कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अशा परिस्थितीतही अफवा काही थांबायचं नाव घेत नाहीयत. लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालयांचं गणित बिघडलं आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षा रद्द केल्याची बातमी मराठी वृत्तवहिनी 'एबीपी माझा'ने प्रकाशित केली होती. त्यानंतर या बातमीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. राज्यात हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. या बातमीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यातील काही विद्यार्थ्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'कडे यासंदर्भात सत्य पडताळण्याबाबत विचारणा केली.
तथ्य पडताळणी :
ही माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय पत्र सूचना कार्यालय (PIB) ने यासंदर्भात खुलासा केला आहे. यामध्ये यूपीएससी परीक्षा रद्द झाल्याची 'एबीपी माझा'ची बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात बदल करण्याची गरज वाटल्यास यूपीएससीच्या वेबसाईटवर तशी माहिती दिली जाईल असं 'पीआयबी'नं स्पष्ट केलंय.
https://twitter.com/PIBMumbai/status/1250782647288127489?s=19