देशात कोणतीही राजकीय घडामोड घडत असेल तर त्या घटनेशी पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव जोडण्याचा ट्रेन्ड सुरू झाला आहे. त्यात सध्या गाजत असलेल्या आरे कॉलनीचं प्रकरण तरी कसं अपवाद राहू शकतं.
काल रात्रीपासून पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. ४ मार्च १९५१ चा हा फोटो आहे. १९४९ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. त्यानंतर १९५१ मध्ये इथे डेअरी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याचं उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं. जी आरे कॉलनी आज जंगल आहे असा दावा करण्यात येतोय, त्या आरे कॉलनीत उद्घाटनावेळी पंडीत नेहरूंनी झाड लावलं होतं. तेव्हाचा हा फोटो आहे.
राज्य सरकारने मेट्रो-३ च्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे कॉलनीतील जागा निवडली. त्यानंतर आरे कॉलनी वसाहत आहे की जंगल हा वाद उभा राहीला. ४ ऑक्टोंबरला मुंबई उच्च न्यायालयाने आरे कॉलनीत कारशेड करण्यासंदर्भात निकाल दिल्यानंतर लगेचच रात्रीतून वृक्षतोड सुरु करण्यात आली. आज सर्वोच्च न्यायालयातून या वृक्षतोडीवर स्थगिती येईपर्यंत तब्बल ८० टक्के झाडं तोडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
आता नेहरूंचा हा फोटो समोर आल्यानंतर त्याला राजकीय संदर्भ नसता आला तरच नवल होतं.