गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. शासकीय यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही अफवांमुळे भीतीचं वातावरण तयार होत आहे.
आज सकाळपासून पुण्यातल्या काही व्हॉट्सअप गृप्सवर आणि फेसबुकवर एक मेसेज फिरतोय. त्यामुळे पुणेकर आणि पुण्यात कामासाठी ये-जा करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
काय आहे मेसेज?
⚠⚠⚠⚠⚠⚠⚠⚠
पुण्यात हाई अलर्ट..!
सर्व रस्ते आज ४ पासून बंद केले जाणार आहेत..! सर्व कंपनी आणी कॉलेज ला सुट्टी दिली आहे.
आपण आपल्या मित्रांना व नातेवाईक मंडळीना पुण्यात येऊ नये म्हणून सांगा.🙏🏻
बंडगार्डन बंधार्याला तडे गेलेत आणि खडकवासला धरन फुटण्याचे संकेत पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे आहे वास्तव
पुणे शहरातले कोणतेही रस्ते आज बंद केले जाणार नाहीत. अशी कोणतीही माहिती महानगरपालिका किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीय. वहातूक व्यवस्था सुरळीत सुरु रहाणार आहे.
याशिवाय पुणे पोलिसांनीही खडकवासला धरण फुटण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत आणि बंड गार्डन बंधारा सुस्थितीत असून त्याला तडे गेलेले नाहीत.
याऊलट, खडकवासला धरणातून सध्या चालू असलेला ४५,४७४ क्युसेक्स विसर्ग कमी करून आज सकाळी ११.३० वाजता तो ३९,६११ क्युसेक्स इतका कमी करण्यात आलेला आहे.
तर, मुळशी घरणातून येणारा पाण्याचा विसर्ग सकाळी ११ वाजता विसर्ग १४,७०० क्युसेक्सवरून १०,००० क्युसेक्स करण्यात आलेला आहे.
त्यामुळे पुणे आणि परिसरात येत्या काही तासांत मुळा-मुठा नदीच्या पाणी पातळीत घट होणार आहे.
वरील मेसेजमधली माहिती ही पूर्णपणे चुकीची आहे असं ‘मॅक्स महाराष्ट्र’च्या पडताळणीत समोर आलंय. त्यामुळे असे मेसेज किंवा पोस्ट तुमच्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि अशी चुकीची माहिती शेअर करु नका.