मुस्लिम सत्यशोधक!
मुस्लिम कुटुंबात जन्म घेऊनही मुस्लिम मुल्ला-मौलवींच्या विरुद्ध बंड पुकारणारे, मुस्लिम जनतेला सत्य शोधनाच्या वाटेने नेणाऱ्या, बंडखोर वृत्तीच्या समाज सुधारक-पत्रकार हमीद दलवाई यांचा जन्मदिन त्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा....
वरळीच्या 'दैनिक मराठा'च्या कार्यालयात १९७०च्या दशकात उंच-सडपातळ शरीरयष्टीचा एक तरूण पत्रकार टेबलवर झुकून झरझर लिहीताना हमखास दिसायचे. कुणाशीही फारसं बोलणं, हंसणं-खिदळणं नाहीच. काम झालं की रुमालाने तोंड पुसत… ताडताड टांगा टाकत खांद्यावरची शबनम झोळी सांभाळत निघूनही जायचे. तेच हमीद दलवाई!
प्रचंड व्यासंग असल्याने विविध धर्म परंपरांचा तौलनिक अभ्यास त्यांच्या डोक्यात सदैव चालू असायचाच. धार्मिक लगाम बाजूला सारून मुस्लिम समाजाने प्रगती करावी, यासाठीच त्यांची सारी खटपट!
मुस्लिम कुटुंबात जन्म घेऊनही मुस्लिम मुल्ला-मौलवींच्या विरुद्ध बंड पुकारून मुस्लिम जनतेला सत्य शोधनाच्या वाटेने नेणारे असे बंडखोर वृत्तीचे समाज सुधारक-पत्रकार हमीद दलवाई यांचा आज ८८वा जन्मदिन.
अवघे ४१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दलवाईंनी कालबाह्य धार्मिक रिवाजांपीसून मुस्लिम जनतेची सुटका करण्यासाठी सामाजिक चळवळ उभारली. त्यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक समाजात शेकडो तरुण दाखल झाले. त्यांनी महात्मा जोतिबा फुलेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला होता..
मुस्लिम महिलांवर लादली गेलेली बुरख्याची पद्धती, तोंडी तलाकची रुढी याविरुद्ध त्यांनी लढा पुकारला. हा हेतू साध्य करण्यासाठी सर्वांसाठी समान नागरी कायदा करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
यामुळे कर्मठ धार्मिकांचे पित्त खवळले. दलवाई धर्मविरोधी काम करत असल्याची टीका होत राहिली. त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही झाले. पण दलवाई लढतच राहिले.
मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढावे, मुलींना शाळेत घालावे, धर्माधिष्ठित मदरशांऐवजी क्रमिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मुस्लिम मुलांनी जावे, यासाठी त्यांची धडपड होती.
हे कार्य करतानाच त्यांचे वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथलेखनही चालू होतेच. विविध मराठी वृत्तपत्रांत त्यांनी लेखन केले. पण किडनीच्या विकाराने त्यांना ग्रासले व त्यामुळेच ३ मे १९७७ रोजी त्यांचे निधन झाले.
मुस्लिम समाजाने एक खंदा समाज सुधारक गमावला. दुर्दैव हेच ज्या धर्मबांधवांसाठी आयुष्य वेचले, शारीरिक हल्लेसुद्धा सहन केले, तो समाज व त्यातील लब्धप्रतिष्ठीतही त्यांच्या बाजूने कधी उभे ठाकले नाहीत. ते एकाकीच लढत राहीले.
- भारतकुमार राऊत