अजित पवार यांच्या युतीच्या चर्चेमुळं भाजपचं ब्रम्हचर्य ढळलं - रवींद्र आंबेकर
अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेमुळे भाजपचं ब्रम्हचर्य ढळलं आहे. ते नेमकं कसं? हे जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांचा लेख...
X
खरं तर प्रश्न भाजपला विचारायला गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट, अंडरवर्ल्ड शी संबंध असलेली पार्टी असल्याचा त्याचाच आरोप असल्यामुळे अशा पक्षाशी कुठल्याही प्रकारची चर्चा-संग आम्ही करणार नाही असं भाजपने निक्षून सांगितलं पाहिजे.
अजित पवारांच्या भाजप प्रवेश किंवा युतीच्या चर्चेमुळे भाजपचं ‘ब्रह्मचर्य’ ढळलं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अत्याचाराला कंटाळून शिवसेना पक्ष ताब्यात घेतलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपने इतक्या लवकर कचऱ्याच्या डब्यात फेकण्याचा विचार जर चालवला असेल तर भाजपच्या एकूण हिंदुत्वातली खोट ही यामुळे लक्षात यायला हवी. एकनाथ शिंदे यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून भाजपला साथ दिलीय, या चर्चांमुळे त्यांची झोप ही उडालीय.
एकामागे एक पक्ष खाऊन भाजपा मोठा होणार नाही, उलट यामुळे पक्षाच्या निष्ठावंताची ज्येष्ठताश्रेणी धोक्यात आली आहे. येत्या काळात पक्षफोडीच्या या अशा चर्चांमुळे भाजपा कोसळेल. अशा राजकीय चर्चा या केवळ विरोधी पक्ष किंवा सत्तेतील एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोकादायक नसून भाजपासाठी ही धोकादायक आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला त्यांचे बुद्धीचातुर्य आणि वय अशा दोन्ही गोष्टी आहेत. पक्षवाढीच्या नैसर्गिक प्रयत्नांना फाटा देऊन जर त्यांनी असे अनैसर्गिक प्रयोग करणं चालू ठेवले तर येत्या काळात त्यांना राजकीय अडचणींचा सामना करावा लागेल. इतर राज्ये आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गुणात्मक फरक आहे.
बाकी, राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणतात याचा अर्थ ‘काहीही करावं’ असा होत नाही हे सर्वच पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे.