Home > मॅक्स ब्लॉग्ज > जगभर फिरले पण मणिपूर वर काय नाय बोलले.. - रवींद्र आंबेकर

जगभर फिरले पण मणिपूर वर काय नाय बोलले.. - रवींद्र आंबेकर

जगभर फिरले पण मणिपूर वर काय नाय बोलले.. - रवींद्र आंबेकर
X

गुजरात मध्ये गोधरा हत्याकांडानंतर आगडोंब उसळला होता. दंगल पेटली होती. ही दंगल कव्हर करण्यासाठी त्यावेळी ईटीव्ही ने मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना मुंबईहून पाठवलं होतं. माझ्याकडे सुरत जी जबाबदारी होती. सुरत जळत होतं. औद्योगिक शहर असल्याने इथे स्थलांतरीत कामगारांचं प्रमाण ही जास्त होतं. सुरत काही शांत होत नव्हतं. आम्ही शहराच्या विविध भागांमध्ये फिरत होतो. एखाद्या ठिकाणी हिंसाचार होत असेल आणि पोलिसांच्या लक्षात आणून दिलं तरी ते तिथे उशीरा जायचे. अनेकदा तर सुरू असलेल्या हिंसाचाराकडे न पाहता गाड्या पुढे निघून जायच्या. एकूणच परिस्थिती गंभीर होती.

सुरत च्या परिघामध्ये कपडा मिल्स, गोडाऊन, छोटे-मोठे उद्योग असल्याने दंगेखोराचं टार्गेट पक्कं झालं होतं. तासा-तासाला नवनवीन अफवा पसरायच्या. अफवा पसरल्या की पुन्हा हिंसाचार सुरू व्हायचा. या काळात दिल्ली मोदींवर खूष नव्हती. NDA ही स्ट्राँग होतं. आतासारखी परिस्थिती तेव्हा नव्हती. NDA च्या घटक पक्षांना किंमत होती. सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडीस होते. गोधरा नंतर ते एकमेव केंद्रीय मंत्री होते, ज्यांनी गुजरातचा दोन वेळा दौरा केला. संरक्षण मंत्री म्हणून त्यांना काळजी होतीच पण यामागे आणखी ही एक कारण होतं. जॉर्ज फर्नांडीस जेव्हा सुरत मध्ये आले तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या. परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर मिडिया शी बोलताना त्यांनी उद्यापासून सुरत पूर्ववत सुरू होईल. सर्व कारखाने सुरू होतील. कारखान्यांना-उद्योगांना पुरेसे संरक्षण दिले जाईल अशी घोषणा केली. गर्दी खूप होती, पण मी मराठीत बोलल्यामुळे जॉर्ज थांबले, मी त्यांना म्हटलं की मी सातत्याने या भागात दिवसरात्र फिरतोय. जाळपोळ इतकी की मला श्वसनाचा आजार ही झाला, लोकं ऐकायला तयार नाहीत. ही जाळपोळ थांबणार नाही, त्यात कारखाने सुरू कसे होणार? जॉर्ज फर्नांडीस ठामपणे म्हणाले, इथला कामगार कारखाना चालू करेल, तू फक्त उद्या बघ.

दुसऱ्या दिवशी सुरतमध्ये भोंगे वाजू लागले. अनेक कारखान्यांमध्ये कामगारांनी रांगा लावल्या होत्या. ज्या कारखान्यांना आगी लावण्यात आल्या होत्या त्या कारखान्यांमध्ये साफसफाई-डागडुजी करण्याचं काम कामगारांनी हाती घेतलं होतं. कामगारांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा लक्षात आलं की अनेक कामगार स्थलांतरीत होते, अनेकांनी कारखाने बंद, राहायला अपुरी जागा म्हणून रोडवर घोळक्याने उभं राहून वस्तीचं रक्षण केलं. छोट्या-छोट्या अफवांवरून एकमेकांवर हल्ले केले, काही लोकं कारखाने जाळण्यातही पुढे होते. जॉर्ज फर्नांडीस यांनी या दंगेखोर बनलेल्या टोळक्यांना पुन्हा कामगार बनवलं. हाताचं काम सुरू केलं.

गुजरात दंगलीचा अनुभव मला मालेगाव बाँबस्फोटाच्या दरम्यान कामाला आला. स्फोटानंतर मालेगावात प्रचंड तणाव होता. या भागात मी रात्री-बेरात्री फिरत होतो. अनेक मोहल्ले माझ्या चांगल्या परिचयाचे झाले होते. माझा काही रोजचा संपर्क नाही, पण आज ही मालेगाव मधली अनेक लोकं मला ओळखतात. इथेही अशीच परिस्थिती. बाजार बंद झाला, हातमाग बंद झाले, सगळे मजूर रस्त्यावर मग प्रत्येक अफवेवर ५००-१००० लोकांची गर्दी रस्त्यावर उतरायची. माझे काही पोलीस ओळखीचे झाले होते, मी त्या स्थानिक पोलीसांना म्हटलं यांचे व्यवसाय सुरू करा. तनाव आपोआप कमी होईल. त्यांना जॉर्ज फर्नांडीस यांचा किस्सा सांगीतला.

हाताला काम नसेल तर माणसं सहज हिंसेकडे वळतात असं याचा एका ओळीतलं तात्पर्य आहे. आज देशभर आपल्याला जो तनाव दिसतोय, हिंसा दिसतेय, द्वेष दिसतोय त्यामागे हेच कारण आहे असं माझं ठाम मत आहे. ज्यावेळेला लोकांच्या हाताला काम नसतं त्यावेळेला त्यांचा विवेक इतर वेळेपेक्षा २०० पटीने जास्त मेलेला असतो. आज देशातील युवकांच्या हातात काम नाही, त्यामुळे सातत्याने त्यांना धर्म हे कोळशाचं इंजिन देण्यात आलेले आहे. यात दिवसभर कोळसा टाकायचं काम युवकांना सोपवण्यात आलंय. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.

गुजरात दंगलीच्या वेळेस एनडीए मधील घटक पक्षांना आपली नाराजी व्यक्त करता आली. जॉर्ज फर्नांडीस गुजरातला पोहोचले. मोदी सरकारला इशारा देण्याचा तो वाजपेयींचा प्रयत्न होता. आज मोदीच देशात सत्तेत आहेत. एनडीए दुर्बल आहे. त्यामुळे मणिपूर सारख्या घटनांवर एकही पक्ष बोलायला तयार नाही. देशाच्या सन्माननीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दोन आदिवासी महिलांना नग्न करून त्यांची ज्या पद्धतीने विटंबना केली या घटनेचा व्हिडीयो व्हायरल होताच एकूण हिंसाचारावर ७७ दिवसांनी मौन सोडलं. देशाचे पंतप्रधान जगभर फिरले पण मणिपूर वर काही बोलले नाहीत. संपूर्ण जगभरात भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मोदी सरकार केवळ निवडणुकांवर लक्ष ठेवून प्रचाराच्या रणनितीत व्यग्र आहे.

मणिपूर मधल्या आदिवासी महिलांवरच्या अत्याचाराचा व्हिडीयो समोर आल्यानंतर अचानक गोदी मिडीयाने मौन सोडलं. मध्यंतरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी मणिपूर मध्ये जाऊन आले, मात्र नरेंद्र मोदी अद्याप ही मणिपूरला गेले नाहीत. देशातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रपती मूर्मू यांनीही दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारावर मौन बाळगलंय. निषेध सोडा, शांततेचं अपिल ही करायला कोणी तयार नाही. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा ती आपलं परकं पाहत नाही. सत्तातुराला भय आणि लज्जा काहीच शिल्लक राहत नाही.

मणिपूरच्या निमित्ताने सगळीकडे दुःख, संताप, शोक व्यक्त केला जात आहे. खासकरून समाज माध्यमांवर एक दिवस हळहळ व्यक्त केली जाईल. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या आपण ही जात्यात असू, त्यावेळस इतरही लोकं अशीच हळहळ व्यक्त करतील. आपापल्या कुवतीप्रमाणे अशा गोष्टींचा निषेध आपण केला पाहिजे. मौन बाळगणं हे मेलेल्या माणसाचं लक्षण आहे. काही भक्त मंडळींना यात ही तुलना दिसते. अचानक शिखांच्या वेळी का नाही बोलला, फाळणीच्या वेळी का नाही बोलला असे प्रतिप्रश्न विचारून मूळ मुद्दा गायब करण्याचं तंत्र त्यांना शिकवलेले आहे. प्रतिप्रश्नांनी प्रश्न सुटणार नाही. कदाचित उद्या तुम्ही ही एखाद्या व्यवस्थेचे पिडीत व्हाल, तेव्हा आज तुमची साथ देणारे तुम्हालाच आरोपी बनवतील. ही सिस्टीम माणूस पाहत नाही, ओळखत नाही. ही सिस्टीम केवळ सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला बांधील आहे. त्यामुळे आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा.

देशापेक्षा कोणीही मोठा नाही, आणि प्रश्न विचारणारा कोणीही छोटा नाही, कुठलाही प्रश्न छोटा नाही.

Updated : 20 July 2023 8:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top