एक उमदा कलाकार गेला
X
नितीन चंद्रकांत देसाई एक अतिशय कष्ट करणारा व्यावसायिक. कला दिग्दर्शक वगैरे पेक्षा त्यांचं उद्योजक असणं मला जास्त भावलं. एनडी स्टुडीयो हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट. एखाद्या मराठी उद्योजकाने असं स्वप्न पाहावं याचं मला नेहमीच अप्रूप वाटायचं. नितीन देसाईंनी अनेक मराठी तरूणांना चित्रपट उद्योगात रोजगार ही दिला. इतक्या मोठ्या स्टुडीयोचे मालक असूनही त्यांच्यात कधी गर्व दिसला नाही. आमची मैत्री जुळण्याचं बहुधा हेच कारण असावं.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका फिल्मवर काम करत असताना आमची ओळख झाली. नितीन देसाईंच्या पवईच्या स्टुडीयो मध्ये त्याचं एडीटींग करायचं ठरलं होतं. तसं छोटंस काम होतं, पण नितीन त्यासाठी स्वतः स्टुडीयोत हजर झाले. त्यानंतर एडीटींग संपेपर्यंत ते तिथे बसून होते. एकेका फ्रेम वर त्यांचं लक्ष होतं. त्यानंतर कामानिमित्त अनेकदा आमच्या भेटी होत गेल्या. मी मराठी वृत्तवाहिनीमध्ये काम सुरु केल्यानंतर स्टुडीयोच्या डिझायनिंग साठी त्यांची मदत घ्यायचं ठरलं. आमची जागा लहान असल्यामुळे छोट्याश्या जागेमध्ये कसं काय डिझायनिंग करावं हा प्रश्न आमच्यासमोर पडला होता, मात्र नितीन देसाई स्वतः मोजपट्टी घेऊन स्टुडीयोत हजर झाले. त्यानंतर त्यांनी स्टुडीयोचं जे काही डिझाईन केलं ते जबरदस्तच होतं. काही कारणांमुळे तो प्रोजेक्ट होऊ शकला नाही, मात्र या काळात त्यांच्या उलट सुलट आर्थिक व्यवहारांबाबत मात्र माहिती होत गेली.
उद्योजकाला आपल्या कौशल्याबरोबरच आर्थिक बाजूही सांभाळावी लागते. नितीन देसाईंचं कौशल्य पाहून त्यांच्यावर पैसे लावायला अनेक जण तयार होते. नितीन ही प्रत्येक कामात झोकून देऊन काम करायचे. कुठलंही काम ते आपल्या सहकाऱ्यांच्या भरवश्यावर सोडत नसत. ते स्वतः जातीने मिटींग, प्रेझेंटेशन साठी जात. मोदींच्या कार्यक्रमासाठी स्टेज डिझाइन करताना 3D ग्राफिकल वॉक थ्रू द्यावा लागतो, ही अट कळल्यावर त्यांनी स्वतः बसून तसा वॉकथ्रू तयार करून घेतला होता. एक उद्योजक म्हणून आपला स्टुडीयो उभारणं आणि तो टिकवणं यासाठी त्यांची धडपड सतत सुरू असायची.
एनडी स्टुडीयोमध्ये त्याकाळी मी मराठी ने गुंतवणूक करायचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी नितीन देसाई यांनी त्यांच्या आधीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती न दिल्यामुळे ती गुंतवणूक थांबली. त्याकाळी नितीन देसाईंची दुसरी बाजू लक्षात आली. त्यांनी बरंच कर्ज उचललं होतं. आज त्यांच्या स्टुडीयोवर त्यांनी जितकं कर्ज उचललं आहे, ते पाहता या आर्थिक व्यवहारांच्या ओझ्याखालीच त्यांना आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला असावा असं वाटतंय. त्यांच्या स्टुडीयोवर जप्तीची प्रक्रीया सुरू होणार होती. आपला ड्रीम प्रोजेक्ट असा तुटताना त्यांना पाहावलं नसावं. पोलिस चौकशीत आणखी बाबी समोर येतीलच. आणखीही काही कारणं असू शकतात, पण आपण एक चांगला कलादिग्दर्शक, कलाकार, उद्योजक गमावला याचं दुःख राहिलच.
- रवींद्र आंबेकर