Fact Check | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर जाणार? महापालिकेने केला खुलासा
कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्याअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमार्फत उपाययोजना करत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात आज काही प्रसारमाध्यमांनी मुंबईतील कोरोनारुग्णांच्या आकडेवारीबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या.
राज्यातील कोरोनासंबंधित उपाययोजना पाहण्यासाठी पाच सदस्यीय केंद्रीय पथक आज मुंबईत आलं होतं. 'बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'करोना कोविड १९' च्या रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल' अशा आशयाच्या बातम्या आज काही चॅनेल आणि वेबसाईट्सच्या माध्यमातून केंद्रीय चमूच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या.
यावर आता मुंबई महापालिका प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.
'विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य सदरहू चमूने महापालिका आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेलं नाही' असं महापालिकेने स्पष्ट केलंय. विविध माध्यमातील या बातम्या वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या असून अतिरंजित व दिशाभूल करणाऱ्या आहेत, असंही महापालिकेनं म्हटलंय.
केंद्रीय चमूने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्त यांच्यासह महापालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करीत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली. केंद्रीय चमूने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक व वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलंय, असं महापालिकेकडून संगण्यात आलंय.
यासोबत लोकहितास्तव याप्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित करण्याचं माध्यमांनी टाळावं असं आवाहन मुंबई महापालिकेने केलंय.