्त 'डावे' आणि 'उजवे' यांच्यातील संघर्ष. आता बदललेल्या परिस्थितीत फक्त बदलली आहेत, ती माणसे व त्यांचे विचार. एके काळी तावातावाने डाव्या हाताची मूठ आवळून भांडवलशाहीविरुद्ध आणि तिला बळ देणाऱ्या सरकारविरुद्ध घोषणा देणाऱ्याच्या मुठी अलगद उघडल्या आणि बघता बघता डाव्यांचे उजवे कधी झाले, ते त्यांनाही समजले नाही. डाव्या चळवळीतील नेते व कार्यकर्ते कुठे काँग्रेसच्या कळपात सामील झाले, तर कुठे भाजपच्या छावणीत घुसले. या मंडळींना आमदारकी, खासदारकी आणि काहींना तर मंत्रिपदेही मिळाली. त्यांनी डावी व उजवी विचारसरणी यांच्या व्याख्या नव्याने सांगायला सुरुवात केली. ही डावी मंडळी आता सायकल, स्कूटरवरून न फिरता उंची गाड्यांत दिसू लागली. आता त्यांची विदेशातील धाव केवळ रशियापर्यंत नव्हती. इंग्लंड, अमेरिकेत ते बिनदिक्कत फिरू लागले आणि तिथल्या व्यापार उदीम व्यवस्थंची कौतुकेही करू लागले.
Follow @MaxMaharashtra
एक गोष्ट नक्की. डाव्या विचारसरणीत ज्यांचे पालनपोषण झाले, त्यांच्या बुद्धीचे चातुर्य इतरांपेक्षा फारच उजवे. त्यामुळे आपले आधीचे तत्त्वज्ञान व आताचे बदललेले तत्त्वज्ञान या दोन्हीचे उत्तम निरुपण करत आपण कसे बरोबरच करत आहोत, हा युक्तिक्तवादही समर्थपणे करू लागले. त्याचे वक्तव्य बिनतोड, त्यामुळे मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान मांडत 1962साली चीनने भारतावर केलेले आक्रमण हे खरे तर आक्रमण नव्हतेच, तो शोषितांचा मुक्तिक्तलढा होता, असे मानणारे व म्हणणारे आणि मतदानातून राबवली जाणारी लोकशाही हे 'बुर्झ्वाजींचे कपट कारस्थान' असा युक्तिक्तवाद करणारे मार्क्सवादी कॉ. ज्योति बसू 1977 मध्ये त्याच लोकशाहीतील मतदानाच्या मार्गाने बंगालचे मुख्यमंत्री बनले व तब्बल तीन दशके त्या पदावर चिकटून राहिलेसुद्धा. अखेर ममता बॅनर्जींनी मार्क्सवाद्यांना लोकशाहीतील मतदानाच्याच मार्गाने एकदा नव्हे, दोनदा सत्तेपासून वंचित केले.
हे सारे आताच सांगण्याचे कारण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून स्व:ला डावे मानणाऱ्यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. वेगवेगळ्या मार्गांनी व पद्धतींनी मोदींना व त्यांच्याच म्हणण्यानुसार उजव्या विचारसरणीला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न चालू आहेत. बरे, या डाव्या मंडळींमध्ये माध्यमांची मंडळी मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्या किरकोळ आंदोलनांनासुद्धा अमाप प्रसिद्धी. मागे बिहारच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांचे वारे वाहू लागले त्याच काळात अत्तर प्रदेशातील एका खेड्यात एका मुसलमान व्यक्तीची जमावाने हत्या केली. हत्या करणे हा गुन्हाच. त्यापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांत काँग्रेसचीच सत्ता असताना तीन डाव्या बुद्धिवाद्यांची हत्या झाली. त्याबद्दल साहित्यिकांनी त्यांना सरकारने दिलेले पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू केली व बघता बघता हे लोण देशभर पसरले. सर्वत्र केंद्र सरकारविरुद्ध टीकेचा भडका उडाला. काही दिवसांत प्रचार संपला. त्याच दिवशी पुरस्कार वापसीची मोहिमही आपोआप बंद झाली. उत्तर प्रदेशातील हत्येचा छडा अद्याप लागलेला नाही. महाराष्ट्र, कर्नाटकातील बुद्धीमंतांच्या खुन्यांनाही अद्याप शासन झालेले नाही. पण लढा मात्र थांबलेला आहे.
नंतर हैदराबादला विद्यापीठात एका दलित विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या प्रशासनाने केलेल्या अन्यायामुळे म्हणे आत्महत्या केली. हा विद्यार्थी डाव्या चळवळीतील होताच, शिवाय तो दलीत होता, असाही शोध लावण्यात आला. झाले, देशभर पुन्हा डाव्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या 'उजव्या' सरकारचा धो धो निषेध झाला. पुढे त्या विद्यार्थ्याची जात काहींनी शोधून काढली व तो दलीत नसल्याचे दिसून आले. आंदोलन थंडावले. पण विद्यापीठाच्या कुलगुरूंना मानहानी होऊन बाहेर पडावे लागले, त्याबद्दल ना कुणाला खंत ना खेद.
तशीच गोष्ट दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडली. नेहरूच्या नावाने सुरू झालेल्या या विद्यापीठाचा उद्देश प्रतिभावंत व गुणी विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध अशा विषयांचे सखोल शिक्षण देण्याचा असला, तरी हे विद्यापीठ डाव्यांच्या चळवळींचे जणु अघोषित केंद्रच बनले. वयाची चाळीशी ओलांडली, तरी इथल्या होस्टेलमध्ये कायमचा तळ ठोकून 'शिक्षणक्रम' पूर्ण करणारे शेकडो विद्यार्थी आहेत. त्यातीलच काहींनी अफझल गुरू याच्या फाशीच्या दिवसाचे निमित्त साधून निदर्शने केली व 'इंडिया गो बॅक', 'लाँग लिव्ह अफझल' अशा अर्थाच्या घोषणांचे फलक झळकवले. त्यांचा स्वयंघोषित नेता कन्हैय्यालाल याला अटक झाली, तेव्हा जणु कुणा राष्ट्रभक्ताविरुद्ध परकीय सत्तेने जुलुम केला, असे वातावरण निर्माण झाले व माध्यमांनीही कन्हैय्याला 'हिरो' बनवले. विद्यापीठात राहून अभ्यास करण्याऐवजी इतका काळ तो काय करतो आहे, त्याच्या मिळकतीचे साधन काय, तो नक्की कोणता अभ्यासक्रम शिकतो वा इतक्या वर्षांनंतरही त्याचे 'शिक्षण' पूर्ण झाले नसेल, तर तो नक्की, कोणते 'संशोधन' करतो, असे प्रश्न माध्यमांपैकीही कुणी विचारले नाहीत.
आता दिल्लीच्या विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या फेसबुक पेजवरील पोस्टमुळे डाव्यांना पुन्हा चेव आला. या मुलीचे पिता सैन्यात होते व ते शहीद झाले. तिच्याबद्दल असे काही वाद सुरू झाले व डाव्यांनी याचेही भांडवल करण्याचा निर्णय घेतल्याने दिल्लीत डाव्या विद्यार्थी संघटना विरुद्ध उजव्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा उघड संघर्ष सुरू झाला. डाव्यांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा डाव्यांच्या या वाढत्या तापाला कंटाळून त्या विद्यार्थिनीने अखेर कंटाळून स्वत:चेच अंग या 'आंदोलनातून' काढून घेतले व तसे पोष्ट टाकून ती आपल्या गावी निघूनही गेली.
भारतात विविध राजकीय विचारधारा आहेत व आपली संस्कृती आणि राज्यघटनेप्रमाणे सर्वांना आपापली विचारधारा बाळगण्याचा, बदलण्याचा व तिचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जन्मदत्त अधिकार आहे. त्याप्रमाणे भारतात जे स्वत:ला डावे मानतात, त्यांनी आपल्या विचारांचा अवश्य पाठपुरावा व प्रसार करावा, पण हे करताना आपल्याला ज्या देशाने हे अधिकार बहाल केले, त्या देशाच्या सार्वभौमत्वालाच जर कुणी आव्हान देऊ लागले, तर स्वत:ला नेमस्त मानणाऱ्यांनी ते कुठवर व का सहन करावे, हा प्रश्न आहेच. अर्थात ई. एस. नंबुद्रिपाद, कॉ. डांगे, कॉ. बी. टी. रणदिवे, ए. बी. वर्धन, कॉ. सुरजीत यांच्यासारख्या धुरिणांची जागा कन्हय्यालालसारखे उटपटांग घेऊ लागले, तर आणखी वेगळी अपेक्षा तरी काय ठेवायची?
इथे दोष स्वत:ला 'उजवे' मानणाऱ्यांचाही आहेच. राजकीय अवकाशात आपले अस्तित्व राखायचे व वाढवायचे, तर केवळ आपले सरकार आहे, ते बघून घेईल, अशी वृत्ती बाळगून चालणार नाही, हे या मंडळींच्या कधी ध्यानात येणार? विचाराला विचाराने उत्तर द्यायलाच हवे. जर समोरचा पक्ष आपले विचार सार्वजनिक मंचांवर व माध्यमांमधून मांडत असेल, तर घरात बसून केवळ बोटे मोडून काय उपयोग. तशाच मंचांचा व माध्यमांचा वापर करून त्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करणे आवश्यक ठरते. निदान जे डाव्यांचे तंबू सोडून उजव्या छावण्यांमध्ये दाखल झाले व तिथे आमदारकी, खासदारकी मिळवल्या, त्यांनी तरी आपल्या पूर्वीच्या काँम्रेड्सना चार खडे बोल सुनावायला हवेत.
पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
-भारतकुमार राऊत
Twitter: @BharatkumarRaut